श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “गावठी !!!! —” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आम्ही मातीच्या भिंती
आणि शेणाने सारवलेल्या
जमिनीच्या घरात रहायचो…
‘ते’ सिमेंटच्या भिंती आणि
चकचकीत टाईल्स लावलेल्या
घरात रहायचे…
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून
त्या पावडरने दात घासायचो…
‘ते’ चकाचक वेष्टणात मिळणाऱ्या
पांढऱ्या टूथपेस्टने दात घासायचे…
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही जात्यावर धान्य दळायचो
आणि पाट्यावरवंट्यावर
चटण्या वाटायचो…
‘ते’ आयतं किंवा गिरणीवरुन
पीठ दळून आणायचे,
मिक्सरात चटण्या वाटायचे…
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही तांब्यापितळेच्या
कल्हई लावलेल्या भांड्यातून
चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो…
‘ते’ गॅसवर स्टीलच्या
चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे…
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही हातसडीच्या तांदळाचा भात
आणि नाचणीची भाकरी …. लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो…
‘ते’ शुभ्र पांढऱ्या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी
तुपसाखरेबरोबर खायचे ……
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही घाण्यावरुन काढून आणलेलं
तेल वापरायचो…
‘ते’ डबल रिफाइंड तेल वापरायचे ……
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आम्ही साधे सुती कपडे वापरायचो…
‘ते’ टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे…
आणि
आम्हाला गावठी म्हणायचे…!
आमच्या घरी न्हावी यायचा,
मागीलदारच्या पडवीत पाटावर बसून
थोरापोरांचे केस कापायचा…
‘ते’ मागेपुढे आरसेवाल्या सलुनात
खुर्चीत बसून केस कापून घ्यायचे…
आणि
*आम्हाला गावठी म्हणायचे…!
काळ बदलला…
‘ते’ करायचे त्या सगळ्या गोष्टी
सोसासोसाने आम्ही पण करु लागलो…
आता ‘ते’ दामदुप्पट रकमा मोजून
मन्थेंडांना आणि वीकेन्डांना
मुद्दाम मातीच्या घरात
रहाण्याची चैन करतात…
चुलीवर शिजवलेलं
धुरकट वासाचं .. (साॅरी स्मोकी फ्लेवरचं)
अन्न आवडीने खातात…
घरी रिफाइंड तेलाऐवजी
‘कोल्ड प्रेस’वर काढलेलं
महागडं तेल वापरतात…
हौसेने नाचणीची बिस्कीटं खातात…
नमकवाल्या टूथपेस्टा वापरतात…
महागड्या ब्रॅन्डांचे
सुती कपडे वापरतात…
आणि
आणि आम्हाला गावठी म्हणतात…!!!
लेखिका : संध्या साठे-जोशी, चिपळूण.
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈