श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पहिले- अंजलीला सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.आता इथून पुढे)
तिला आता भयंकर उदास वाटू लागलं होतं.प्रिया म्हणत होती तसं खरंच झालं तर नसेल?पावसामुळे झालेल्या अपघातात रितेशचं काही बरं वाईट तर…
एकदम तिला आठवलं रितेशच्या येण्याच्या रस्त्यावरच एक नाला होता आणि दरवर्षी त्याला पूर यायचा.पुर आलेल्या स्थितीत तो पार करतांना दरवर्षी चारपाच जण तरी वाहून जायच्या घटना घडायच्या.रितेशने तर तसा प्रयत्न केला नसेल?आणि…
त्या कल्पनेनेच तिचा घसा कोरडा पडला.जीव घाबराघुबरा होऊ लागला.डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.घशात हुंदका दाटून आला.ती आता मोठ्याने रडणार तेवढ्यात प्रिया डोळे चोळत चोळत बाहेर आली.
“आई बाबा अजून आले नाहीत?” तिने रडवेल्या स्वरात विचारलं.अंजलीने उठून लाईट लावला.
” नाही बेटा.पण ते येतीलच थोड्या वेळात “अंजली तिला कसंतरी समजावत म्हणाली
” तू केव्हाची म्हणतेय येतील येतील म्हणून.पण ते का येत नाहियेत?”
” बेटा पाऊस किती जोरात पडतोय बघ.ते कुठतरी थांबले असतील”
” तू फोन लाव ना त्यांना.त्यांना म्हणा प्रियू वाट.बघतेय त्यांची “
” मी मगाशी लावला होता फोन पण लागलाच नाही “
” मग तू परत एकदा लाव ना गं फोन ” ती परत एकदा रडायला लागली.अंजलीने उठून तिला जवळ घेतलं.तशी ती हमसून हमसून रडायला लागली.तिच्या रडण्याने अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलं.
” असं रडायचं नाही बेटा.तू शहाणी आहेस ना?बघ पाऊस कमी झालाय ना.येतीलच आता बाबा.तू झोप बरं “
” मी तिकडे झोपणार नाही”
” बरं चालेल.इथेच झोप”
” आणि बाबा आले की मला लगेच उठव “
” बरं उठवते “
अंजलीने तिला सोफ्यावरच टाकून तिला थोपटायला सुरुवात केली.तशी ती झोपून गेली.ती झोपलीये हे पाहून अंजली तिला बेडरुममध्ये घेऊन गेली.ती उठू नये म्हणून ती बराच वेळ तिला थोपटत राहिली.मग ती परत हाँलमध्ये येऊन बसली.अकरा वाजत आले होते.तिने मोबाईल उचलून रितेशला फोन लावला.तो लागला नाही म्हणून तिने प्रकाशला लावला.पण त्यालाही लागला नाही. तिने मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिलं.तिथं रेंजच नव्हती.थोडाफार का होईना जो प्रकाशचा आधार वाटत होता तोही नाहिसा झाला होता.आता तिलाही खचल्यासारखं वाटू लागलं.काळजीने मन पोखरु लागलं.त्या नाल्याल्या पुरात रितेश वाहून तर नाही ना गेला या विचाराने तिचे डोळे अश्रूंनी भरुन आले.आता एकच उपाय उरला होता.गणपतीला पाण्यात ठेवायचा.तिने डबडबत्या डोळ्यांनी मनाशी निश्चय केला आणि ती धीर एकवटून देवघराकडे जायला निघाली तेवढ्यात …..
होय तोच तो आवाज ज्याची ती जीवाच्या आकांताने वाट बघत होती.तोच तो फाटक उघडण्याचा आवाज.रितेशची वाईट बातमी घेऊन कुणी आलं तर नव्हतं?धडधडत्या ह्रदयाने ती उठली.डोळ्यातले आसू तिने पुसले.धीर धरुन तिने दार उघडलं.बाहेर काळ्या रेनकोटमधली एक आकृती गाडी लावत होती.तिने पटकन अंगणातला लाईट लावला.समोर रितेश उभा होता.रेनकोट असूनही नखशिखांत भिजलेला आणि थंडीने थरथर कापणारा.आनंदाने तिला भडभडून आलं.त्याला जाऊन घट्ट मिठी मारावी असं तिला वाटू लागलं पण तो ओला होता त्याला अगोदर घरात घेण्याची गरज होती.
“काहो इतका उशीर.आणि फोन तर करायचा.वाट बघून जीव जायची वेळ आलीये “
” अगं काय करणार!पावसाने सगळीच वाट लावलीये.कंपनीतून निघालो तर पंचमुखी हनुमान जवळच्या नाल्याला हा पूर!एकदोन जण वाहून गेले म्हणे.त्यामुळे तो रस्ता बंद झालेला.सुभाष चौकाकडून यायला निघालो तर एका डबक्यात गाडी स्लिप झाली आणि मी पडलो.शर्टाच्या खिशातला मोबाईल पाण्यात पडला.तो शोधुन काढला.नंतर गाडी सुरुच होईना.पावसामुळे बहुतेक गँरेजेस बंद.एका गँरेजवाल्याकडे गेलो त्याने एक तास खटपट केली पण गाडी काही सुरु होईना.त्याच्याकडे गाडी ठेवायला जागा नव्हती म्हणून गाडी ढकलत आणू लागलो तर ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते बंद.मी कसा घरापर्यंत पोहचलो ते माझं मलाच माहित”
“अहो पण एखादा फोन तर करायचा.मी शंभरवेळा तुम्हांला फोन लावायचा प्रयत्न केला पण तुमचा मोबाईल बंदच.प्रकाश भाऊजींनीही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही”
“हो अगं.डबक्यात पडल्याने मोबाईल खराबच झाला असावा.मी गँरेजवाल्याच्या मोबाईलने तुला फोन केला होता पण त्याचं नेटवर्कच गायब होतं.बरं या तुफान पावसात मोबाईल बाहेर काढायलाच लोक तयार होत नाही ” रितेश रेनकोट काढत म्हणाला
” थांबा मी टाँवेल आणते तुमच्यासाठी”ती टाँवेल आणायला वळत नाही तोच प्रिया जोरजोरात रडत बाहेर आली आणि “बाबाsssss” असं जोरात ओरडत तिने रितेशच्या पायांना मिठी मारली
“अगं थांब.त्यांना आत तर येऊ दे”अंजली ओरडली पण प्रियाने ऐकलं नाही.
लेकीच्या त्या आक्रोशाने रितेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तशाच ओलेत्या स्थितीत तिला उचलून छातीशी धरलं॰
“बाबा तुम्ही लवकर का नाही आले?मला खुप भिती वाटत होती.” त्याच्या गळ्याला मिठी मारुन ती रडत रडत म्हणाली.
” हो गं बेटा.साँरी हं बेटा या पावसामुळे मला येता नाही आलं.आता यापुढे असं नाही करणार”
“प्राँमिस?”
” हो बेटा.प्राँमिस “
रितेशच्या गळ्याला मिठी मारुन प्रिया रडत होती।
अंजली टाँवेल घेऊन आली.बापलेकीचा तो संवाद ऐकून तिलाही गहिवरुन आलं.मोठ्या मुश्किलीने तिने अश्रू आवरले.
“उतर बेटा खाली.बाबांना कपडे बदलू दे.तुझाही फ्राँक ओला झाला असेल तोही बदलून घे”
थोड्यावेळाने ती आणि रितेश जेवायला बसली असतांना प्रिया आली आणि रितेशच्या मांडीवर जाऊन बसली.
” आई मला पण खुप भुक लागलीये.पण मी बाबांच्याच हातून जेवणार आहे”
अंजली आणि रितेश दोघांनाही हसू आलं.रितेश तिला हाताने भरवू लागला.आता मात्र प्रिया चांगली जेवली.जेवण झाल्यावर प्रिया अंजलीला म्हणाली
“आई मी आज मी बाबांजवळ झोपणार आहे”
अंजलीला हसू आलं.रोज खरं तर ती दोघांच्या मध्ये झोपायची पण आज ती रितेशच्या कुशीत झोपणार हे नक्की होतं.
झालंही तसंच ती रितेशच्या कुशीत त्याला मिठी मारुन झोपल्यावर अंजलीने रितेशला संध्याकाळपासूनच प्रिया किती बैचेन होती ते सांगितलं.तिच्या मनात चाललेल्या घालमेलीबद्दल,भीतीबद्दल सांगितल्यावर रितेश म्हणाला
“खरंच अंजू मुलींचं बापावर किती प्रेम असतं हे आज मी प्रत्यक्ष पाहिलंय.त्या मोठ्या झाल्यावरही असंच रहातं का गं हे प्रेम”
“प्रश्नच नाही. मुली कितीही मोठ्या झाल्या,अगदी लग्न होऊन त्यांची मुलं मोठी झाली तरी वडिलांवरचं त्यांचं प्रेम थोडंही कमी होत नाही. तुम्हांला आठवतं मागच्या वर्षी माझे वडिल वारल्यावर सात दिवस मी जेवले नव्हते.एकही मिनिट असा गेला नसेल ज्यात मी रडली नसेन”
“तसं असेल अंजू तर आपल्याला दुसरीही मुलगीच झाली तरी मला आवडेल”
अंजू समाधानाने हसली.मुलगी झाल्याचा सल रितेशच्या डोक्यातून कायमचा गेला हे बरंच झालं होतं.कारण अंजली आता गरोदर होती.पुन्हा मुलगीच झाली तर नवऱ्याची नाराजी आता रहाणार नव्हती.
रितेश प्रेमाने प्रियाच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवू लागला.त्याच्या स्पर्शाने प्रिया जागी झाली.झोपाळलेल्या स्वरात ती रितेशला म्हणाली
“बाबा तुम्ही मला खुप आवडता”
रितेशने तिला छातीशी कवटाळलं.तिच्या गालाचा मुका घेत तो म्हणाला
“बेटा तू पण मला खूप खूप खूप खूप आवडतेस “
– समाप्त –
(ही कथा माझ्या ” अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे.)
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈