सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆
[३]
हे मातृभूमी! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व, वाग्विभवही तुज अर्पियेले
तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला
त्वत्स्थंडिली ढकलले प्रिय मित्रसंघा
केले स्वयें दहन यौवन-देह-भोगां
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता
दावानलात वहिनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु
केला हवी परम कारुण पुण्यसिंधु
त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला
त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला
हे काय, बंधु असतो जरि सात आम्ही
त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी
संतान या भरतभूमिस तीस कोटी
जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती
हे आपुले कुलहि त्यांमधि ईश्वरांश
निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश
[४]
कीं तें ठरो अथवा न ठरो परंतु
हे मातृभू, अम्हि असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्हि ठरलो कृतार्थ
ऐसें विवंचुनि अहो वहिनी! व्रतातें
पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें
श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती
की विस्तवांत हसल्या बहु राजपूती
तें भारतीय अबला-बलतेज कांही
अद्यापि या भरतभूमिंत लुप्त नाही
हे सिद्ध होइल असेंचि उदार उग्र
वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र
माझा निरोप तुज येथुनि हाच देवी
हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते
कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें
जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे
बुध्याचि वाण धरिलें करि हे सतीचें
कवी वि दा सावरकर
(शब्दार्थ – स्थंडिल = यज्ञ, होम इ. करिता केलेला एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, यज्ञपात्र, अंगुळ = बोटाच्या रूंदीचे माप)
रसग्रहण
नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहआरोपी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९१० च्या मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली. तेथील ब्रिक्स्टन जेलमध्ये असतांना ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनींना, अंतिम निरोप म्हणून पाठविली होती.
‘विश्वात आजवरी शाश्वत काय झाले’ या कवितेप्रमाणे ही कविता देखिल ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्तांत निबद्ध आहे. या वृत्ताविषयीची माहिती त्या अंकात आलेली असल्यामुळे द्विरुक्ती टाळून आपण अर्थाकडे वळुया.
या कवितेचे चार भाग असून, ती जवळपास ९५/९६ ओळींची आहे. त्यामुळे आपण त्यातला फक्त तिसरा व चौथा भाग पहाणार आहोत. तथापि पहिल्या दोन भागांचा गोषवारा माहितीसाठी देत आहे.
पहिल्या भागांत कवी आपल्या घराचे वर्णन करून तिथे आजूबाजूचे तरूण, तरुणी कसे जमायचे, वहिनी त्यांना सुग्रास स्वयंपाक करून कशी जेवायला, खायला द्यायची व नंतर अंगणात बसून पारतंत्र्य, अन्याय, जागतिक घडामोडी यावर कशी चर्चा व्हायची, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जमलेल्या तरूणांना मार्गदर्शन कसे केले जायचे, वीररसपूर्ण अशा कविता म्हटल्या जायच्या वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.
दुसर्या भागात आपण केलेल्या प्रयत्नांना केवळ आठ वर्षांतच यश येत असल्याचे पाहून कवी आनंदित आहेत. दीनपणा सोडलेले व वीरश्रीचा संचार झालेले देशातील युवक, युवती स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या धगधगत्या यज्ञकुंडात पहिलं बलिदान देण्यासाठी श्रीरामांनी आमंत्रण दिलेलं असताना, हा बहुमान आपल्या कुटुंबाला मिळावा, ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या आणाभाका आम्ही घेतल्या, त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. असे वीरश्रीपूर्ण निवेदन करून, सावरकर आपल्या वहिनींनी धैर्यानें अशा प्रसंगांना सामोरं जावं, यासाठी त्याचं मनोबल उंचावत आहेत. ते आठवण करून देतात की आपण हे धगधगते सतीचे वाण, आंधळेपणांने किंवा क्षणिक उत्तेजनाने नाही, तर जाणून बुजून, समजून उमजून हाती घेतले आहे.
तिसऱ्या भागात ते म्हणतात की, मातृभूमीलाच मी माझं मन वाहिले आहे. माझं सारं वक्तृत्व, वाङ्मय तिलाच अर्पण केलय. मी, माझं तारुण्य तसेच सगळ्या देहभोगांचं हवन या स्वातंत्र्य यज्ञामधे केलं आहे. देशकार्य हेच देवकार्य समजून, घरदार, पैसाअडका इतकेच नव्हे तर मित्रपरिवार, वडील बंधू, वहिनी, मुलगा, पत्नी यांनादेखील या यज्ञवेदीवर मी ढकलले आहे. आणि आता त्या वेदीवर आहुती म्हणून बळी जाण्यासाठी माझा देहपण मी ठेवला आहे, आमचा निर्वंश झाला तरी चालेल, पण मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आपल्या कुलात नक्कीच ईश्वरी अंश असला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हा आहुतीचा मान मिळाला आहे. आम्ही सात बंधू असतो तरी सर्वांनी देशासाठी बलीदान दिले असते. तरी हे वहिनी, जसे पार्वतीने हिमाच्छादित पर्वतावर तप केलं, जशा हजारो राजपूत स्त्रियांनी हसत हसत अग्निप्रवेश केला, तसेच तुम्ही देखिल या व्रताचे पालन करा. भारतीय स्त्रियांचं तेज लुप्त झालेलं नाही हे दाखवून द्या. इथे कवी, वहिनींना ‘विरांगने’ म्हणून संबोधतात व त्यांना नमन करतात. शेवटी ते पुन्हा एकदा सांगतात की, जर आपण जाणुन बुजून हे सतीचे वाण हातात घेतले आहे, तर अग्नीप्रवेश करण्याची आपली तयारी आहेच. यज्ञवेदीवर चढलो आहोत तर ते हवन होण्यासाठीच!
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈