श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “तिळगूळ…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
[१]
तिळा मधे गूळ, संक्रांतीचं खूळ
तिळावरचा हलवा, दागिन्यांचं खूळ
पोळीतही आई, घालायची गूळ
गोड गोड बोला, म्हणायचं खूळ
वाटलं का आज, होतं तेही खूळ
शैशवातलं हेच, आनंदाचं मूळ
[२]
तिळात ना स्नेह. गुळात ना गोडी
संक्रांतीची खोडी, काढू नये.
भाकरी न लोणी, गुळपोळीची न चव
संक्रांतीला जेव, म्हणू नये
लाडूही ना वडी, ना हलव्याचा घोळ
त्याचे गोड बोल, मानू नये
विकतचे सारे, विकतची गोडी
कसे प्रेम जोडी, सुन्या म्हणे.
[३]
शब्दांचीच गोडी, शब्द प्रेम जोडी
शब्द तोडी जोडी, मित्र भाव
गुळाचीच गोडी, तीळ स्नेह जोडी
तिळगुळ जोडी, मित्र भाव
मित्र भाव मनी, शिवी देई कोणी
तरी जागे मनी, प्रेम भाव
प्रेमाची महती, तिळगूळ चित्ती
शब्द जागवीती, प्रेम भाव
कडू गोड शब्द, मित्र भावे बद्ध
जोडी सारे शब्द, प्रेम भाव
मनामध्ये सदा, गोडभाव हवा
तेंव्हाच शब्दांना, गोडी खरी
मुखामधे येई, शब्द कोणताही
मैत्री स्नेह देई, सुन्या म्हणे.
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈