श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे ☆
आज सकाळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी ऐकू येत होती . शाळेंच्या बक्षीस वितरणांचा कार्यक्रम , विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम , झेंडा वंदनाचा कार्यक्रम व नेत्यांची भाषणे ऐकू येत होती . त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाची जोरदार सुरुवात दरवर्षीप्रमाणे सुरु आहे हे कळत होते .
नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो होतो . सकाळची थंडी इतकी प्रचंड होती की दोनतीन कपडे, जॅकेट , कानटोपी , पायात वॉकींग शूज , अशा कडक बंदोबस्तात मी निसर्गात फिरत होतो . येताना गरमागरम जिलेबी आणायची म्हणजे 26 जानेवारी साजरी केल्यासारखे वाटते हा गोंडस विचारही मनात घोळत होता .
परत येताना नदीच्या किनारी जाऊन नंतर पुढे निवांत जावू असा विचार करून मी थोडी नेहमीची वाट बदलली . नदी किनारी आलो तर दोन निळ्या रंगाचे प्लास्टीक टाकून लाकडांचा आधार देऊन दोन तात्पुरत्या झोपड्या दिसल्या . पाच सहा उघडीनागडी चार पाच वर्षाची मुले एका चादरीवर लोळत पडलेली होती तर त्यातला एक सहा सात वर्षाचा मुलगा चाकूला धार करत होता .
मग त्याला हिंदीतून विचारले क्या करता है ? तर म्हणाला अभी रानडुक्कर मारनेको जाना है। इस लिए चाकू को धार करता हु.
इतक्यात दाढीवाला , मोठे केस सोडलेला बरेच दिवस अंघोळ न केलेला त्याचा बाप आला व निवांत बसला . क्या काम करते हो ? तर म्हणाला रानडुक्करे मारायची व खेडेगावात विकायची आमचा धंदा आहे . मग थोड्या गप्पा मारल्या त्यातून समजले अशा थंडगार हवामानात , झोंबणाऱ्या थंडीत नदीकिनारी एक दोन दिवस मुक्काम करायचा . रानडुक्कर मारायचे . दिवसभर त्यासाठी जवळपास रानोमाळ भटकंती करायची . रानडुक्कर मिळाले तर विकायचे नाहीतर निवांत पडी मारायची .
उघड्यावरच अंघोळी, उघड्यावर दगडाच्या चुलीवर स्वयंपाक, जंगलातील ओली सुकी झाडे शोधून बांधलेल्या उघड्या झोपड्या. त्याला कसलेही संरक्षण नाही. आयुष्याला कसलेही भविष्य नाही, पोरानां शाळा दफ्तरे नाहीत. कसली स्वप्ने, कसले अच्छे दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? हे माहीत नाही.
त्याला सहज विचारले तुझे नाव काय ? तर म्हणाला रामजी . त्यांच्या मुलांची नावे तर खूप भारीभारीच होती . आता देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली . आपल्या देशाने तर खुप प्रगती केली .पाचशे वर्षानंतर रामाला घर मिळाले . अयोध्येत राममंदीर
बांधण्यासाठी किती हजार कोटी गेले व अजून जाणार आहेत याची गणतीच नाही . आजच कळाले तीन कोटी रुपये तर एका दिवसात भक्तांकडून दानपेटीत जमा झाले .
हातातली जिलेबीची बॅग रामजीच्या मुलानां दिली .त्यानां प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावत बसलो नाही . कारण जिलेबी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा वाटला .
या रामजीसारख्यांचा वनवास कधी संपणार ? त्यांच्या मुलानां शाळा दफ्तरे कधी मिळणार ? त्यांनां राहायला घरेदारे , पोटासाठी कामधंदा कधी मिळणार ? त्यांच्या बायकांनां ओल्या लाकडांची चुल जावून गॅसवर स्वयंपाक बनवायला कधी मिळणार ? त्यानां अच्छेदिन कधी येणार ?
पच्च्यांहत्तर वर्षात आपण किती प्रगती केली या विचारात ,देशभक्तीची गाणी मोठ्याने ऐकत मी परत निघालो . प्रजासत्ताक दिनाचा अर्धा दिवस आता संपला . . .
प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .
प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566