श्री गणेश चतुर्थी विशेष
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(प्रस्तुत है श्री गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी द्वारा रचित चिंतामणी चारोळी .)
☆ चिंतामणी चारोळी☆
गौरीपुत्रा विनायका
तूच बुद्धीची देवता
तूच हेरंब गणेशा
तूच ऐश्र्वर्य प्रदाता !!६!!
सिध्दी विनायका राजा
आशीर्वादे एकदंता
बुद्धी लाभते सर्वांना
अशी आहे हो वदंता !!७!!
तूच सत् चिदानंदा
तूही गुणत्रयातीता
तूहीच आनंदमया
तुम्ही वाङमय असता!!८!!
तूही ब्रह्मचि असता
ज्ञान आहात तुम्हीच
तुम्हीच हो ब्रह्मानंदा
आनंदकंदा तुम्हीच !!९!!
सर्व सर्वांचे ऐकावे
म्हणूनी कान सुपाचे
सोंड वाकुडी करुनी
खाता मोदक तुपाचे !!१०!!
तुज म्हणे लंबोदर
बरे वाईट पोटात
सर्वांचे सामाऊनिया
घेतसे तू उदरात !!११!!
तूच असे विघ्नहर्ता
तूच असे सुखकर्ता
लोक तुज ओळखती
तूच असे दु:खहर्ता!!१२!!
तुझी असे स्थूलतनु
तूच गजेंद्र वदन
तूच शैलसुतासुत
तूच असे गजानन !!१३!!
तूच चिन्मय अससी
तुज आवडे जास्वंद
तूच भक्तांना देतसे
सुंदर शुभाशीर्वाद !!१४!!
श्री गणेशाला नमन
वेदातील तत्वज्ञान
तूच आहेस रे ब्रह्म
तूच करिसी रक्षण !!१५!!
तू आहेस शब्दमय
सत्यमय ब्रह्ममय
सार अद्वैत जगाचे
तूचि तू विज्ञानमय !!१६!!
तू सर्व आकाशमयी
तूच वायू जल भूमी
योगी ध्यायती तुजसी
सर्व विद्यांचा तू स्वामी!!१७!!
तूचि उत्साहवर्धक
एकदन्त चार हात
रंग लाल मोठे पोट
पाश अंकुश हातात !!१८!!
व्रातपती गणपती
लंबोदर प्रजापती
शिवसूत विघ्ननाशी
तू असे वरदमूर्ती !!१९!!
अथर्वशीर्षाचे फळ
जो करितो अध्ययन
धर्म मोक्ष अर्थकाम
त्यास न बाधेल विघ्न !!२०!!
अभिषेक करणारा
वक्ता उत्तम होईल
चतुर्थीचा उपवास
विद्यावान तो होईल !!२१!!
असे आहे सांगितले
त्याच अथर्व ऋषींनी
करा दुर्वांनी हवन
होई तोचि बुद्धिमानी !!२२!!
करा दुर्वांनी हवन
होई कुबेर श्रीमंत
देई हजार मोदक
फळ मिळेल इच्छित !!२३!!
तूप समिधा हवन
त्याला मिळेल सर्वही
जो जाणतो रहस्य हे
तो होईल सर्वज्ञही !!२४!!
भाळावर तो शेंदूर
दिसतो शोभायमान
तूच की रे स्थूलतनु
तूच गजेंद्र आनन !!२५!!
!!ॐ!!
©®उर्मिला इंगळे
दिनांक:२-९-१९