श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री... – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्मृती दिन ३ डिसेंबर,१९५१

बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.

१८९३ साली वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.बहिणाबाईंना तीन मूळ होती  ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी  बहिणाबाईंना वैधव्य आले.

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.

त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. छापील मजकुराविषयीची ही असोशी अनक्षर बहिणाबाईंनी या कवितेत उतरवली आहे. 

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना… 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे… 

किती शिशाच्या चमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर…

चाले ‘छाप्याचं यंतर’

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो… 

मानसापरी माणूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना…

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावस भाऊ ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले,

‘ हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे’

आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीची ओळख  महाराष्ट्राला आणि जगभर पसरलेल्या माताही माणसाला झाली.ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता लिहून न ठेवल्यामुळे  त्यांच्याबरोबरच नष्ट झाली आणि माय मराठीचे अतोनात नुकसान झाले.

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचल्या आहेत .त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ.सणसोहळे; काही ओळखीची माणसे,असे आहेत.

अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

उदा. ‘असा राजा शेतकरी चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा कमीत कमी शब्दात अर्थाची कमाल त्या करत असत.

‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.

बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित व हा कार्यक्रम दत्ता चौगुले आणि माधुरी आशिरगडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे यांनी बहिणाबाई साकारली होती. उत्तरा केळकर यांनी त्यामधली गाणी .ओव्या म्हटली आहेत त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित ‘बहिणाई’ नावाच्या लघुपटाची निर्मिती केली.

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.

यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments