सौ. अलका ओमप्रकाश माळी
कवितेचा उत्सव
☆ – ज्ञान योगिनी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
स्त्री शिक्षणाची उघडूनी कवाडे..
मार्ग दाखविला तू ज्ञानाचा..
सोबतीने जोतिबाच्या..
गिरविलेस तू अक्षरांचे धडे
प्रसार करण्या स्त्री शिक्षणाचा..
झिझविलेस तू आयुष्य सारे..
खुल्या करुनी प्रकाश वाटा..
दूर केलास तू अंधार अज्ञानाचा..
पचविलेस तू दुःख अपमानाचे
हलाहल..
सहन करुनी कष्ट सारे फुलविले
तू ज्ञानाचे कमळ..
नाव तुझे ग असे सावित्री..
निश्चयाची तू ग जणू योग मूर्ती…
हाती देऊनी लेखणी..
जागविलास तू आत्मविश्वास..
तुमच्या मुळेच हो सावित्रीबाई..
घेतोय आज हा मोकळा श्वास..
स्त्री शिक्षणाचा देऊनी हा
अमूल्य ठेवा…
जागविलास तू स्वाभिमान स्त्री मनी..
देऊनी आत्मविश्वासाची लेखणी..
गुरुदक्षिणा काय देऊ ग तुला माऊली..
तू तर तेजोमयी ज्ञान योगिनी..
शब्द सुमनांची ही आदरांजली
वाहते ग माऊली तुझ्या चरणी..
तू दिलेला हा वसा जपेन निरंतर..
राहिल ना आता कोणी स्त्री निरक्षर..
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈