सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

गोष्टी तेल मालीशच्या…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सहज टि व्ही सर्फिंग करताना एका चॅनेलवर जुनी गाणी लागलेली होती. जुनी गाणी आजही ऐकायला पहायला आवडतातच. म्हणून मानसी त्या चॅनेलवर थोडी रेंगाळली.

जॉनीवॉकरचे गाणे लागले होते. •••

मालीश करले मालीश

सर जो तेरा चकराए या दिल डुबा जाए

आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए

मानसी हे गाणे ऐकता ऐकता विचारातच गढून गेली. खरचं मालीश किती महत्वाचे आहे नाही?

जन्म झालेल्या बाळाला किमान ६ महिने तरी तेलाने चांगले मालीश करून टाळू वरती तेल घालून ती दाबून दाबून भरली जाते. मग भरपूर गरम पाण्याने आंघोळ घातली की बाळ चांगले २-३ तास तरी झोपते. बाळाची वाढ लवकर तर होतेच पण हाडे मजबूत होतात हे त्या मागचे शास्त्र.

मग हेच बाळ थोडे मोठे झाले की आठवड्यातून एकदाच बंबात पाणी तापवून चांगली चंपी करून आजी मुलगा किंवा मुलगी दोघांनाही आपल्या हाताने न्हाऊ माखू घालायची. ती तेलाची मालीश आणि शिकेकाई रिठे वापरून धुतलेले डोेके अंग••• किती छान होते ते दिवस नाही?

असे आठवड्यातून एकदा असले तरी चातुर्मासात आजी चार महिने काकड आरतीला जायची. तेव्हा स्वत: तेल उटणे लाउन अभ्यंग स्नान करायचीच पण आम्हा मुलांना पण ४ महिने लवकर उठायची शिक्षाच म्हणाना••• पण मालीश करून अभ्यंगस्नानाची पर्वणीच असायची.

मग हीच मुले मोठी झाली की लग्न ठरले की देवब्राह्मण हळद इतर कार्यक्रमासाठीही मालीश करून आंघोळ ही संस्कृती, परंपराच आहे.

मग लग्नानंतर पहिली  दिवाळी आणि त्यानंतरच्या सगळ्याच दिवाळीत पाडव्याला नवर्‍याला, वडिलांना मुलाला मालीश करून आंघोळ घालायला खूपच महत्व आहे. नर्क चतूर्दशीला सगळ्या पुरुषांना, भाऊबिजेला भावाला मालीश करणे ही सगळी आपली मोठी परंपरा चांगली संस्कृती आहे.

लग्नानंतर मात्र मुलगी किंवा सून बाळंतीण झाली की त्यांच्याही मालीशचा शेकण्याचा आंघोळीचा मोठा प्रोग्राम आजही असतो.

मधे अधे पाय मुरगळला हात मुरगळला पाठ कंबर अवघडली किंवा असेच काही त्रास झाले तर मालीश सारखा उपायच नाही. डॉक्टर  गोळ्या औषधे देतात पण ती फक्त पेन किलर असतात वेदना कमी करून बरे झाल्याचा आभास निर्माण करतात पण थंडी पडली आभाळ भरून आले की दुखणे डोके वर काढतेच. तेव्हा मग परत कोणीतरी मालीश करून देते.

सध्या पैसा देऊन अनेक गोष्टी विकत घेतात. मग या ट्रेंडमधे काहीजणांनी आपले हात धुवून नाही घेतले तरच नवल.

काही झाले की फिजिओथेरपी, फिजिओथेरपिस्ट काय करतो? तर बिन पाण्याने हजामत••• आय मीन बिन तेलाने मालीश.

ते कमी पडते म्हणून की काय मोठमोठी यंत्रे म्हणजे मसाजर•••  त्याने केलेला मसाज. आणि एवढे पैसे देऊनही काही फायदा झाला नाही असे कसे म्हणायचे म्हणून थोडा फरक पडलाय की म्हणायचे. नेहमी हे परवडण्याजोगे नसल्याने नेहमी यायला जमणार नाही सांगायचे आणि तेथून निसटायचे.

पण आजी आजही काही झाले तरी स्वत:ला जमले नाही तरी कोणाच्या तरी मागे लागून तेल लावूनच घेते. आजोबाही तसेच•••

मग या वयात म्हणजे ९०च्या घरात गेले तरी ते स्वत:ची कामे स्वत: करू शकतात. त्यांची हाडे दात एकदम मजबूत असल्याचे ते सांगत नाहीत ••• आपणच पहातो, अनुभवतो.

पण त्यांचे म्हणणे  तुम्ही मालीश करा, तेल लावा याकडे दुर्लक्ष करतो. वेळ येईल तेव्हा पाहू असे म्हणून मालीश करूनच घेत नाही. मग ६०तच म्हातारपण•••

आपण किती सुखी समाधानी आहोत हे दाखवण्यासाठी लाखो रुपये कमावणार्‍या मुलाच्या जीवावर फिजिओथेरपिस्ट  आणि मसाजकेंद्रांच्या वाटेवर पाऊल•••

मानसीची तंद्री भंग पावली. नाही असे व्हायला नको. आपण लवकरच मालीश करायला लागले पाहिजे असे वाटले.

टिव्हीवर पुन्हा सर जो तेरा चकराए ऐकू आले. पण यावेळेस जॉनीवॉकर नव्हता तर अमिताभ बच्चन हे गाणं म्हणत होता आणि नवरत्न तेलाची जाहिरात करत होता.

मानसी मनात म्हटली तेल नवरत्न असो वा नारळाचे, तिळाचे  पण तेलाने मालीश झालीच पाहिजे. हेच आपल्या आरोग्याचे आणि हो सौंदर्याचे पण रहस्य ठरणार आहे.

जय हो आयुर्वेद !!!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments