श्री नंदकुमार पंडित वडेर
विविधा
☆ “माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण विश्वात नोंदवला गेला. पाचशे वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिर अखेर पूर्ण होऊन त्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनमोहक, सुहास्यवदन, राजीव लोचन असलेली रामलल्ला बालमूर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या अशा एका ऐतिहासिक क्षणाने दाखवून दिले आहे की धर्म आणि श्रध्दा कधीही तसूभर कमी होत नाही.सत्य आणि न्याय यांचाच विजय होत असतो.
ज्याला शब्दरूपी चित्रित केलं महर्षी वाल्मिकींनी, ज्याला मोठ्या कौतुकाने, प्रेमानं गायलं तुलसीदासांनी, समर्थांनी ज्याला आळवलं असा प्रभू श्रीराम, ज्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, रावणाचा तसाच कित्येक राक्षसांचा वध केला असा प्रभू श्रीरामचंद्र, सृष्टीवरच्या अवघ्या जीव-जंतुना ज्याने कृतार्थ केले आणि करत राहतो असा प्रभू श्रीरामचंद्र. कित्येक जणांनी त्यावर लिहिलं, गायलं, चित्रित केलं, त्यावर लिहिण्याचा, त्याचा नाम गाण्याचा, त्याच रूप चितरण्याचा तसा कित्येक माध्यमातून अनेक प्रकारे अनुपम आनंद लुटला, तरी तो नेहमीपेक्षा फार फार वेगळा उरतो. त्याच्या नामाची ओढ खुणावत राहते, रूपाची माधुरी भुरळ घालत राहते. दरवेळी नव्याने…
ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अस सौंदर्य, पराक्रम, कृपा, असणारा प्रभू श्रीरामचंद्र तो मुळी दिसतोच रामासाररखा…
अनेक संत, महात्मे, भक्तांच्या मांदियाळीने ही रामकथा ओघवती प्रवाही नि जीवंत ठेवली. त्यात तुलसीराम, एकनाथ भागवत, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज या सारखे अनेक रामभक्तांचं अपूर्व योगदान आहे.श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर तर अनेक ग्रंथ पूर्वीपासून उपलब्ध आहेत आणि आजही त्यात नव्याने भर पडत असतेच.आजच्या काळाशी, समाजमनाशी, त्यांच्या जीवनव्यवहाराशी सुसंगत जोडली जाते.ते अभ्यासक, लेखक, संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रभूर्ती आपआपले विचार जेव्हा मांडतात तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाला एक निश्चित आयाम, दिशा मिळून जाते.इतकच नाही तर त्या प्रभावाने काही वेळा तर जीवनाची दिशा सुध्दा बदलते.आता माझीच बदललेली पहाना…
सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मी देखील सर्व षड्ररिपुयुक्त, शीघ्रकोपी, संयमाचा अभाव…तरी बर्यापैकी वाचन, मनन, असून मन अशांत, अस्वस्थ राहिले होते. एक दिवस सद्गुरुंच्या दर्शनाचा योग आला, त्यांच्या सानिध्यात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या अनेक घटनां ते सांगताना म्हणाले,
“सात हजार वर्षानंतरही रामाचे स्मरण केले जात आहे, कारण त्यांनी हजारो पिढ्यांपासून लोकांना चांगुलपणा जोपासण्यासाठी, सत्याला धरून राहण्यासाठी आणि एकमेंकासोबत प्रेमाने राहण्यासाठी प्रेरित केले. रामाचे जीवन आपत्तींची एक शृंखलाच होती. तरी देखील तो अविचल राहिला. त्याने कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आत राग, संताप, किंवा द्वेष येऊ दिला नाही. राम जगात कृतीशील होता, लढाई देखील लढला, त्यात त्याने हेच दाखवून दिले. त्याच्या याच गुणापुढे आपण नतमस्तक आहोत.म्हणूनच त्याला एक अतिशय श्रेष्ठ मनुष्य, ‘मर्यादा पुरोषत्तम’ म्हणतो, देव म्हणत नाही.त्याचे गुण असे आहेत की तुम्हाला त्याचा आदर करावाच लागेल . तुम्ही सुध्दा तुमच्या जीवनात असे होऊ शकलात, तर तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. ही एक अशी संस्कृती आहे जिथे कोणीही स्वर्गातून उतरले नाही, जिथे मानव दैवी बनू शकतो. कुठेतरी एक देव आहे जो आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल.या ढोबळ विश्वास प्रणालीपासून मनुष्यानी स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे अविभाज्य भाग आहेत. ही अशी एक संस्कृती आहे जिने मुक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे. याचा अर्थ जिवंत असताना सर्व गोष्टीपासून मुक्त होणे.तुम्ही रोजच्या जीवनातून माघार घेतली आहे असे नाही, तुम्ही सक्रिय आहात पण मुक्त आहात, तुम्ही संरक्षित कोषामध्ये नाही.’
कालपर्यंत रामायाणातील ढोबळ कथानक ऐकून नि वाचून माहीत असलेल्या माझ्या मनाला या सद्गुरूंच्या आश्वासक विचारांनी मोहिनी घातली नाही तरच नवल.माझ्यासारख्या कैक दिशा भरकटलेल्या युवकांना देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ति आणि बुध्दी श्रीराम देवो.राष्ट्रधर्म, कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता,
स्वपराक्रम, स्वाभिमान याबाबत तत्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्व पणाला लावण्याचा धोका पत्करत असेल, तर तेथे श्री.रामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास, युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल हा माझ्या मनातल्या रामाने दिलेला संदेशच आहे असच म्हणायला हवं.
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈