श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको-मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला. हाँलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटलं. लग्न लागायला फक्त पंधरा मिनिटं बाकी असतांना उपस्थिती एवढी कमी कशी? त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणूकीत गेल्यामुळे हाँल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हाँलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं.

“तुम्हांला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाहिये” नरेश जरा अवघडून बोलला

“काय राव नरेश मला ओळखलं नाही? अरे मी सुनिल भागवत. आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं? “

नरेशच्या डोक्यात ट्युब पेटली.

“हो हो आठवलं. अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण!अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस? आपण तर एकाच वयाचे असू ना? “

“यार किती वर्षांनी भेटतोहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास? “सुनीलने त्याला उठून आलिंगन दिलं.

“चल बसून निवांत बोलूया. लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे”

दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला “बघ यार सुनील या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही. उशीराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला? “

“जाऊ दे रे. हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना नाचण्याचा. करु दे त्यांना भरपूर एंजॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एंजॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का? आणि बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर्ड झालोय. तुझं काय? अजून करतोच आहेस का नोकरी? “

” नाही रे. मीसुध्दा रिटायर झालोय. पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर्ड होतांनाही शिक्षकच होतास का? “

” शेवटची दोन वर्ष हेडमास्तर होतो. म्हणजे तसा शिक्षकच”

” तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दँटस् ए व्हेरी बोअरिंग जाँब. त्यात काही थ्रिल नाही, चँलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत. मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येतंय. दारु पिणं काय!विद्यार्थीनींवर बलात्कार काय!बापरे!या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र पार बदनाम करुन टाकलंय”

सुनील चिडला नाही. हसून म्हणाला,

‘ शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करुन घेतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारीत्र्यहिन  शिक्षकच आले असतील. त्यातून वीसपंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणूका आहेत, वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरव्हिजन आहे, पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं नाही. बरं मला एक सांग, तू कुठल्यातरी सरकारी खात्यात होतास ना? “

” हो मी सुपर क्लास वन आँफिसर होतो. खरं तर एक मामुली क्लार्क म्हणून मी नोकरी ची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लासवन आँफिसर झालो” नरेश अभिमानाने म्हणाला ” आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करुन घेणं किती अवघड आणि चँलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत”

” वा खुप छान. पण मलाही तेच म्हणायचंय. तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का? “

” अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणंघेणं नसतं”

” शिक्षकांचीही तीच परीस्थीती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पुर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासतात. त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्दयावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आपली किंमत कळते”

” पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे. माझ्याकडे बघ. मला नोकरीत असतांना किती मानमरातब मिळायचा. शिवाय माझा पगार, वरची कमाईही भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे, आलिशान गाडी आहे. मुंबई पुण्यात लक्झरीयस फ्लँट आहेत. दोन्ही मुलं बंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रग्गड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय. तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे? “

नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं. तो हलकसं हसला आणि म्हणाला

” या अगोदरही फाँरेनला कुठे गेला होतास? “

नरेशने नकारार्थी मान हलवली

“जमलंच नाही रे. कामात खुप बिझी असायचो. क्लास वन आँफिसरला वेळ कुठून असणार? “

सुनीलने स्मित केलं

” नरेश मी एकवीस देशात फिरुन आलोय. “

 काय्य!!!काय सांगतोस? “आ वासून नरेश त्याच्याकडे पाहू लागला

“हो नरेश. तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय. मागच्याच महिन्यात मी कोरीयाला जाऊन आलो”

नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरुन तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं.

” बरं मला एक सांग भारतात तू कुठंकुठं जाऊन आलाहेस” सुनीलने विचारलं

” महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरु असं ठरवलं होतं”

” तुला काही आजारबिजार आहेत? “

“आहेत ना. बीपी आणि डायबेटीस. कोलँस्ट्रोलही वाढलंय. कारे असं का चारतोस? “आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरुन हात फिरवत नरेशने विचारलं

“नरेश अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीसा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? मला सांग गोव्यातल्या बिचवरच्या सुंदर मुलींना पाहून तुला आता काय मजा वाटणार आहे? उत्तराखंडमधल्या व्हँली आँफ फ्लाँवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेलास तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस. ही प्रेक्षणीय स्थळं पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत. नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहिसा झालेला असतो. “

नरेश चिडून म्हणाला

“मला एवढं लेक्चर देतोहेस. तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का? “

सुनील हसला.

” नरेश शिक्षकी पेशा मी जाणूबुजून स्विकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं. त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्नं पहात होतो. घरच्या गरीबीमुळे ते शक्य नव्हतं. पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित, विज्ञान हे माझे आवडते विषय. त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खुप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खुप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करुन मी अख्खा भारत पालथा घातला. या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं. सायकल काढली. ग्रुप जमा केला. सायकलने नेपाळला जाऊन आलो”

“बापरे नेपाळला? “नरेश थक्क होऊन म्हणाला.

“नुसतं नेपाळच नाही तर, गोवा, लडाख, अरुणाचल, मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो. युरोपलाही जाणार होतो पण पैशांअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहीत भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय. राँक क्लायंबिंग, रँपलिंग, व्हँली क्राँसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहित होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत  नाहीत म्हणून मी तारुण्याचा पुरेपुर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मँनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतो. त्यामुळे मँनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले. अर्थात मी ते कधी मनावर घेतलं नाही. मी माझ्या पध्दतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो. तू ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’हा पिक्चर बघितलाय? “

“नाही “

” जरुर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल”

” पण कारे इतकं सगळं करत असतांना तुझं घरादाराकडे दुर्लक्ष होत असेल? “नरेशने विचारलं.

“अजिबात नाही. कारण मी या गोष्टी सुट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही. घर, परीवार, छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरुन जगलो. संगीताचीही मला आवड होती. माझा आवाज चांगला नव्हता. त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्यं शिकलो. बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन ही वाद्यं वाजवण्यात पारंगत झालो”” पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा? ” नरेशने विचारलं. 

—-पश्चात्ताप—-  क्रमश: भाग 1 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments