श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
कसं असतं ना!.. जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना!.. जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं!… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं.. असा माझा हट्टही असतो ना!.. पण कसं असतं नां!!
… शब्दांच्या भोवऱ्यात मी अडकून तुम्हाला कोड्यात टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही… चित्र जरी एक अल्लड बालिकेचे तुम्हास दिसत असले… तरी मी काही आता बालिका राहिली नाही.. हि बालिका आता याच वयाच्या बालिकेची मातेच्या रूपात आहे… आणि आणि तिला आता तिचाच भुतकाळ सतत तिची आताची बालिका सारखी सारखी नजरेसमोर आणून दाखवत असते…
आता कळतयं आपण जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा असतो… आईचं तेव्हाचं आपल्याशी एकंदरीत वागणं किती बरोबर होतं ते.. बाई गं मुलीच्या जातीला असलं वागणं शोभायचं नाही बरं.. हे तिचं सतत उपदेश पर चौविसतास बोलणं मनाला मुरड घालायचं… आवडायचं तर मुळीच नाही.. भांडणाची चकमक उडाली नाही असा एक दिवस कधीही सरला नाही… चंद्र सूर्य यांच्या झांंजावादनाने दिवस रात्र सरसर सरले… आईचं बरोबर होतं हे कळले आणि पटलेही.. आणि माझं …
… आणि माझं किती किती चुकीचं आहे हे आता माझीच मुलगी जेव्हा मला सांगू लागली तेव्हा… माझ्या आईचं म्हणणं मला सतत आठवतं राहिलं..कसं असतं नां.. आणि आता पुढे माझी मुलगी जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा येईल तेव्हा मी किती बरोबर होते हे तिला कळेल…. आणि तिचं किती…
कसं असतं नां… जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना… जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं..पण पण.. कसं असतं नां….
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈