श्री मकरंद पिंपुटकर
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ अनोखी पहल — कणादकुमार अमर – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
आपल्या रोजच्या आयुष्यात चहाच्या टपरीपासून, भाज्यांच्या ठेल्यापासून, सायकलच्या दुकानांत अनेक ठिकाणी आपण शाळकरी मुलांना कामं करताना बघतो, घरकाम – धुणीभांडी करणाऱ्या मुलींना बघतो. चुकचुकतो, या मुलांनी शाळेत जायला पाहिजे म्हणतो, आणि मग तो विचार, ते चिंतन डोक्यातून काढून टाकतो आणि आपापल्या कामाला लागतो.
२०१६ साली, प्रयागराज (अलाहाबाद) मधील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MNNIT मधील कणाद कुमार अमर या विद्यार्थ्यानेही ही अशी कामं करणारी मुलं पाहिली. मात्र इतरांसारखा तो कोरडा हळहळला नाही, त्याच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.
त्याच्या ओळखीच्या या मुलांना तो भेटला. या मुलांना, त्यांच्याच वस्तीत – ‘नया गाव’ इथे, रोज संध्याकाळी तासभर तरी अभ्यासाला पाठवा, अशा त्याने त्या मुलांच्या आई वडिलांना विनवण्या केल्या.
“तुम्ही आमची मुलं पळवून नेणार आहात” पासून “धंदे के टाईम खोटी मत करना” पर्यंत अनेक उत्तरं मिळाली.
खूप मिनतवाऱ्या केल्यावर पंधरा विद्यार्थी मिळाले. कणाद आणि त्याचे पाच मित्र, त्यांचं कॉलेज संपल्यावर, नया गाव वस्तीत जाऊन या मुलांना शिकवू लागले. कॉलेज सांभाळून, इथं येऊन शिकवणं काहींना दगदगीचं वाटू लागलं – असे काही जण गळले, काही नवे स्वयंसेवक जोडले गेले. आणि कणादची ही ‘अनोखी पहल’ नया गावमध्ये रुजू लागली.
पण कणादला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्याला या उपक्रमाची व्याप्ती वाढवायची होती. वस्तीमध्ये एका वेळी आणखी विद्यार्थ्यांना शिकता येईल अशी जागा नव्हती. कॉलेज सांभाळून वस्तीपर्यंत शिकवायला येणं स्वयंसेवकांना धावपळीचं होत होतं.
मार्ग काढण्यासाठी कणाद सरळ जाऊन MNNIT च्या डायरेक्टर डॉ. राजीव त्रिपाठी यांना भेटला.
एरवीच्या तरुणाईच्या अनास्थेबद्दल निराश होणाऱ्या डॉ त्रिपाठी यांना कणादची संकल्पना, निर्धार भावला. त्यांनी संध्याकाळी ६ नंतर, MNNIT मधील वर्ग संपल्यावर, MNNIT मध्ये या मुलांना शिकवण्यास परवानगी दिली.
या परवानगीने दोन गोष्टी छान झाल्या. नया गावमधील भरपूर विद्यार्थ्यांना शिकवता येणार होतं आणि कॉलेजच्या स्वयंसेवकांना मुलांना शिकवण्यासाठी दूर जाण्याची गरज नव्हती. शे दीडशे विद्यार्थी या “अनोखी पहल”चा फायदा घेऊ लागले.
संध्याकाळची वेळ व्यवसायाच्या दृष्टीने गडबडीची आणि म्हणून महत्त्वाची. या वेळेला या शाळकरी मुलांची व्यवसायात जास्त मदत लागे. त्यामुळे पालक संध्याकाळी मुलांना शिकायला पाठवायला नाखुश असत. कणादने यावरही मार्ग काढला. दुपारी १२ ते २ या वेळात, जेव्हा MNNIT ला जेवणाची सुट्टी असे, त्या वेळात कणाद नया गावमध्ये जाऊन अशा मुलांना शिकवू लागला.
MNNIT मधील वर्ग रात्री ८ पर्यंत चालत. मग इतक्या उशीरा मुलं, विशेषतः मुली घरी कशा येणार अशी पालकांना काळजी होती. पुन्हा कणादने या विद्यार्थ्यांसोबत घरापर्यंत येण्याची जबाबदारी घेतलीही आणि निभावलीही.
कॉलेजला सुट्टया लागल्या. या मुलांचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी कणाद MNNIT लाच राहिला. “अनोखी पहल” सुरू राहिली.
सगळं छान रुळू लागलं होतं, ‘अनोखी पहल’चे विद्यार्थी चांगले गुण मिळवू लागले होते. निव्वळ शिक्षणच नव्हे तर उत्तर प्रदेशातील कडाक्याच्या थंडीला तोंड देण्यासाठी या मुलांसाठी मायेची उब आणि तशाच उबदार लोकरी कपडयांची सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांसाठी ‘अंत्योदय’ उपक्रमाअंतर्गत क्रीडास्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा (निबंधलेखन, quiz, काव्यलेखन आदि) आयोजित केल्या जाऊ लागले होते, सणवार साजरे केले जाऊ लागले होते…
… आणि करोना आला.
‘अनोखी पहल’चा चमू हटला नाही. डटून राहिला. शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेऊन त्यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. ‘अनोखी पहल’ आता MNNITचा अधिकृत उपक्रम झाला होता. संस्थेचे चार प्राध्यापक यात मदतीसाठी नेमले होते.
आता करोनाचे संकट गेले आहे. ‘अनोखी पहल’ जोरात, जोमात आणि जोशात सुरू आहे. विद्यार्थी उत्तमोत्तम यश संपादन करत आहेत, काही जण तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून खुद्द MNNIT मध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.
कणाद स्वस्थ बसलेला नाही, फक्त इथल्या उपक्रमाच्या यशावर संतुष्ट नाही. मिर्झापूर, उत्तर प्रदेश आणि IIT, खरगपूर इथेही त्याच्या संवादातून आणि प्रेरणेतून हे उपक्रम यशस्वीरीत्या सुरू झाले आहेत.
—
“हे असं फुटकळ पाच पन्नास विद्यार्थ्यांना शिकवून काय असा मोठा तीर मारला ?” असं काठावर बसून सल्ला देणारे, उंटावरून शेळ्या हाकणारे काहीजण विचारतीलही – त्यावर एक खूप छान कथा वाचली होती.
एका तलावाच्या काठावर काही मासे पाण्याबाहेर पडले होते, पाण्याअभावी तडफडत होते. एकजण एक एक करून ते मासे पुन्हा पाण्यात टाकत होता. दुसऱ्याने त्याला विचारलं, “अरे, इथे इतके मासे पडले आहेत. असे पाच पंचवीस मासे परत पाण्यात टाकून काय मोठा फरक पडणार आहे ?”
पाण्यात पुन्हा दिमाखात पोहणाऱ्या एका माशाकडे पहात पहिला उत्तरला, ” त्या माशाला नक्की फरक पडला आहे. “
कणादच्या ‘अनोखी पहल’ ला हार्दिक शुभेच्छा.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈