डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “
“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.”
“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते
मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे? संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले नीताचे.
“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,
नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”
सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.”
पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !
माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.
नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि नीताचे भाऊ भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची. सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?” रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच.
त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार.. नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही.
नीताला ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या.
क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈