श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सखी, प्रिय सखी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
माऊली टुर अॅण्ड ट्रॅव्हल्सची बस बेंगलोरहून उटीच्या दिशेने धावत होती. गाडीत पुण्या मुंबईकडचे सुमारे पंचवीस प्रवासी सहलीला जात होते. बहुतेक प्रवासी पन्नाशीच्या पुढचे होते. प्रत्येक सीट दोन प्रवाशांसाठी असल्याने एका सीटवर नवराबायको जोडी बसली होती. अपवाद फक्त डाव्या बाजूला समोरुन चौथ्या सीटवर एक पंचावन्न छप्पन वर्षाचा गृहस्थ हातात पुस्तक घेऊन त्यात रममाण झाला होता. दुसरी उजव्या बाजूला समोरुन पाचव्या सीटवर ज्योती पारकर एकटीच बसली होती. असा लांबचा प्रवास ज्योती कित्येक वर्षांनी करत होती. मुलगा, सून मागेच लागली आणि त्यांनी या माऊली टूरच्या सहलीत नाव नोंदवले त्यामुळे ज्योती बाहेर पडली. असे असले तरी ज्योतीचा जीव अजून पारकर क्लॉथ आणि पारकर एंटरप्रायझेस मध्ये अडकला होता. गेली पंचवीस वर्षे कापड आणि तयार कपडे यांच्याभोवती तिचे आयुष्य गेले होते. तिचा मुलगा आशु आणि सून प्राजक्ता यांची तिला आठवण आली. सांभाळतात दोघेही व्यवसाय पण अजून माझे मार्गदर्शन लागतेच. आपण पण व्यवसायातून हळूहळू बाहेर पडावे असे म्हणतो, पण जमत नाही. पण आता निर्णय घ्यायलाच हवा इतकी वर्षे सतत कामात राहण्याची सवय त्यामुळे घरी बसून वेळ कसा जाणार ही चिंता.
ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट समोरुन सरकू लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानशा गावात जन्म. तीन बहिणी आपण, घरची गरीबी. आपण सर्वात लहान. शाळेत हुशार होतो. विशेषतः भाषा विषय अतिशय चांगले. मराठी भाषा फार आवडायची. कविता सगळ्या तोंडपाठ. शाळेत शिकलेल्या कविता ज्योती आठवू लागली. कित्येक वर्षात कविता मनातल्या मनात सुध्दा म्हटल्या नाहीत. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शिवण क्लासात नाव घातले. बाजूच्याच गावातील पारकर टेलरचे स्थळ आले. दोन पारकर भाऊ, दोघेही टेलर. त्या चार पाच गावात चांगले कपडे शिवण्याबद्दल प्रसिध्द होते. मोठा भाऊ दिनू, त्याचे लग्न झालेले. धाकटा अरुण त्याचे स्थळ आले. मुलगा बरा आहे. अंगात कला आहे हे समजून आई बाबांनी लग्न लावून दिले. त्या काळात आपल्याला कुठे होते स्वातंत्र्य बरे वाईट म्हणायचे ? पदरी पडेल त्याच्याशी आयुष्यभर संसार करायची पध्दत. लग्नानंतर लक्षात आले सारा कारभार मोठ्या जावेच्या हातात. आपला नवरा पण वहिनीच्या पुढे बोलत नाही. दुकान मोठ्या भावाच्या हातात. सर्व पैसे भावाकडे जाणार. त्याच्याकडून त्याच्या बायकोकडे. काही हवे असेल तर मोठ्या जावेकडे मागावे लागे. ज्योतीला हे सहन होत नव्हते. यातून बाहेर पडायला हवे. तिने नवर्याच्या मागे तगादा लावला आपण वेंगुर्ल्याला जावू. माझी आते तिथे आहे. तिथे टेलरिंग दुकान काढू. मी कपडे विकीन. ज्योतीचा नवरा काही ऐकणारा नव्हता. मग तिच्या मोठ्या दिराला दारुचे व्यसन लागले. त्यात तो पैसे उडवू लागला. घरात पैसे येणे बंद झाले. त्यामुळे मोठी जाऊ आता तुम्ही वेगळे रहा आम्हाला तुमचा खर्च झेपत नाही असे म्हणू लागली. त्यामुळे तिच्या नवर्याचा नाईलाज झाला आणि शेवटी ती दोघं गाव सोडून वेंगुर्ल्याला आली.
वेंगुर्ल्याला ज्योतीची आते राहत होती. आतेच्या नवर्याचे इस्त्रीचे दुकान होते. स्वतःचे घर होते. आत्येचा मुलगा मुंबईला नोकरीला होता. त्यामुळे ती दोघंच राहत होती. म्हणून ज्योती आणि अरुणची रहायची सोय झाली. ज्योती धडपडी होती. आजुबाजूला फिरुन कुठे भाड्याने दुकान गाळा मिळतो काय? हे शोधत राहिली. तिला थोडीशी आतमध्ये पण कमी भाड्याची जागा मिळाली. त्या जागेत पारकर टेलर्सचा बोर्ड लागला आणि आतेकडे पडून असलेल्या शिलाई मशिनवर काम सुरु झाले. ज्योतीच्या मावशीचे मुंबईत परकर, साड्या, ब्लाऊज कटपीस यांचे लहानशे दुकान होते. ज्योती मुंबईत गेली आणि मावशीच्या ओळखीने स्त्रीयांसाठी लागणारे कपडे क्रेडिटवर घेऊन एसटी बसवर पार्सले घालून वेंगुर्ल्याला आणू लागली. तिला माहित होते आपली या शहरात ओळख नाही तर कोणी आपल्याकडे येणार नाही. त्यासाठी आपण त्यांच्याकडे जायला हवे. म्हणून ती सायकलच्या मागेपुढे पिशव्या बांधून घरोघरी कपडे विकू लागली. लाघवी बोलणे, दुकानापेक्षा रेट कमी आणि चांगला दर्जा यामुळे तिचे कपडे खपू लागले. तिच्या तोंडी जाहिरातीमुळे तिच्या नवर्याकडे कपडे शिवायला येऊ लागले. एकंदरित दोन वर्षात तिने या व्यवसायात जम बसवला. दर पंधरा दिवसांनी तिला मुंबईला जावे लागे. मागचे पैसे देऊन पुढचा माल आणायचा. या दरम्यान तिला मुलगा झाला. आशु एक महिन्याचा झाला त्याला आतेकडे ठेवून ती मुंबईची वारी करु लागली. अशीच पाच वर्षे गेली. तिचा व्यापार आता जोरदार होऊ लागला. आता तिला मार्वेâटमध्ये एखादा गाळा मिळावा अशी इच्छा झाली. शोधता शोधता तिला तसा गाळा मिळाला. या गाळ्यात तिने मस्त फर्निचर केले आणि भरपूर माल भरला. फक्त स्त्रियांसाठी कपडे, सर्व सेल्सगर्ल मुलीच ठेवल्या. अशी पध्दत तळकोकणात तेव्हा नवीनच होती. त्यामुळे तिच्याकडे मुलींची तसेच स्त्रियांची गर्दी होऊ लागली. आता सरळ ट्रान्सपोर्टने माल यायला लागला. गणपती, दिवाळी, लग्नसराई या काळात तिला जेवायला वेळ मिळत नव्हता अशी गर्दी. तिचा नवरापण टेलरिंग बंद करुन तिच्या दुकानात काम करु लागला.
एव्हाना आशु शाळेत जाऊ लागला. त्याच्याकडे लक्ष द्यायला आते होतीच म्हणून ती निर्धास्त होती. आशुपण अगदी गुणी निघाला. आपली आई सतत कामात असते हे पाहून तो फारसा हट्ट करायचा नाही. पण तिचे दुर्दैव तिच्या नवर्याला दारुचे व्यसन लागले. तिने त्याला खूप समजावले. ही दारु आयुष्याचा सत्यानाश करणार आहे. त्याचा मोठा भाऊ सुध्दा असाच दारुपायी आयुष्यातून बाद झाला. परंतु तिच्या नवर्यामध्ये कसलीही सुधारणा दिसेना. उलट त्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढू लागले. शेवटी तिने निग्रहाने सांगितले, यापुढे दारु पिऊन दुकानात आलास तर बाहेर हाकलून लावीन. घरात पाय ठेवू देणार नाही.
दिवाळी आलेली त्यामुळे भरपूर माल दुकानात आला. ती मुलींकडून पार्सले उघडवत होती. त्यावर दर चिकटवणे सुरु होते. एवढ्यात तिचा नवरा दारु पिऊन तर्र झालेला दुकानात शिरला. आणि कॅश काऊंटरवर जाऊन पैसे खिश्यात घालू लागला. तिच्या अंगाचा संताप संताप झाला. तिने कोपर्यात असलेली एक मोठी काठी उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. तो तिरमिरला आणि खाली पडला. तिने दुकानातील मुलींच्या सहाय्याने त्याला ओढून बाहेर काढले. आणि पुन्हा दारु पिऊन दुकानात आलास तर बघ तुझा जीव घेईन अशी तंबी दिली. थोड्या वेळाने तिचा नवरा उठून कुठेतरी गेला. तो रात्री येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता तो आलाच नाही. तिला वाटले कदाचित गावी गेला असेल. गावीपण तो गेला नाही. कदाचित नातेवाईकांकडे गेला असेल. पण तो कुठेच गेला नाही. दोन महिन्यांनी देवबाग किनार्यावर त्याचे प्रेत समुद्रात तरंगताना दिसले.
तिचा व्यवसाय जोरात सुरु होता. घरी आते, तिचे यजमान लक्ष ठेवून होते. आशु शाळेत जात होता. आता तिच्या बँकेत पैसे जमा होऊ लागले. तसे तिला मोठ्या जागेचे वेध लागले. भर बाजारात मोठ्या इमारतीचे काम सुरु होते. त्या इमारतीत दुकानासाठी जागेची तिने चौकशी केली. तिच्या बँकेने पण सहाय्य केले. आणि दोन हजार शंभर स्क्वेअर फूटाची जागा तिने विकत घेतली. आता पारकर एंटरप्रायझेस नवीन प्रशस्त जागेत सुरु झाले. इथे नवीन पिढीसाठी सर्व ब्रँडचे तयार कपडे मिळू लागले. सर्व व्यवसाय कॉम्प्युटराईज झाले. धंदा खूप वाढला. नवीन तरुण सेल्समन, सेल्सगर्ल यांच्या नेमणूकी झाल्या. चार वर्षापूर्वी आशुपण धंद्यात आला. दोन्ही दुकानांचा कारभार त्याने हातात घेतला. आणि ज्योतीला विश्रांती मिळू लागली. आशुचे त्याच्या वर्गातील मैत्रिण प्राजक्ता हिच्याशी लग्न झाले आणि अजून दोन हात मदतीला आले.
माऊली टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सची गाडी उटीच्या दिशेने धावत होती आणि ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरुन सरकत होता. सर्वजण म्हणतात, आता साठी जवळ आली तुमच्या आवडीनिवडीत मन रमवा. तुमचे अपुरे छंद पुर्ण करा. तिच्या लक्षात येईना कसल्या होत्या आपल्या आवडी? कसले होते आपले छंद ? गेली पंचवीस तीस वर्षे गाडीला जुंपलेल्या बैलासारखे आपण राबत होतो. दिवसाचे किती तास कोण जाणे ? एवढ्यात गाडीतील ट्रॅव्हल मॅनेजर अनिता हिने माईक हातात घेतला.
‘‘चला मंडळी, अजून दोन तास प्रवास बाकी आहे. तेव्हा गाणी म्हणा, भेंड्या लावा. नाटुकले करा. पण झोपू नका. आजुबाजूचा निसर्ग पहा. पहा कस बाहेर धुकं पडलयं ते एन्जॉय करा. चला करा सुरुवात.’’
असं म्हणून तिनं पहिल्या बाकावरील वर्दे जोडीला सुचविले तुम्ही काय करताय? वर्देंनी हिंदी गाणी म्हटली. दुसर्या बाकावरील जाधव यांनी नक्कल केली. कोणी श्लोक म्हटले. तिने डाव्या बाजूला चौथ्या सीटवर एकट्याच बसलेल्या गृहस्थाकडे पाहून म्हटले, ‘‘अत्रे सर, तुम्ही काय म्हणताय?’’
‘‘ मी माझ्या कविता म्हटल्या तर चालेल का?’’
‘‘अरे, तुम्ही कवी आहात, मग म्हणा.’’ कोणीतरी ओरडलं.
आणि प्रविण अत्रेने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केल्या.
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी ।
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी ।।
कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा
बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा ।
बाकी उरणं महत्त्वाचे, तेवढीच श्री शिल्लक
कविता असेल साधी, पण विचार मात्र तल्लख ।।
ज्योतीला भारावल्यासारखे झाले. शाळेत असताना कविता तिचा जीव की प्राण होत्या. जीवनाच्या रहाटगाडग्यात ती सर्व विसरली. तिला ती ओळ पुन्हा आठवली.
‘‘कधी कधी आठवण्याहून, विसरण्यात मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा’’ काय विलक्षण कविता होती ही. ढगाळलेल्या वातावरणात मध्येच सूर्याची तिरीप अंगावर पडावी असे तिला वाटले. त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही काही कार्यक्रम केले. पण ज्योतीचे त्याकडे लक्ष नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. ‘‘बाकी उरणं महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक’’ आहाहा काय विचार आहे सुंदर !
– क्रमश: भाग १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈