श्री श्रीनिवास गोडसे
अल्प-परिचय
जन्म – ६ जून १९६८
शिक्षण – बी कॉम, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी,
विशेष – वाचनाची व लेखनाची आवड, काही लेख प्रसिद्ध, -चांदोबा ते कैवल्याच्या चांदण्याला ह्या लेखाचे कोल्हापूर आकाशवाणी वर वाचन, सोशल मीडियावर अनेक लेख प्रसिद्ध.
विविधा
☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆
“अरे मुडद्या तिकडं उन्हात का मरालायस इकडे सावलीत येउन मरकी की काय मरायचं तेे.. आँ..ss!”
उन्हात खेळणाऱ्या चार वर्षाच्या बंड्यावर चंपा ओरडली… पोरगं धाकाने उठून जवळ आलं. तसा आईच्या काळजाचा धपाटा चंपानं त्याच्या पाठीत घातला.. बंड्याच्या पाठीला काय पण फरक पडला नाही.. अर्धा खाल्लेला उष्टा रव्याचा लाडू बंड्यानं निरागस हसून आईसमोर धरला.. अन हसून चंपानं त्याला जवळ धरले…चिमणीच्या दाताने लाडू चा तुकडा मोडून चंपानं प्रेमानं छोट्या बंड्याचा मुका घेतला.. एक मिनिट मिनिटापूर्वी आलेला राग कुणाचं काय पण बिघडू शकला नाही…
सुन्या आणि अन्याच्यात काय तरी कारणानं जोरदार भांडण जुंपले बोलणारा सुनील अनिलवर सक्त नाराज होऊन ओरडला
“आयुष्यात परत लक्षात ठेवा अनिलराव परत तुमच्या नादाला लागणार नाही”
सुनील च्या त्या वाक्याने अनिल चा काळजाचा तुकडाच निघाला… नेहमीच्या आपुलकीचा एकेरी पणा आज आपण कुठेतरी हरवून बसलो याची मनापासून जाणीव होताच अनिल च्या आवाज बंद झाला… अन्यावरून डायरेक्ट “अनिलराव” हे सुनीलचे हाक मारणे अनिलच्या काळजावर वार करून गेलं. दोन मिनिटे शांततेत गेली अनिल चा स्वरच पालटला
“असं काय करतोस सुन्या मर्दा ऐक की माझं जरा!’ अशी समजूतची भाषा अनिलनं काढली अन भांडणाचा नूरच पालटला… आणि पुढच्या पंधरा-वीस मिनिटात सगळा “मॅटर क्लिअर” झाला… भाषा बदलली… नूर बदलला… गैरसमज संपले… तासाभरानं चहाच्या टपरीवर एक पेशल “च्या” दोघात संपला..
“संजुबाळ ss धीरेssधीरेss” शाळेत उशीर होत असलेल्या संजीव ची आई संजुवर चिडली होती. आईचे हे “गोड” कुत्सित बोलणे ऐकले अन आता आपली काय खैर नाही याची जाणीव संजूला झाली.. आता गोड आवाजाचा अर्थ काय होणार हे त्याला अनुभवाने माहिती होते कसं बसं पटापटा आटोपून संजीव मात्र दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला पळत सुटला…
थंडीने काकडणारा राजू झोपेतुन उठून तसाच मोरीत पळाला. तोंड धुतले, आईने गरम पाणी बादली भरून दिले. गुडघ्यावर बसून राजू डोक्यावर तांब्याने पाणी ओतू लागला. निम्मी बादली संपली… बाबा आले राजूला उभे केले… त्यांच्या लक्षात आले की गुडघ्याची मागची बाजू कोरडीच आहे… आळशी राजू चा बाबांना राग आला दोन रट्टे पिंढरीवर मारुन रडणाऱ्या राजुला बाबांनी चांगली घासुन आंघोळ घातली… ‘काही न बोलता’..! बाबांची शिस्त मात्र राजूने आयुष्यभर लक्षात ठेवली…
आनंदरावांचा ड्रेस शिवायला घेतलेल्या शामभाऊ टेलरकडे आनंदरावांच्या एव्हाना दहा चकरा झाल्या होत्या. प्रत्येक वेळा आनंदराव गोड बोलून विचारायचे, श्यामभाऊ मात्र रोज वेगळे कारण सांगायचा… मुदत मागायचा. आज मात्र आनंदराव चिडले. श्याम भाऊ टेलरची चांगली खरडपट्टी काढली. मोठा आवाज काढून भांडणाऱ्या आनंदरावांच्या व शामभाऊ च्या भोवती चांगली दहा पंधरा माणसे गोळा झाली… संध्याकाळ पर्यंत शर्ट शिवून दे नाही तर माझ्याशी गाठ आहे असे म्हणून आनंदराव परतले… श्यामभाऊ चांगलाच हादरला होता… सायंकाळी पूर्ण काम करूनच श्यामभाऊने आनंदरावांच्या शर्ट घरपोच केला होता…
तिळगुळ घ्या गोड बोला सांगणारा हा संक्रांत सण पण कधीकधी गोड बोलून कामे होत नाहीत तेव्हा मात्र असं आनंदरावांसारखे तिखट बोलता आलं पाहिजे.
गोड या शब्दाचा असा प्रत्येकासाठी वेगळा वेगळा अर्थ लागतो. आपण सगळेच जण विचार करू तर एका निष्कर्षापर्यंत जरूर पोहोचू की गोड ही कल्पना वेगवेगळ्या संदर्भाने येऊ शकते.. कोणी असे म्हणेल की आमच्या ‘हिच्या’ हातच्या स्वयंपाकाची गोडी जगात कशालाच नाही.
याचा अर्थ जे काही ‘ही’ करते ते उत्कृष्ट असते. मग लसूण मिरच्या घालून केलेला चमचमीत खर्डा पण गोड होऊन जातो.
आपल्या मनात प्रेम असेल तर एखाद्या व्यक्तीच्या शिव्या पण गोड वाटतात. कारण ते देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचा ‘बंध’ मनापासून असतो. मग कुणी आदरार्थी बोलले तरी दूर करणारे ठरते. आणि कोणी एकेरी बोलले तरी दूर ढकलल्यासारखे वाटते…
हे मनातले अंतर मोठे विचित्र आहे. मग हजारो किलोमीटर असलेला पण ऱ्हदया जवळ राहतो आणि रोज घरात राहणारा मात्र टप्प्यात येत नाही.
गोड बोलणे किती तिखटजाळ होते तेव्हा ते बोलण्यामागे असलेला ‘भाव’ कुत्सितपणाचा असतो.
मग आईने घातलेल्या शिव्या पण ‘लागत’ नाहीत पण गोड बोलणे ‘लागते’… त्यामुळे हा ‘भाव’ फार महत्त्वाचा … तो प्रेमाचा असेल तर मग वरकरणी कसेही बोला जीवनात ‘गोडीच’ राहील…
पुराणकथेत शनि विचारतो की तुझ्या शरीरात मला बसण्यासाठी जागा दे तेव्हा त्याला उत्तर दिले जाते की माझी जीभ सोडून कुठेही बस… शनी हताश होतो म्हणतो तू जर माझी गादीच काढून घेतलीस.. आता मी तुझ्या शरीरात कुठे बसू शकत नाही… शनि पार पळून जातो..
दिवस कसेही असो शनीला जिभेवर स्थान न देणे शहाणपणाचे.
गुरुचरित्रात एक कथा येते की कली देवाच्या दरबारात प्रवेश करतो तो एका हातात वासना आणि एका हातात जीभ घेऊनच… त्याला विचारले जाते की “असे का रे..?” तेव्हा कली उद्गारतो. माझ्या या युगात मी या दोनच गोष्टी मध्ये वाईट रूपाने असेन. जो कोणी आपल्या जीभेवर आणि वासनांवर ताबा मिळवेल त्यांचे मी काहीही बिघडवू शकणार नाही .
मनात उमटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी मानवाने भाषेचा आधार घेतला. अनेक भावभावनांना , पदार्थांना काही विशिष्ट उच्चार मिळाले आणि भाषा प्रगत झाली. भाषांनी मानवाचे जगणे सुलभ केले. संदेशवहन सोपे झाले. जन्मापासून आपल्याला या भाषेची मोहिनी घातली जाते. आपल्याला काय वाटते ती प्रत्येक गोष्ट एक बाळ आपल्या उच्चाराने आईला, समाजाला कळवते. त्याच्या गरजा पूर्ण होतात. भाषेची थोरवी खूप मोठी… निशब्द शांत बसलेले असताना पण आपण आपल्याशी असा मातृभाषेतून संवाद साधत असतो… आपल्या विचारांना सुव्यवस्थित मांडत असतो… म्हणजेच निशब्दातही आपले शब्द शांत राहात नाहीत… प्रकट होत राहतात… हे प्रकट होणे खरंतर चमत्कारापेक्षा कमी नाही… अचानक काही विचार मनात उमटतो… खरंतर तो कोठून येतो हे कळतच नाही… निसर्गच ते पुरवत असतो… हा पलीकडून बोलणारा कोण? याचा शोध अनेक संतांनी घेतला… कोsहम् कोsहम् विचारत राहिले… सोsहम सोsहम म्हणत राहिले… तोच ओंकार… आणि तोच आदी… तोच अंत…
संक्रांतीचा गोड बोला संदेश इतक्या अमृतवाणी रूपाने आपण स्वीकारला तर जीवन धन्य होईल.
वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत
वैखरी: जी आपण व्यवहारात बोलतो ती मुखात जन्मते,
मध्यमा: तिच्या मागे सामुदायिक कल्याण अपेक्षित असते अशी वाणी ऱ्हदयात उत्पन्न होते,
पश्चंती: ज्याच्या मध्ये आशीर्वाद किंवा सिद्धी असतात उत्पत्तिस्थान पोट असते आणि
सर्वात उच्च वाणी – जिला परा म्हणतात… ती देववाणी मानली जातेे… तिथे ओंकार येतो… वेदवाणी येते…श्लोक, स्तोत्रे किंवा ईश्वरापर्यंत नेणारे शब्द हे या वाणीत येतात.. हि नाभित उमटते…
या अमृतवाणी साधनेची सुरुवात मात्र गोड बोलण्याने होते. प्रेमाने बोलण्याने होते…
म्हणून हे मकर संक्रमण महत्त्वाचे, आपणा सर्वांना या अमृतमय प्रवासास मनापासून शुभेच्छा…
बोला । अमृत बोला ।
शुभसमयाला, गोड गोड ॥
*
दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।
ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य…
रचना : मो. ग. रांगणेकर
प्रेम आहे ते वृद्धिंगत व्हावे!
© श्री श्रीनिवास गोडसे
(गोड Say परीवार)
इचलकरंजी, मो – 9850434741
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈