श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर

परिचय :  

महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे काम केले आहे.

युवकांनी देशसेवेसाठी दोन वर्ष पुर्ण वेळ द्यावे, या बाळासाहेब देवरसांच्या आवाहनानुसार पहिले चार महिने आसाम ला व नंतर मध्यप्रदेशात अभाविप चे काम केले.

कामासाठी होशंगाबाद जिल्हा मिळाला असता एका आक्रमणकाऱ्याचे नाव आपण आपल्या सुंदर शहराला का देतो, असे म्हणत, “होशंगाबाद नहीं नर्मदापुर कहो!” हे अभियान सुरू केले. त्याला ३१ वर्षांनी यश आले व होशंगाबाद चे नामांतरण नर्मदापुरम् झाले. या नामांतरणादरम्यान भव्य मंचावर अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.

आजकाल नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांना संगठित करत, माझी गावनदी हीच माझी नर्मदा हे अभियान चालवतो. यासाठी गुगलमिटवरून नर्मदाष्टक उपासना मंडळ चालवतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गावांमध्ये गावनदी अभियान सुरू झालेले आहे.

व्यवसाय – मुद्रण

छंद – स्वदेशी चळवळी अंतर्गत हेअर आॅईल शिकाकाई शाम्पू, दंत मंजन व आंघोळीचे नदीपुरक साबण बनवत असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆

वय केवळ ११७ वर्ष

केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. साम टिव्ही मराठी वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.

असाच एक मेसेज आला….. 

डाॅक्टर स्वामी केशवदास.

करनाली, तालुका डभोई, जिला बड़ौदा, गुजरात.

इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” तर ते म्हणाले की, “गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता!”

मी त्यांना माझे नर्मदा मैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवलेत. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

(सततचे फोन व मेसेजेस मध्ये गुंतून पडल्याने दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, केंव्हाही फोन करा.

आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधु भगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.

रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटस ॲप चॅटिंग मुळे माझ्या जवळ सेव्ह होता. स्क्रिनवर नाव आले. #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.

मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमा की बेधुंद तमाशे’  हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी साम टिव्ही मराठी वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेंव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता.

स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.

म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूल मध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षापर्यंत प्रख्यात हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रिया योगाची दिक्षा घेतली आहे. 

मी सहजच त्यांना विचारले, “स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”

“१९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….

“स्वामीजी आपकी उम्र कितनी है? ” मी आतुरतेने नव्हे अधिरतेने विचारले…

“११७ वर्ष “

“ क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”

मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅराफिट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.

मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आहे, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”

“सन १९०५” ते उत्तरले.

माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो….. १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्ष. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्ष….. म्हणजे ११७ वर्ष बरोब्बर होते.

गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…

तिथूनच मी नर्मदा मैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधा यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्ष विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभुतीने मला स्वतःहून फोन करून तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.

पण…. 

माझे हे चक्रावणे येवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.

मी त्यांना त्यांच्या आश्रमा बद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील….

ते म्हणालेत, “नर्मदाजी के दोनो तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रम में मंदिर बनाने की जगह मैने २००, २५० काॅट के अस्पताल बनवाये है। पर इसकारण आप मुझे नास्तिक मत समझना। “

त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले. “हमारे तीन आश्रम में ही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकी में अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबन के कार्य चलते है। हमारे किसी भी आश्रम में दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्ट में जो पैसा है, उसके ब्याज पर हमारे सब कार्य चलते है।”

मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की, दिःग्मुढ, हेच मला कळत नव्हते.

काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो,” आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते। “

ते म्हणालेत, “हां ठिक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसूर के महाराजा के कुलपुरोहित थे।”

अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…

मी विचारले, “आपके दादाजी कौन थे? “

“पंडित मदन मोहन मालवीय!”

” क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.

“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.

“हां!  मेरे दादाजी बॅरिस्टर थे…. ” ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागलेत.

थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणालेत, “आप परिक्रमा के बारे में जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरू आज्ञा के बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “

मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले.

पुढे ते म्हणालेत,”मै अब तक खुद होकर केवल “राहूल बजाज” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापर के लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिक ही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोन से बात कर रहा हूं।”

नर्मदा मैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला यावर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण नर्मदापुरम् होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते.

आता राहूल बजाज यांचे शिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.

मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, “परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वर (विमलेश्वर) ला परिक्रमावासींना तीन चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साटेलोट्यांचा त्रास पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”

स्वामीजी म्हणालेत,”अभी गुजरात मे चुनाव का मौसम चल रहा है। चुनाव होने के पंद्रह बीस दिन बाद अपने उस समय के मुख्यमंत्री से ही सिधी बात करेंगे। विमलेश्वर में बडा आश्रम तो हम खुद ही बना देंगे। “

गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर/विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतीत होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.

अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रिम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर, पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदा प्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता. 

नर्मदा मैय्या के मन में क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है! 

नर्मदे हर ! नर्मदे हर! नर्मदे हर !

© श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर,

नागपूर

मो – 9850352424

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments