डाॅ. मीना श्रीवास्तव
मी प्रवासिनी
☆ मनोवेधक मेघालय…भाग -३ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग व मेघालयाच्या कुशीतले लिव्हिंग रूट ब्रिज)
प्रिय वाचकांनो,
कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मॉलीन्नोन्गच्या निमित्याने आपणा सर्वांना ही सफर आनंददायी वाटत आहे, याचा मला कोण आनंद होत आहे!
तर मॉलीन्नोन्गबद्दल थोडके राहून गेले सांगायाचे, ते म्हणजे इथले जेवण अन नाश्ता. माझा सल्ला आहे की इथं निसर्गाचेच अधिक सेवन करावे. इथे बरीच घरे (६०-७०%) होम स्टे करता उपलब्ध आहेत, अग्रिम आरक्षण केले तर उत्तम! मात्र थोडकी घरे (मी पाहिली ती ४-५) जेवण व नाश्ता पुरवतात! जास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी अन चहा-कॉफी, इथे नाश्त्याची यादी संपते! तर जेवणात थाळी, २ भाज्या (त्यातली एक पर्मनन्ट बटाट्याची), डाळ अन भात, पोळ्या एका ठिकाणी होत्या, दुसरीकडे ऑर्डर देऊन मिळतात. जेवणात नॉनवेज थाळीत अंडी, चिकन आणि मटन असतं. हे घरगुती सर्विंग टाइम बॉउंड बरं का. जेवणाचे अन नाश्त्याचे दर एकदम स्वस्त! कारभार कारभारणीच्या हातात! इथे भाज्या जवळच्या मोठ्या गावातून (pynursa) आणतात, आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजारातून! सामानाची ने-आण करण्यासठी बेसिक गाडी मारुती ८००!. मुलांची मोठ्या गावात शिक्षणाकरता ने-आण करण्यासाठी पण हीच, पावसाळी वातावरण नेहमीचेच अन दुचाकी मुळे अपघात होऊ शकतात, म्हणून गावकरी वापरत नाहीत, असं कळलं. इथे ATM नाही, नेटवर्क नसल्यामुळे जी पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे उपयोगाचे नाहीत. म्हणून आपल्याजवळ रोख रक्कम हवीच!
स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)
या भागात फिरतांना बांगला देशाची सीमा वारंवार दर्शन देते. मात्र बांगलादेशाचे दर्शन घडवणारा एक स्काय पॉईंट अतिशय सुंदर आहे. मॉलीन्नोन्गपासून केवळ दोनच किलोमीटर असलेला हा पॉईंट न चुकता बघावा. बांबूने बनलेल्या पुलावरचा प्रवास मस्त झुलत झुलत करावा, एका ट्री हाऊस वरील ह्या पॉईंटवर जावे अन समोरचा नजारा बघून थक्क व्हावे. हा पॉईंट ८५ फूट उंच आहे, संपूर्ण बांबूने बनवलेला अन झाडांना बांबू तसेच जूटच्या दोरांनी मजबूत बांधलेला हा इको फ्रेंडली पॉईंट, समोरील नयनरम्य नजाऱ्यांचे फोटो काढणे आलेच! मात्र सेल्फी पासून सावधान, मित्रांनो! येथून सुंदर मावलींनॉन्ग दिसतेच शिवाय बांगलादेशची सपाट जमीन व जलसंपदा यांचेही प्रेक्षणीय दृश्य दिसते!
सिंगल डेकर अन डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय पर्यटनाचा अविभाज्य भाग आहेत जिवंत पूल! अन ते पाहिल्यावर कवतिकाचे आणि प्रशंसेचे पूल बांधायला पर्यटक मोकळे! म्हणजे जुन्या झाडांची मुळे एकमेकात “गुंतता हृदय हे” सारखी हवेत, अर्थात अधांतरी (आणि एखाद-दुसरी चुकलेल्या पोरांसारखी जमिनीत) अशी गुंतत गुंतत जातात, अन हे सगळं घडतं नदीपात्राच्या साक्षीनं, “जलगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” असं गुणगुणत! जसजशी वर्षे जातात, जलाचा अन प्रेमाचा शिडकावा मिळतो, तसतशी ही मुळे जन्मोजमीच्या ऋणानुबंधासारखी एकमेकांना घट्ट कव घालतात अन दिवसागणिक घालताच राहतात, मित्रांनो, म्हणूनच तर हे “लिव्हिंग रूट ब्रिज”, अर्थात जिवंत ब्रिज आहेत, काँकिटचे हृदयशून्य ब्रिज नव्हे, अन यामुळेच आपल्याला दिसतो तो प्रेमाच्या घट्ट पाशासारखा मजबूत जीता जागता मूळ पूल!
आता या मुळांच्या पुलाची मूळ कथा सांगते! साधारण १८० वर्षांपूर्वी मेघालयच्या खासी जमातीतील जेष्ठ व श्रेष्ठ लोकांनी नदी पात्राच्या अर्ध्या अंतरापर्यंत अधांतरी आलेली रबराच्या (Ficus elastica tree) झाडांची मुळे, अरेका नट पाम (Areca nut palm) जातीच्या पोकळ छड्यांमध्ये घातली, नंतर त्यांची निगा राखून काळजी घेतली. मग ती मुळे, (अर्थातच अधांतरी) वाढत वाढत विरुद्ध किनाऱ्यापर्यंत पोचलीत. तीही एकेकटी नाहीत तर एकमेकांच्या गळ्यात अन हातात हात गुंफून. या रीतीने माणसांचे वजन वाहून नेणारा आगळावेगळा असा या जिवंत पूल माणसाच्या कल्पनाशक्तीतून तयार झाला! आम्ही पाहिलेल्या सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजला मजबूत बनवण्यासाठी भारतीय लष्कराने बांबूचे टेकू तयार केलेत. हे आश्चर्यकारक पूल पाहण्याकरता पर्यटकांची संख्या वाढतेच आहे! म्हणूनच असे आधार आवश्यक आहेत, असे कळले. नदीवर असा एक अधांतरी पूल असेल तर तो असेल सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, मात्र एकावर एक (अर्थात अधांतरी) असे दोन पूल असतील तर तो असेल डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मी केवळ डबल-डेकर बस पाहिल्या होत्या, पण हे प्रकरण म्हणजे खासी लोकांची खासमखास मूळची डबल गुंतवणूक! खासी समाजाच्या त्या सनातन बायो इंजिनीयर्सला माझा साष्टांग कुमनो! असे कांही पूल १०० फूट लांब आहेत. ते सक्षमरित्या साकार व्हायला १५ ते २५ वर्षे लागू शकतात, एकदाची अशी तयारी झाली, की मग पुढची ५०० वर्षे बघायला नको! यातील कांही मुळे पाण्याच्या सतत संपर्कामुळे सडतात, मात्र काळजी नसावी, कारण इतर मुळे वाढत जातात अन त्यांची जागा घेऊन पुलाला आवश्यक अशी स्थिरता प्रदान करतात. हीच वंशावळ खासियत आहे जिवंत रूट ब्रिजची! अर्थात हा स्थानिक बायो इंजिनिअरींगचा उत्तम नमुनाच म्हणायला हवा. काही विशेषज्ञांच्या मते या परिसरात(बहुदा चेरापुंजी आणि शिलाँग) असे शेकडो ब्रिज आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत पोचणे हे खासी लोकांचच काम! फार थोडे पूल पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, कारण तिथं पोचायला जंगलातील वाट आपली सत्वपरीक्षा पाहणारी, कधी निसरड्या पायऱ्या तर कधी दगड धोंडे तर कधी ओल्या मातीची घसरण!
या सर्वात “नव नवल नयनोत्सव” घडवणारा, पण ट्रेकिंग करणाऱ्या भल्या भल्या पर्यटकांना जेरीस आणणारा पूल म्हणजे “चेरापुंजीचा डबल डेकर (दोन मजली) लिव्हींग रूट ब्रिज!” मंडळी आपण शक्य असल्यास हे (एकाखाली एक ऋणानुबंध असलेले) चमत्काराचे शिखर अन मेघालयची शान असलेले “डबल डेकर लिव्हींग रूट ब्रिज” नामक महदाश्चर्य जरूर बघावे! मात्र तिथे पोचायला जबरदस्त ट्रेकिंग करावे लागते. मी मात्र त्याचे फोटो बघूनच त्याला मनोमन साष्टांग कुमनो घातला! ‘Jingkieng Nongriat’ हे नाव असलेला, सर्वात लांब (तीस मीटर) असा हा जिवंत पूल २४०० फूट उंचीवर आहे, चेरापुंजीहून ४५ किलोमीटर दूर Nongriat या गावात! हे पूल “जागतिक वारसा स्थळ” म्हणून घोषित केलेले आहेत.
मित्रांनो असा कुठलाही जिवंत पूल नदीवर लटकत असतो, नदीजवळ पोचायला वरच्या पर्वतराजीतून (उपलब्ध) वाटेने खाली उतरा, पूल बघा, जमत असेल तर देवाचे अन गाईडचे नाव घेत घेत तो पूल पार करा, वनसृष्टीचा आनंद घ्या. गाईडच्या किंवा स्थानिकांच्या आदेशाप्रमाणेच पाण्याजवळ जाणे, उतरणे वगैरे कार्यक्रम उरका अन पर्वताची चढण चढा! हे जास्त दमवणारे, कारण उत्साह कमी अन थकवा जास्त! सोबत पेयजल अन जंगलातलीच काठी असू द्यावी. कॅमेरा अन आपला तोल सांभाळत, जमेल तसे फोटो काढा! (सेल्फीचे काम जपून करावे, तिथे जागोजागी सेल्फी करता डेंजर झोन निर्देशित केले आहेत, “पण लक्षात कोण घेतो!!!”)
मॉलीन्नोन्गपासून रस्ता आहे सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज बघायचा! मेघालयातील हे अप्रूप पहिल्यांदा बघितल्यावर त्या पुलावर चालतांना आपण कुणाच्या हृदयावर घाला घालीत आहोत असा मला खराखुरा भास झाला! आम्ही सिंगल रूट ब्रिज बघितला, तिथे जायला दोन रस्ते आहेत, मॉलीन्नोन्गपासून जाणारा कठीण, बराच निसरडा, वेडावाकडा, पायऱ्या अन कठडे नसलेला, रस्त्यात लहान मोठे दगड. मी मुश्किलीने तो पार केला. दुसऱ्याच दिवशी एक अजून ब्रिज बघायच्या तयारीने मालिनॉन्ग मधून बाहेर पडलो, Pynursa पार केलं, इथल्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ होते. या मोठ्या गावात ATM तर आहे, पण कधी बंद असते, कधी मशीन मध्ये पैसे नसतात, म्हणून आपल्याजवळ कॅश हवीच! Nohwet या ठिकाणून खाली चांगल्या कठड्यांसहित असलेल्या पायऱ्या उतरून पोचलो तर काय, कालचाच सिंगल रूट ब्रिज दिसला की! हे डबल दर्शन सुखावणारे होते, पण इथे येणारा हा (आपल्या माहितीसाठी) सोपा मार्ग गावला.
आम्ही Mawkyrnot या गावातून वाट काढत अजून एक सिंगल रूट ब्रिज बघितला. हे गाव पूर्व खासी पर्वतातील Pynursla सब डिव्हिजन येथे वसलेले आहे. नदीकाठी पोचायला चांगल्या बांधलेल्या अन कठडे असलेल्या १००० च्या वर पायऱ्या उतरून आम्ही खाली पोचलो. पुलाच्या नावाखाली (पण नदीच्या वर तरंगत असलेला) ४-५ बांबूचा बनलेला झुलता पूल पाहून, मी याच किनारी थांबले! माझ्या घरची मंडळी (मुलगी, जावई अन नात) स्थानिक गाईडची मदत घेऊन उस-पार पोचलेत अन तिथले निसर्ग दर्शन घेऊन तिथून (बहुदा २० मीटर अंतरावरच्या) दुसऱ्याच तत्सम पुलावरून इस-पार परत आलेत. तवरीक मी इकडे देवाचे नाव घेत, जमेल तसे त्यांचे अन पुलाचे फोटो काढले. या स्थानिक गाईडने मला पायऱ्या उतरणे अन चढणे यात खूप मदत तर केलीच पण माझे मनोबल कित्येक पटीने वाढवले. या अतिशय नम्र अन होतकरू मुलाचे नाव Walbis, अन वय अवघे २१! दुपारी जेवणानंतर माझ्या घरच्या मंडळींना या पेक्षाही जास्त काठिण्यपातळी असलेल्या शिलियांग जशार (Shilliang Jashar) या गावातील बांबू ब्रिजवर जायचे होते, मी मात्र गाईडच्या सल्ल्यानुसार व माझ्या आवाक्यानुसार त्या पुलाच्या वाटेकडे वळलेच नाही.
प्रिय वाचकहो, पुढील प्रवासात आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. तयारीत ऱ्हावा
तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
टीप – लेखातील माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈