डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆– क्रमशः भाग पहिला 

(तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.)  – इथून पुढे — 

पुढे भूमध्य समुद्राभोवती ग्रीकांची सत्ता कमी होऊन इटलीच्या बहुईश्वरवादी रोमन लोकांचे साम्राज्य प्रबल होऊ लागले. या रोमन साम्राज्यातील सीझर या महान योध्याचा समकालीन आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या पॉम्पे या महान रोमन सैन्य अधिकाऱ्याने 63BC ला पूर्वेला सम्राज्यविस्तार करताना जेरूसलाम जिंकून घेतले. ज्युंचे राज्य रोमन सम्राज्याचा एक भाग बनले. पुढे सातव्या शतकात मुस्लिम आक्रमण होईपर्यंत ज्युंची मायभूमी रोमन साम्राज्याच्या आधीपत्याखाली राहिली. विद्रोहाची थोडी जरी शंका आली तर रोमन अधिकारी ज्यु लोकांना सुळावर चढवत.  ज्यु लोकांचे येशू वा जीजस नावाचे अतिशय लोकप्रिय रबाय अर्थात धर्मगुरू होते. रोमन लोकांनी विद्रोहाच्या शंकेवरून येशूला सुळावर चढावले. याच येशूपासून इसाई अर्थात ख्रिश्चन धर्माची सुरुवात झाली. येशूच्या जन्मापासून सध्या वापरात असलेली कालगणना अस्तित्वात आली. त्याच्या जन्माआधीच्या काळाला BC तर नंतरच्या काळाला ईसवी सन वा AD असे म्हटले जाते. इसाच्या जन्मापासून सुरु झाले म्हणून ईसवी सन. ई. स. 33 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी येशूला सुळावर दिल्यामुळे ज्यु आणि रोमन संबंध बिघडत गेले. 66AD ला ज्यु लोकांनी उठाव केल्याने रोमन विरुद्ध ज्यु असे युद्ध पेटले. हा उठाव दडपन्यासाठी 70AD ला रोमन सम्राट टायटसला स्वतः यावे लागले. त्याने जेरूसलामला वेढा घालून शेवटी ते जिंकून घेतले. जेरूसलाम शहर तटबंदीसहित जमीनदोस्त करण्यात आले. सोलोमनचे दुसरे मंदिर नष्ट करण्यात आले. हजारो ज्युंची कत्तल केली गेली. बाकी 96 हजार ज्युंना गुलाम बनवून रोमला पाठवले गेले. ज्यु लोकांच्या नशिबी परत वनवास आला. पहिल्या ज्यु-रोमन युद्धामुळे जेरूसलाम मधील बहुतेक ज्यु लोकवस्ती घटली असली तरी ज्यु आपल्या मातृभूमीत परत येत राहिले. ज्यु लोकांनी आपल्या मातृभूमीत परत 50 मोठया वसाहती आणि जवळपास 985 मोठी खेडी वसवली. पण आता रोमन लोकांनी ज्यु लोकांना दडपून ठेवले होते. इतकेच नव्हे तर सोलोमनच्या भग्न मंदिराच्या जागी आता अपोलो या रोमन देवाचे मोठे मंदिर उभे केले गेले होते.

या धार्मिक दडपशाही विरुद्ध 132 AD मध्ये परत ज्यु लोकांनी रोमन सम्राज्याविरुद्ध उठाव केला. त्याला ‘बार कोखबा उठाव’ असे म्हणतात. रोमन सैन्याने सर्व ज्यु वस्त्या उध्वस्त केल्या. 5 लाख 80 हजार ज्युंची कत्तल केली गेली. उरलेले अनेक युद्धानंतर येणाऱ्या रोगाराई आणि दुष्काळात मारले गेले. जे वाचले ते गुलामगिरीत विकले गेले. ज्यु लोकांना जेरूसलाम मध्ये प्रवेश निश्चिद्ध केला गेला. रोमन सम्राट हेड्रीयन याने ज्युंच्या पवित्र मायाभूमीला मुद्दाम ज्युंच्या पारंपरिक शत्रूदेशाचे म्हणजे पॅलेस्टीनचे नाव दिले. हा भाग आता सिरिया-पॅलेस्टीना म्हणून ओळखला जाऊ लागला. हा उठाव ज्यु लोकांसाठी अतिशय विध्वंसक ठरला. तरी प्रकरण शांत झाल्यावर ज्यु परत मातृभूमीकडे परतू लागले. पुढे सातव्या शतकात रोमन जेरूसलामवर मुस्लिम आक्रमण झाले तेव्हा दीड लाख ज्यु तेथे राहत होते.

एकाच मुळातून उगवले असले आणि आधीचे सर्व प्रेषित सामान असले तरी जीजसला प्रेषित मानन्यावरून आणि धर्मपरिवर्तन प्रचाराच्या मुद्द्यावर हळूहळू इसाई धर्म ज्यु धर्मापासून वेगळा होत गेला. ज्यु लोकांमध्ये ‘प्रोसेलीटीझम’ अर्थात प्रयत्नपूर्वक धर्मपरिवर्तन निशिद्ध मानले जाते. याउलट ख्रिश्चन लोक धर्मप्रचार करण्याला कर्तव्य मानतात. या सतत होणाऱ्या प्रयत्नामुळे इसाई धर्म हळूहळू वाढत गेला.

इस 313 मध्ये रोमन सम्राट कोन्स्टंटीनने एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजारहित धर्माचे समाज संघटनातील महत्व ओळखले. एकेश्वरवादी धर्मामुळे प्रजा संघटित होते. अशी संघटित प्रजेचे नेतृत्व करणे हा सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा तसेच मिळालेले टिकवण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. अशी संघटित प्रजा शत्रूचा कडवा प्रतिकार करून आपल्या धर्माचे, राज्याचे आणि पर्यायाने राजसत्तेचे रक्षण करते. धर्मप्रसारचे निमित्त करून राज्यविस्तरही करता येतो. ग्रीक-रोमनांचे परंपरिक शत्रू असलेल्या पर्शीयाने सम्राट सायरस महान पासूनच एकेश्वरवादी झोरीयास्ट्रीयन म्हणजे सध्याच्या पारशी धर्माला सम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली होती. आधी ज्यु नंतर पारशी राजकारणी लोक जनतेची धार्मिक ओळख वापरून सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा हा खेळ आधीच शिकले होते. रोमन लोकांना हा खेळ उशिरा कळला. चाणाक्ष कोन्स्टंटीनने प्रथम हा खेळ ओळखला. आपल्या वाढवडिलांचा अनेक ईश्वरांना मानणारा धर्म सोडून त्याने वेगाने वाढणारा इसाई धर्म स्विकाराला. ख्रिश्चन या खेळत एक पाऊल पुढे गेले. पण ज्यु आणि पारशी लोकांमध्ये धर्माप्रचार करून धर्मांतर करणे निशिद्ध होते. ख्रिश्चनांनी धर्मांतर करणे निशिद्ध तर ठेवले नाहीच पण धर्मांतरासाठी चर्चची खास यंत्रणा कामाला लावली. इसाई धर्माला राजाश्रय मिळाल्याने आणि धर्मांतरासाठी प्रयत्न होऊ लागल्याने इसाई धर्माचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. तिकडे पर्शिया म्हणजे सध्याच्या इराण मध्ये एकेश्वरवादी पारशी धर्माने अनेक वर्षांपासून आपला जम बसवलेला होता. पर्शिया आणि ग्रीक-रोमन लोकांमध्ये वर्षानुवर्षे हाडवैर चालू होते. सध्याच्या सिरिया आणि इराक मधील सीमा या दोन महासत्तांच्या मधील सीमा होती. आता दोन्हीकडील महासत्तामध्ये राजकीय युद्धाऐवजी धर्मयुद्ध होऊ लागले. दोन्ही कडील कडवे सैनिक एकमेकांशी लढताना माघार घेण्यास तयार नसत. प्रचंड मनुष्यहानी होई. त्यामुळे दोन्ही महासत्ता हळूहळू कमजोर होऊ लागल्या. 

तिकडे दक्षिणेला अरबस्थानच्या वाळवंटात ई स 570 मध्ये मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म झाला. वाळवंटातील अरब मूर्तिपूजक आणि अनेक ईश्वरांना मानणारे होते. व्यापारानिमित्र पैगंबर साहेबांचे सिरियाला वारंवार जाणे होई. समाजाला संघटित करुन सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी मूर्तिविरहित एकेश्वरवादी धर्माचा कसा उपयोग होतो हे मुहम्मद पैगंबरांच्या चाणक्ष्य बुद्धीने लवकरच ओळखले. मग त्यांनी अरबस्थानात आपल्या वेगळ्या एकेश्वरवादी संघटित धर्माचा प्रचार सुरु केला. आपल्या नव्या धर्माला इस्लाम असे नाव दिले. धर्म निर्माण करताना त्यांनी फारशी वेगळी मेहनत घेतली नाही. ज्यु आणि इसाई लोकांच्या एकेश्वरवादी धर्मग्रंथातील प्रेषित आणि पैगंबरांच्या गोष्टी त्यांनी इस्लाममध्ये जशाच्या तश्या घेतल्या. अगदी देवदूतही तेच ठेवले. फक्त ज्यु आणि इसाई लोकांच्या देवांच्या ऐवजी अरबी भाषेतील अल्लाह हा देवच एक खरा परमेश्वर आहे असे त्यांनी कुरानात म्हटले.अल्लाहने या आधी धाडलेल्या प्रेषितांनी दिलेला अल्लाचा संदेश लोकांनी भ्रष्ट केला आहे. आपल्याला कुरानाच्या रूपाने अल्लाने दिलेला संदेश हा कधीही भ्रष्ट न होणार अंतिम संदेश असेल असे त्यांनी जाहीर केले.

मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यू नंतर इस्लामच्या अनुयायांनी मौखिक कुराण एकत्रित करून लिहुन काढले. मी असे म्हटलो होतो किंवा नव्हतो असे म्हणायला त्या वेळी पैगंबर हजर नव्हते. लिखित कुरानात जुन्या एकेश्वरवादी धर्मात बदल करून सत्ता आणि संपत्तीचा हा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला गेला..

1)  धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा प्रमुख एकच असल्याने दोन्ही सत्ता एकाच माणसाचे हित पाहू लागल्या. त्यामुळे दोन्ही सत्तांचे एकमेकांवर नियंत्रण ठेवणे बंद झाले आणि दोन्ही सत्ता निरंकुश झाल्या. राजसत्ता आता कुठल्याही राजकीय युद्धाला धर्मयुद्ध ठरवू शकत होती. 

2)  प्रत्येक मुसलमानासाठी धर्मप्रचाचारार्थ जिहाद करणे कर्तव्य ठरवले गेले. त्यामुळे प्रत्येक सामान्य मुसलमान इस्लामचा कडवा सैनिक झाला. 

3) इस्लामी राजवटीत इतर धर्मांचे सहअस्तित्व जवळपास अमान्य केले गेले. मूर्तिपूजाकांपुढे आणि बहुईश्वरवादी लोकांपुढे धर्मांतर वा मृत्यू हे दोनच पर्याय शिल्लक ठेवले. एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजक नसलेल्या लोकांनाही झिजिया दिला तरच इस्लामी राष्ट्रात राहता येणे शक्य होते.

4) पुरुषप्रधान संस्कृतीत धर्मांतरचा निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना असल्याने इस्लाम धर्मात पुरुषांना अनेक वाढीव अनैतिक प्रलोभने नैतिक करून दिली गेली. तसेच युद्धानंतर लोकांची संपत्ती लूट, निहत्या लोकांची हत्या, आणि युद्धात हाती लागलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवणे अशा युद्ध अपराधांना धार्मिक नैतिकतेची बैठक दिली गेली. या प्रलोभनांमुळे पटपट धर्मपरिवर्तन होऊ लागले. युद्धात मेले तर जन्नत मध्ये या पेक्षा जास्त मज्जा मिळेल याचे वचन इस्लाम देतो. मुसलमान पृथ्वीवर दुःख भोगायल आला आहे आणि खरे जीवन तर मेल्यावर तिकडे स्वर्गात सुरु होणार आहे अशी शिकवण इस्लाम देतो. त्यामुळे मुसलमान मनुष्याची युद्धात मृत्यूची भीती कमी होते. काहींना तर शाहिद होऊन पटकन स्वर्गात जाण्याची आत्मघाती ओढ लागते. या सर्वांमुळे मुस्लिम पुरुष सदा युद्धासाठी उतावळे राहू लागले. असे ब्रेन वॉश झालेले कडवे मूठभर मुस्लिम योद्धे जिहादच्या वेडात आपल्यापेक्षा संख्येने खूप जास्त असलेल्या शत्रू सैन्याला जाऊन भिडत आणि कटून मरत. पण मरण्याआधी ते शत्रूचे बरेच नुकसान करून मरत असत. त्यामुळे मुस्लिम सैन्याला त्यांच्यासारखा त्याग करण्यास प्रोत्साहन मिळे आणि शत्रूचे मनोधैर्य खचे. त्यांचा उपयोग मुस्लिम राजकर्त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी मोठया प्रमाणात करून घेतला. साम्राज्य विस्ताराचे प्रत्येक युद्ध जिहाद म्हणून घोषित केले गेले.

ज्यु आणि इसाई लोकांनी हा नवा धर्म स्वीकारावा यांसाठी या जुन्या धर्मांमधील प्रेषित इस्लामात घेतले गेले. पण सोबत जुन्या धर्माला काळानुरूप भ्रष्ट झाल्याचे सांगून इस्लाम या आपल्या परमेश्वराशी इमानदार असलेल्या एकमेव धर्मात वेगळेपण निर्माण करून धर्मांतराला पर्याय शिल्लक ठेवला नाही. अब्रहम, इसाक, जेकब, मोजेस, डेव्हिड, सोलोमन या ज्यु पैगंबरांना कुराणकारांनी अनुक्रमे इब्राहिम, इसा, याकूब, मुसा, दाऊद, सुलेमान अशी अरबी नावे दिली. मुहम्मद पैगंबरांच्या काळी अरबस्थानात काही ज्यु कबिले आणि काही ख्रिश्चन लोक राहत होते. भविष्यात प्रेषित येणार आहे अशी त्यांची श्रद्धा होती. इस्लाम हे ज्यु आणि ख्रिश्चन धर्माचेच सुधारित रूप असल्याचा प्रचार करत असल्यामुळे मदिनेतील सधन आणि प्रतिष्ठीत ज्यु लोक आपल्याला पटकन पैगंबर मानतील अशी मुहम्मद पैगंबरांची अपेक्षा होती. त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments