श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
राम मला माहीत झाला तो जयश्री आजीमुळे… राम तिचा सखा होता. आजी होती तेव्हा मी लहान होते त्यामुळे- “काहीही झालं, अडलं तरी ‘ राम‘ म्हणायचं आणि पुढे जायचं” म्हणजे काय हे तेव्हा मला समजायचं नाही. मोठी होत गेले तशी आजीचं हे वाक्य समजत गेलं की राम म्हणजे विश्वास ठेवण्याची कुवत, अडलो थकलो तर विश्रांती घेण्याची पण प्रयत्न न थांबवण्याची नियत, राम नाम म्हणजे थेरपी… प्रॉब्लेम वरून लक्ष डायवर्ट करून सोल्युशन वर केंद्रित करण्यासाठीची!
खरंच आजीचा तरुणपणीचा काळ पहिला तर…
तिचे वडील शिक्षक असल्याने आजीला पुरेशी स्वप्न त्यांनी दिली… शिकण्याची, स्वाभिमानाची… पण मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करणं त्याकाळी प्रायोरिटी वर नसायचं…चार मुलीत मोठी असलेल्या तीचं काळानुरूप लग्न झालं. सगळी माणसं, मुलं,घर सांभाळण्यात कितीदा तिच्या इच्छा आकांक्षा ना दुय्यम राखलं गेलं असणार. त्याकाळी इंटरनेट द्वारा जग खुलं झालेलं नव्हतं मात्र लायब्ररीत जाऊन पुस्तक आणून ते सवडीनं वाचावं अशी तिची इच्छाही कितीदा पूर्ण करायची राहून जायची. अशा सगळ्या खटाटोपात तिला पोझिटिव ठेवणारा तिचा राम होता. त्या काळी नवरा नवराच असे मित्र नसायचा! कौन्सेलिंग नव्हतं, मंडला आर्ट नव्हती, ऑनलाईन योगा झुंबा क्लास नव्हते, म्यानियाक शॉपर्स साठी मॉल्स नव्हते, किटि पार्टीज साठी खेळते पैसे नव्हते, फेमिनिझम चे वारे नव्हते. अशा वेळी जीवनातलं मळभ हटवून प्रकाशाकडे नेणारा तिचा सखा “राम” होता.
आपल्याकडे लहान मुलांना आपण खंबीर होण्याऐवजी घाबरायलाच शिकवतो लहानपणापासून… अभ्यास केला नाहीस तर काहीच मिळणार नाही पुढे, मस्ती केलीस तर बुवा येईल! पण “जा ग सोने… तुला वाटतंय ना हे करावं? तू सातत्याने प्रयत्न करत रहा, राम आहेच बरोबर”असं सांगणारी माझी आजी होती. त्यामुळे घाबरायपेक्षा हिमतीनं पुढे जायला शिकले. तिनी माझ्यात राम बिंबवला. माझ्या मनात राम मंदिर बांधलं तिनं!
22 जानेवारीला राम मंदिर सोहळा आहे. सध्या राम खरंच सगळीकडे ट्रेण्डींग आहे! रामाच्या अक्षता, रामाचा शेला, राम मंदिराची घरी ठेवण्यासाठी प्रतिकृती!! पॉलिटिकल इंटरेस्ट आणि काहींच्या वेस्टेड इंटरेस्ट च्या दृष्टीनं हे बरोबर आहे. एखादी गोष्ट, काम सांघिक भावनेने पुढे नेणे आणि त्याचा सोहळा करणेही गैर काहीच नाही! पण राम साजरा करणे म्हणजे फक्त लाईटींग आणि दिवे लाऊन स्वतःच घर उजळणे नाही… तर स्वतः मधला प्रकाश जागृत ठेवून ज्याच्या कडे कमी उजेड आहे त्याच्यासाठी ज्योत होणे.
माझा राम, ट्रेण्ड बदलला की आउटडेटेड होणारा नाही… तर पुढच्या काळासाठी मला सतत अपडेट करणारा आहे! मला अशी आजी मिळाली की जिने मला खरा राम समजावला… तोच मला तुमच्याही लक्षात आणून द्यावा वाटतोय…
राम म्हणजे संकल्प, राम म्हणजे मनोनिग्रह. निगेटिव्ह वर पॅाझिटिवची मात म्हणजे राम. अगदी आळस झटकून साधं छोटं पाहिलं पाऊल उचलणं म्हणजे राम. तो मनी ठेवूया.. कायमसाठी! अन्यथा आल्या ट्रेण्ड नुसार एक दिवस स्टेटस वा रील लावणं ह्यात काही ‘ राम‘ नाही बरं!!
लेखिका : सुश्री सुखदा भावे- केळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈