श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

मी कल्हईवाला बनतो ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग

मी कल्हईवाला बनतो…

खूप दिवसांपूर्वी कधी नव्हे तो कल्हईवाला माझ्या दारी आला होता. त्याच्याकडून मी मग  माझ्याकडे असलेल्या पितळेच्या भांडयांना कल्हई करून घेतली होती. त्याचं व्यक्तिमत्व, कल्हई करण्याची पद्धत, तो त्यासाठी वापरत असलेलं सामान, वापरत असलेले पदार्थ आदींचे निरीक्षण करून मी त्यावर एक लेख लिहिला होता. तो कल्हईवाला मला फार आवडला होता. त्याने माझ्या बालपणीच्या स्मृती जागृत केल्या होत्या. त्याने कल्हई केलेली भांडी पाहून मला खूप समाधान वाटले. त्याचे कल्हईचे काम मी जीवनाशी जोडले. माणसाच्या मनालाही कधी कधी असाच गंज चढतो. त्यालाही तो काढून कल्हई करण्याची गरज असते वगैरे अशा छान छान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला.

लेख लिहून झाल्यावर तो माझ्या वाचकांसाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या भिंतीवर टाकला. वाचकांकडून तो खूप आवडल्याचा प्रतिसाद यायला लागला. अनेकांनी आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्याचे सांगितले. कोणाला तो कल्हईचा विशिष्ट वास आठवला. कोणाला त्या लेखात दिलेले ‘ लावा भांड्याला कल्हई ‘ हे गाणं आवडलं वगैरे. हे सगळं पाहून आपले श्रम सार्थकी लागल्याचे मला वाटले.

दुसऱ्या दिवशी हा लेख मी ईमेलने एका वर्तमानपत्रासाठी पाठवून दिला. तीनचार दिवसातच मला त्या संपादकांचा उलट टपाली संदेश आला की आम्ही तुमचा लेख आमच्या पेपरसाठी घेत आहोत. तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवून द्यावा. मला मोठा आनंद झाला. मी त्वरेने माझा फोटो पाठवून दिला. पेपरमध्ये लेख कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. आणि धन्य तो मंगळवारचा दिवस उजाडला. एका नामांकित पेपरच्या पुरवणीत माझा लेख आला होता. सकाळी आठ पासून मला त्या संदर्भात फोन यायला सुरुवात झाली. त्यावरून मला कळले की आज अमुक अमुक पेपरमध्ये आपला लेख आला आहे. मी माझ्याकडे नेहमी पेपर टाकणाऱ्या मुलाला त्या पेपरबद्दल विचारणार तोपर्यंत तो दुसरा पेपर टाकून ( खरं म्हणजे फेकून ) पसार झाला.

त्यानंतर पहिला फोन आला तो औरंगाबादहून. आमचे झालेले संभाषण असे

हॅलो, मी औरंगाबादहून बोलतो. तुम्ही भांड्यांना कल्हई करता का ?

(मी उडालोच…!) कोण मी ? नाही बुवा.

अहो, असं काय करता ? पेपरमध्ये लेखाखाली तुमचा नंबर दिला आहे.

(आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला) मी म्हटले, ‘ अच्छा, असं होय. पण अहो’ मी तो लेख लिहिला आहे. मी कल्हईवाला नाही.

बरं, पण भेटला तर सांगा. नंबर द्या त्याचा किंवा भेटला तर पाठवून द्या. 

मी म्हटलं, ‘ हो, हो अगदी नक्की…’

परत दुसरा फोन अगदी तसाच. मला लोकांचं मोठं नवल वाटू लागलं. यांना एवढंही समजूही नये का की हा दिलेला नंबर लेखकाचा आहे म्हणून ! या सगळ्या धक्क्यातून सावरून मी बाहेर पडलो. आता प्रत्यक्ष पेपर पाहिल्याशिवाय काही लक्षात येणार नाही तेव्हा पेपर आणायचा म्हणून निघालो. घराच्या थोडेसेच पुढे गेलो. तो एका ए सी पी ऑफिसमधून फोन. मी अमुक अमुक पोलीस स्टेशनमधील हवालदार बोलतो आहे. पेपरमध्ये तुमचा लेख वाचला. त्याचे माझे झालेले संभाषण ( उगवतीचे रंग )

तुम्ही कल्हई करता का ?

नाही. मी तो लेख लिहिला आहे.

मग तो कल्हईवाला तुमच्या ओळखीचा आहे का ?

नाही.

त्याचा नंबर आहे का ?

नाही.

कुठे राहतो ?

माहिती नाही.

तुम्हाला कसा आणि कुठे भेटला ?

अहो, तो दारावर आला होता. त्याच्याकडून माझ्या भांड्यांना कल्हई करून घेतली.

ठीक आहे. तो भेटला तर त्याचा नंबर घ्या. आम्हाला या नंबरवर कळवा. आम्हाला महत्वाचे काम आहे.

असे म्हणून हवालदार साहेबांनी फोन ठेवला. मी मात्र हवालदिल झालो. या महाशयांचे काय काम असावे कल्हईवाल्याकडे ? पोलीस स्टेशनमध्ये कधी तांब्यापितळेची भांडी पाहिल्याचे मला आठवत नाही. म्हटलं जाऊ द्या. आपल्याला काय करायचे ! नाहीतरी अलीकडे सगळ्याच गोष्टींना कल्हई करायची गरज आहे !

अशा प्रामाणिक विचारात रस्ता पार केला. पेपरवाल्याकडे आलो. त्याला म्हटलं, ‘ बाबा, अमुक अमुक पेपर आहे का ?

आहे ना साहेब.

त्याला पुरवणी आहे का ? ( कधी कधी एखाद्या पेपरमध्ये त्यांचे पुरवणीचे पान टाकायचे राहून जाते )

आहे ना साहेब. त्याने पाहून खात्री केली.

मी पैसे दिले, पेपर घेऊन मार्गाला लागलो. रस्त्यात पेपर उलगडून पाहिला. त्यात कल्हईवाल्याच्या छायाचित्रासह माझा  लेख आला होता. संपादक महाशयांनी लेखाच्या वर माझे नाव, फोटो छापला होता. लेखाच्या मध्यभागी ‘ कल्हईवाला ‘ असे ठळक शीर्षक होते. आणि लेखाच्या खाली संपर्कासाठी क्रमांक म्हणून माझा फोन नंबर दिला होता. आता लोकांचा काय गोंधळ झाला असावा याचा उलगडा मला झाला. लेखाच्या खाली दिलेला नंबर कल्हईवाल्याचा समजून त्यांनी मला फोन केला होता.

त्या दिवशी मला असे मोजून सातआठ फोन आले. एकाने तर चक्क विचारले की माझ्याकडे तांब्यापितळेची जुनी भांडी आहेत. ती वितळवून तुम्ही त्याच्या देवांच्या मूर्ती घडवून द्याल का ? त्या दिवशी मला अशा खूप नवनवीन गोष्टी कळल्या. नवीन उलगडा झाला. आपल्या लेखातून मनाला थोडीफार कल्हई करण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते  काही बरोबर नाही. आपल्याला आता प्रत्यक्ष कल्हईवाला होण्याची आवश्यकता आहे असेही वाटून गेले. ज्याची लोकांना गरज आहे असा एक नवीन व्यवसाय गवसला. आता कल्हई शिकून घेण्यासाठी तरी त्या कल्हईवाल्याला भेटणे आवश्यक झाले. तो पुन्हा कधी भेटतो बघू या. यावेळी मात्र मी त्याचा नंबर घ्यायला विसरणार नाही. त्या पोलीस स्टेशनला पण कळवावा लागेल ना !

माझ्या मनात ‘डफलीवाले डफली बजा’ च्या चालीवर उगाचच एक गाणे आकार घेऊ लागले.

कल्हईवाले, इधर तो आ

सारी दुनिया बुलाती हैं

तेरी कल्हईसे मेरे बर्तनपर क्या रंग आने लगा हैं

चांदी के जैसा बर्तन ये मेरा मुझको लगने लगा हैं

इधर भी आओ, उधर भी जाओ

बुला रहे हैं दुनियावाले…

कल्हईवाले, इधर तो आ..

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments