जीवनरंग
☆ नशीब – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पध्दतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले. सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली. सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे. ते घेऊन ती घरी आली.
घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले. सखू म्हणाली, “ वहिनी, लेकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं. थोडे पैसे उसने द्या.” ती म्हणाली, “ हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे. ते मी तुला देईन. ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस.”
सखू म्हणाली, “नको वहिनी. या महिन्याची फी द्या. पुढचं काहीतरी करून जमवेन मी. आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर. विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून. कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल. पै पै जमवून बायका दागिना बनवतात तो मी कसा वापरणार?”
वहिनी म्हणाली,” छान आहे ग आयडिया.” तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुक वर लिहली.
दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे. असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते.
ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली. तिनं दुसरं कानातलं दाखवलं. वहिनीनं सखूला बोलावलं आणि कान्हेरे बाईंना सांगितलं, “ तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरका.” व सारी हकीकत सांगितली.
कान्हेरे बाई खूष होऊन सखू ला म्हणाली, “थॅंक्यू सखू. तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आजीचं कानातलं आहे. तिची आठवण आहे ही. कानातून पडल्यापासून चैन नव्हतं मला. सगळीकडे शोधून आले. आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला. कसे तुमचे आभार मानू? बक्षिस काय देऊ तुम्हाला?”
वहिनी म्हणाली, “ललिता ताई तुम्हीच त्या नव्या १२ वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना? तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे!”
“ हो. मीच ती ललिता कान्हेरे. आजीची ईच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही. तिचं स्वप्न मी पूर्ण केलं. देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे.” कान्हेरे बाई म्हणाल्या.
“बक्षिस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मधे तुमच्या शाळेत घ्याल का? “ वहिनी म्हणाली.
“अहो अगदी आनंदाने! Actually मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन. वह्या, पुस्तकं, युनिफॅार्म सर्व काही मी बघेन. चालेल का सखुबाई?” कान्हेरे बाई म्हणाल्या.
सखूचे डोळे भरून आले. “वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्या सारखी कडे काम करते.”
वहिनी म्हणाली, “सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस. मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून तरी तुझा विवेक ढळला नाही.”
कान्हेरे बाई कौतुकाने हसून म्हणाल्या, “निघू मी? सखू ये उद्या लेकीला घेऊन. आज शांतपणे झोपेन बघ. Thank you so much.”
सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती. “देवा तुझी किमया अगाध आहे.. क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा!” म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली.
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈