सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

चोख्याची महारी… (संत सोयराबाई) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.वारीत पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला जातात.  पंढरी जवळ येतेय तसतसा पावलांचा वेग वाढतो. टाळ मृदुंगाच्या नादामधून विठूभेटीची आस पाझरते. अभंगांचे सूर टिपेला पोहचलेले असतात. जातीपंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली सात-आठशे वर्ष याच वाटेवरून ही पावलं जाताहेत. तेराव्या शतकात सतरा वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्माण्याच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्यजनांच्या भाषेत रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा ‘माऊली’ ठरला.

समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव शिम्पी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती…पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब !तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको. निर्मळा त्याची बहीण.

बंका

बंका महार त्याचा मेहुणा आणि कर्ममेळा त्याचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जातिव्यवस्थेला प्रश्न् विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवतासुभा न मांडता सगळ्यांच्यासोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते.आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली! नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान अचंबित करतं.अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या रायाअसा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचं स्थान तात्कालिन संतांहून तसूभरही कमी नाही. सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख चोख्याची महारी असा करते.

चोखोबाची बायको

असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगांमधून डोकावणारं तत्त्वज्ञान सोपं आहे. त्यात जड शब्द नाहीत. भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी.. आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा तिचा प्रवास आहे. शुदांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होत तो काळ….एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत:च त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.

सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‘ब्र’ काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्न्च विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते…

संत सोयराबाई

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली…चामडी लोळवली. हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला ‘जोहर मायबाप जोहार’ म्हणत सवाल करता झाला, सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.

आमची तो दशा विपरित झाली

कोण आम्हा घाली पोटामध्ये

आमचं पालन करील बा कोण

तुजविण जाण दुजे आता

देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महारांचे स्थान पायरीशी. परमेश्वरही ‘बहुतांचा’ ! पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे? त्याला दीनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.

कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले

आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि

घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे

ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी

सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं.

सुखात हजार वाटेकरी असतात दु:ख तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.

सुखाचे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी…

हा प्रसिद्ध अभंगही तिचाच.

आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी, घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे

अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे

नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे.

साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते.

विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे.

सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.

आमच्या कुळी नाही वो संतान

तेणे वाटे शीण माझ्या मना..

असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.                      

धन्य त्या संत सोयराबाई आणि त्यांची अमीट भक्ती … 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments