श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘माझी सुट्टी’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज.  आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा.  त्यावेळी मी डी.एड.कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे , हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय.’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीचे वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात.  मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं.  उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या.’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी.व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी.व्ही.च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला.   शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी.व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’  मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments