डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ मला माफ करशील का? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
मला माफ करशील का?
हे कविते, मला माफ करशील का?
अल्लडशा चिमुकल्या शैशवात
नव्हती माझ्या अजाण बुद्धीजवळ
कसलीच अनुभवांची शिदोरी
तेव्हापासून माझ्या निर्व्याज निरागस बोटाला
आपल्या तरल कलात्मक हातात धरून
मोठ्या मायेने घेऊन गेलीस मला
मराठी सारस्वताच्या घनदाट काननात
ओळख करून द्यायला
जीवनाच्या सौंदर्याची अन् गर्भितार्थाची
कोण आपुलकीने
तरीही मी तुला विसरलो
मला मार्ग दाखविणाऱ्या माझ्या कविते
मला माफ करशील का?
काव्याचे विविधरंगी मार्ग चोखाळतांना मी
अवखळ प्रेयसीसारखी
कधी मुक्तछंदात नाचलीस
तर एखाद्या पतिव्रतेसारखी
कधी माझ्या गीतांना भावसुरात गायलीस
कधी माझंप्रेम आळविलेस आर्तपणे
तर कधी विरहगीतांना ढसढसून रडलीस
चिंतनाला माझ्या
तत्वज्ञानाचे प्रवचन बनून उतरलीस
माझ्या रसिक वाचकांच्या हृदयात अलगदपणे
तरीही आपत्प्रसंगी मी मात्र
त्याग केला तुझा कृतघ्नपणे
हे माझ्या सखी कविते
मला माफ करशील का?
जाणून घे ग मला माझ्या कविते
कधी नैराश्याच्या खाईत
झालो विलक्षण उद्विग्न
तर कधी नशिबाच्या पडलेल्या
विपरित फाशांनी
केले मला भग्न छिन्न विच्छिन्न
मला मात्र तशातच
नव्हती परवा कशाची
ना जाण होती आसमंताची
वेळ आली होती
होत्याचं नव्हते व्हायची
आणि मला विसर पडला तुम्हा सगळ्यांचाच ग!
निशिगंधासारखी गंधित होऊन फुलणारी
माझी कथा गेली कोमेजून
सर्वांना सामावून घेणारी
माझी कादंबरी गेली आकसून
माझ्या मनाच्या पिल्लांना उघडं करणाऱ्या फडताळाची
बंद झाली कवाडं अकस्मात
आणि तुझ्यासारखी
मृद्गंधी कविता गळून गेली
निर्घृणतेने, निष्ठुरतेने
मनाच्या विमनस्क अवस्थेत
दोष कोणाचा काहीच कळेना
तरीही झाली आहे आता
अग्नीपरीक्षेत होरपळलेली उपरती
हे परमेश्वरस्वरूपी माझ्या क्षमाशील कविते
मला आता तरी माफ करशील का?
सुखदुःखाच्या सारीपाटावर
आणि यशापयशाच्या हिंदोळ्यांवर
आयुष्याच्या प्रत्येक सोप्या अवघड वळणावर
मातेच्या वात्सल्याने,
गुरुजनांच्या कर्तव्यभावनेने
आणि
प्रेयसीच्या आर्त प्रेमाने
सदैव मला साथ देणाऱ्या
माझ्या विशालहृदयी प्रीय कविते
पुन्हा माझे बोट धरशील का?
मला माफ करून
पुन्हा तुझ्या पदरात घेशील का?
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈