श्री अमोल अनंत केळकर
☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆
आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .
योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते.
गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.
मी ते केके दाखविले.तसा तो हसला.
“भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही “
“अरे वा “असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.
“भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते” असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .
” हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? ” त्याने विचारले.
मलाही उत्सुकता वाटली.
मी होय म्हणालो.
“हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?”केकेने विचारले.
मी गमतीने म्हटले” दोन्ही वेळेस”.
त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.
“भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत.”
“दोन स्लॉट ?” मी प्रश्नार्थक चेहरा केला.
“सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट .”त्याने उत्तर दिले.
मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .
“भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो “त्याने माझा होकार समजून लिहिले .
“जेवण काय हवेय ?” त्याने पुन्हा प्रश्न केला.
“अरे जे आहे ते खाऊ ? “मी चिडून म्हटले.
“तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड” माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.
जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.
जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .
“वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू .” केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.
लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .
अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .
पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .
आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.
पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .
“भाऊ आहेर किती देणार ?” केकेने विचारले.
“पत्रिका तुला आहे मला नाही ?” माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .
त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .
अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .
“चल जेवू या ?”
केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .
आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .
“केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? “मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .
“मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात.”
केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .
“भाऊ नऊ वाजत आले” त्याने मोबाईल दाखविला .
च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .
“अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?”मी चिडून केकेला म्हटले.
“त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?” त्याने शांतपणे मला विचारले.
मी नाईलाजाने मान डोलावली .
तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.
“केके हा काय प्रकार ?”माझा पुन्हा एक प्रश्न.
“भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. ” केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.
बाहेर येताच मी केके ला विचारले “यामागे डोके तुझेच ना ?”
केके हसला .
“भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता “.केके हसून म्हणाला .
“पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?” मी विचारले.
“त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले ” केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .
“धन्य आहेस बाबा तू ” मीही त्याला हात जोडीत म्हणालो .
लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर
प्रस्तुती – श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com