श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “गोड बोलून…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
“कदम,जरा केबिनमध्ये या”साहेबांचा फोन.सकाळीच बोलावणं म्हणजे महत्वाचं काम असणार म्हणून कदम लगबगीनं केबिनमध्ये गेले. समोर बसलेल्या तिशीतल्या तरुणीशी साहेब बोलत होते.
“हियर ही इज,अवर बेस्ट अँड मोस्ट एक्सपिरीयन्स स्टाफ.ज्यांच्याविषयी सांगत होतो तेच आमचे कदम,गेली २० वर्षे एक्सलंट काम करत आहेत.”साहेबांनी अचानक केलेल्या कौतुकानं कदम संकोचले.
“तुमचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालं.यू आर ग्रेट लीडर.” कदमांकडून स्तुती ऐकून साहेब सुखावले.
“मला बोलावलं होतं”कदमांनी विचारलं.
“ओ येस,ही सारिका,माझ्या मैत्रिणीची मुलगी,आपल्याकडे जॉइन होतेय.एमबीए आहे.तुमच्या हाताखाली ट्रेन करा.”
“मॅडम,वेलकम टू फॅमिली”
“कदम सर,फक्त सारिका म्हणा.तुमच्यापेक्षा ज्ञानानं,अनुभवानं,वयानं खूप लहान आहे”
“ओके”कदमांनी मान डोलावली.कदमांच्या मार्गदर्शनाखाली सारिकाचं ट्रेनिंग सुरू झालं.कामातले छोटे छोटे बारकावे समजून घेत वर्षभरात सारिका तयार झाली.सोबत वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन होतचं.
—
प्रोजेक्टविषयी चर्चा सुरू असताना अचानक साहेब म्हणाले “दोन महिन्यांनी देशपांडे रिटायर होतायेत.चांगला माणूस कमी होतोय.एक बरयं की तुम्ही अजून दहा-पंधरा वर्ष आहात म्हणून काळजी नाही.”
“मीपण तीन वर्षानी रिटायर होतोय.”
“काय सांगता.तुमच्याकडे बघून वाटत नाही.चांगलं मेंटेन केलेय.अजूनही कामाचा झपाटा जबरदस्त आहे.सारिकाविषयी काय वाटतं”साहेब
“हुशार,मेहनती आणि प्रामाणिक आहे.”
“आता तिला मोठ्या जबाबदाऱ्या द्याव्यात का?”
“नक्कीच”
“कदम,इतकी वर्षे कंपनीच्या अनेक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडत आहात.हॅट्स ऑफ टू यूवर डेडीकेशन.”कदमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण साहेबांकडून कौतुक म्हणजे काहीतरी वेगळं घडणार याची पूर्वसूचना.
“तुमच्यावर कामाचा खूप लोड आहे.जर हरकत नसेल तर त्यातला थोडा भार कमी करुयात”.
“नो प्रॉब्लेम”कदमांना नाईलजानं परवानगी द्यावीच लागली.पर्याय नव्हता.निर्णय झाला होता फक्त तोंडदेखलं विचारण्याचं नाटक साहेब करत होते.काही दिवसातच कंपनीच्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी कदमांच्या ऐवजी सारिकाकडं देण्यात आली.अनेकांना हा बदल आवडला नाही.तीव्र पडसाद उमटले.कदमांनासुद्धा हा धक्का होता.त्यानंतर साहेब कदमांशी चर्चेचे नाटक करून एकेक जबाबदाऱ्या देत सारिकाचं कंपनीतलं महत्व वाढवत होते.’खुर्चीपुढं गरजवंत हतबल असतो’ या न्यायानं कदम शांत होते.
—
दरवर्षीप्रमाणं कंपनीमध्ये अॅन्युअल डेला प्रमोशन जाहीर होणार होती.प्रचंड उत्सुकता होती.एकेक प्रमोशन जाहीर होऊ लागली तसा जल्लोष वाढत होता.अभिनंदनाचा वर्षाव,हसणं,गप्पांचा गदारोळ सुरू होता.सिनॅरिटीप्रमाणं कदम सर ‘मॅनेजर’ होणार याविषयी सर्वांना खात्री होती.आपल्या माणसाचं यश साजरं करण्यासाठी म्हणून खास तयारी केली होती.काही वेळानं साहेबांनी “मॅनेजर”चं प्रमोशन जाहीर केल्यावर एकदम शांतता पसरली.सारिकाची मॅनेजर म्हणून झालेली निवड धक्कादायक होती.उघडपणं बोललं नाही परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. पार्टीचा मूड बदलला.साहेबांनी टाळ्या वाजवून सारिकाचं अभिनंदन केलं तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही.पुढे येऊन कदमांनी अभिनंदन केलं तेव्हा सारिकानं नजरेला नजर देणं टाळलं.
“कदमसर,तुम्हांला राग आला नाही”एकानं विचारल्यावर कदमांनी नकारार्थी मान डोलावली.
“आला तरी ते नेहमीप्रमाणे दाखवणार नाहीत”
“कदम सर,आज तरी बोला की तुम्हांला सहन करण्याची सवय झालीय.”
“जे व्हायचं ते होऊन गेलंय.आता यावर बोलून काय उपयोग?”जेवणाची प्लेट घेऊन कदम कोपऱ्यात जाऊन बसले.
“कदम,लेका आज तरी मनात ठेवू नकोस.मन मोकळ कर.”देशपांडे शेजारी बसत म्हणाले.
“जाऊ दे”
“का’?”
“तू रिटायर होतोयेस.मला अजून कंपनीत तीन वर्षे काढायचीयेत”
“साहेबांनी चुकीची निवड केलीय.मी त्यांच्याशी बोलतो”
“उपयोग नाही.आपण साहेबांच्या मर्जीतले नाही.ती आहे.”
“म्हणून असले अन्याय सहन करायचे.”
“कसला अन्याय,काय बोलतोयेस”
“कालची पोरगी मॅनेजर आणि तू इतकी वर्ष कंपनीत काय xx xxxx..प्रामाणिकपणे काम करून काय मिळालं”
“जाऊ दे ना.उगीच नको त्या विषयावर चर्चा नको.”
“मॅनेजर कोण होणार याची माहिती होती”देशपांडेनी विचारल्यावर कदम फक्त सूचक हसले.
“बोल ना.साहेबांनी सांगितलं होतं”
“नाही पण काल संध्याकाळी बोलावलं तेव्हा अंदाज आला.”
“कशावरून”
“साहेबांची गोड बोलण्याची स्टाईल!!काल एकदम माझ्या कामाचा,प्रामाणिकपणाचा,मेहनतीचा,
कंपनीसाठी दिलेल्या योगदानाचा पाढा पुन्हा एकदा वाचायला सुरवात केली.कंपनीसाठी मी किती महत्वाचा आहे हे पटवून सांगायला सुरवात झाली.त्याचवेळी वारंवार माझ्या वाढत्या वयाचा आणि जबाबदाऱ्याचा उल्लेख करत होते.”
“मग!!”
“आपण मॅनेजर होणार नाही हे लगेच लक्षात आलं”
“कसं काय?”
“साहेब विनाकारण कधीच गोड बोलत नाही.सगळी साखर पेरणी सारिकासाठी होती. साहेबांच्या खास मर्जीतली असल्यानं तिला जॉइन मोठी पोस्ट आणि स्पेशल फेव्हर मिळणार याचा अंदाज होता परंतु माझ्याकरवी ट्रेनिंग देऊन मॅनेजर करून माझाच पत्ता कापला जाईल.असं वाटलं नव्हतं.”
“याविरुद्ध आवाज उठवायला हवा.गप्प बसू नकोस.कानामागून आली अन ….”
“आतापर्यंत कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत.पद मिळवण्यासाठी तर नाहीच नाही.चमचेगिरी जमत नाही.साहेबांना,त्यांच्या हुकुमावर नाचणारा,हो ला हो करणारा,स्वतःचं डोकं न चालवणारा मॅनेजर हवा होता.तिथंच माझी अडचण झाली.”
“तुला डावललं याचं सगळ्यांना खूप वाईट वाटतंय.”
“माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दु:खी झालात.अरे,इतका आपलेपणा रक्ताच्या नात्यातले पण दाखवत नाहीत.हीच तर माझी खरी कमाई.”
“हा आदर आपल्या प्रेमळ वागण्यानं तू मिळवला आहेस तरीपण चांगल्या लोकांची कदर होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”
“ जेव्हा जेव्हा वशिला आणि प्रामाणिकपणा एका पारड्यात मोजला जातो तेव्हा नेहमीच वशिल्याचं पारडं जड ठरतं. हाच इतिहास आहे,हेच वर्तमान आणि हेच भविष्य आहे.तसंही नोकरी म्हणजे मनाविरुद्ध केलेली तडजोड.आतापर्यंत इतक्या केल्यात त्यात अजून एक तडजोड.वाईट एवढंच वाटतं की साहेबांनी असला खेळ खेळण्यापेक्षा स्पष्ट सांगितलं असतं तर एवढा त्रास झाला नसता.राजकारण करून बाजूला सारलं हे मनाला खूप लागलं रे….” डोळे पुसण्यासाठी कदमांनी मान फिरवली.
“थोडक्यात केसानं गळा कापून काटा काढला.”
“अं हं,*गोड बोलून…….*” नेहमीच्या शांतपणे कदम म्हणाले
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈