डॉ. शैलजा करोडे
🌸 जीवनरंग 🌸
☆ सुखाचा पासवर्ड – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
नेहमी प्रमाणे रविवारच्या सुटीनंतरची बँकेत गर्दी. ‘मॅडम गर्दी कंट्रोल करा’ माझ्या वरिष्ठांची सूचना. “येस सर, नरेश ग्राहकांना व्यवस्थित रांगेत यायला सांग. आपला परीसर लहान असल्याने दहा/दहा च्या संख्येने दरवाज्याच्या आत घे. बाकींना बाहेरच रांगेत राहायला सांग.”
मी कॅशियर केबिनमध्ये डोकावत कॅशियर अशोकला विचारले “मिलिंदला पाठवू का मदतीला ?”
“पाठवा मॅडम.”
“आणि छोट्या डिपाॅझीट बँक ग्राहक मित्र केंद्रावर वर्ग करा.”
“होय, काही ग्राहक कॅश डिपाॅझीट मशिनचीही मदत घेत आहेत.”
एक ग्राहक तक्रार घेऊन आले, “मॅडम एक तास झाला कॅश डिपाॅझीट करून, अजून अकोल्याला पार्टीच्या खात्यात जमा झाले नाही.”
“अहो, होइल जमा. नेटवर्क कनेक्टीव्हीटी नाही आहे.”
“कनेक्टीव्हीटी नाही किती सहजतेने म्हणता हो तुम्ही. तिकडे आमचा पेशंट तळमळतोय. ऑपरेशन करायचंय. पैसे जमा झाल्याशिवाय होणार नाही ते.”
मी आमच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क केला. संपूर्ण सर्व्हर डाऊन होता. प्रधान कार्यालयाशीही संपर्क झाला. तासभर तरी लागणार होता. “सर, तासाभराने कनेक्टीव्हिटी येईल.”
“एक तास ? मॅडम अहो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. एका एका सेकंदाचा हिशोब आहे आणि तुम्ही एक तास म्हणतात? काय होईल पेशंटची हालत, काही माणुसकी आहे कि नाही तुमच्याजवळ ?”
“शांत व्हा सर,” मी त्यांना पिण्यास पाणी दिलं . “मी करते काहीतरी.” मी अकोला शाखेला फोन केला. शाखा व्यवस्थापकांना सगळी परिस्थिती सांगितली, ग्राहकांची एमरजन्सी सांगून माझ्या रिस्कवर पैसे द्यायला सांगितले. त्यांनी माझं नाव, GBPA नंबर घेतला व ग्राहकाला पैसे दिले. माझ्या समोर बसलेले ग्राहक मोहन वैद्य शांत झाले.
“धन्यवाद मॅडम, आम्ही अगतिक होतो, म्हणून बोललो मी. माफ करा.”
“ठीक आहे, तुमचं काम झालं ना, आनंद आहे मला.”
मोहन वैद्य गेले तशी मी थोडंसं हुश्श् केलं. माझी सहकारी प्रणिता सगळं पहात होती. ती म्हणाली, “सुनीता, कनेक्टीव्हीटी नसणे यात आमचा काय दोष. येतात काही तांत्रिक अडचणी. ग्राहकसेवा काही वेळापुरती खंडित होते हे मान्य. पण त्यात आपली चूक नाही ना. आपण काही हातावर हात धरुन बसत नाही. follow up सुरूच असतो. तो ग्राहक इतकं बोलत होता, तरी तू शांत राहिलीस. कसं शक्य होतं तुला हे बाई.”
“प्रणिता, येतातच असे समर प्रसंग आयुष्यात. ATM चालू नाही, बोलवा टेक्निशियन, त्यांना ताबडतोब येता येत नाही, कारण त्यांनाही अनेक ठिकाणची कामं असतात. ग्राहक ऐकत नाहीत. त्यांना ताबडतोब सुविधा हवी. ही तर काही उदाहरणं झाली. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ग्राहक त्रास हे देतातच. पण मी ते दुर्लक्षित करुन त्यांचं काम करुन देते.”
“अग तेच तर म्हणतेय मी. तू इतकी मवाळ कशी ? तुला त्रास नाही होत या गोष्टींचा?”
“खरं सांगू प्रणिता, स्वतःला त्रास होऊ नये हाच माझा उद्देश असतो. कारण ‘तू तू मी मी’ करण्यात मनःशांती जाते. आपलंच बी. पी. वाढतं. मन अस्वस्थ होतं. बरं एवढंच नाही तर आपल्याला घरही सांभाळायचं आहे. कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे. मग अशा गोष्टीत का आपली शक्ती खर्च करायची.
प्रणिता माझ्या कृतीने कुणाचं भलं होत असेल, चांगली सेवा मिळत असेल, पण यातून मला समाधान मिळतं, शांती मिळते, मी सुखी होते. बहुदा हाच माझा सुखाचा पासवर्ड असेल.”माझ्यापुढे दोन्ही हात जोडत प्रणिता बोलली, “धन्य आहेस गं बाई”.
प्रणिताने विषय छेडला आणि मी हळूहळू शिरले भूतकाळात.
“ए छकुली ऊठ गं, शाळेत जायचंय ना.”
मी अंथरूणात हातपाय हलवत, ‘आज नाही जात शाळेत’ सांगितलं.
“अगं, न जाऊन कसं चालेल. चांगलं शिक्षण घेशील तर जीवनात काही चांगलं करून दाखवशील. स्वतःच्या पायावर उभी राहशील. ज्ञानाने तुझ्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. जगात जो ज्ञानी तो मोठा गणला जातो. तुला मोठं बनायचं आहे ना. मग तुला शाळेत जायला हवं. भरपूर शिकायला हवं. ऊठ बाळ, तुझ्या सुखी जीवनासाठीचा हा पासवर्ड समज आणि शाळेला जा.”
शाळेतही माझा पहिला नंबर कधी चुकला नाही याचे कारण मी वेळच्यावेळी अभ्यास करायचे, गृहपाठ करायचे, इतर माझ्या वर्गमैत्रिणी मात्र ‘तहान लागली की विहीर खोदायची’ या तत्वाने परीक्षा आली कि अभ्यासाला लागायच्या. मला विचारायच्या “सुनीता तुझ्या यशाचं रहस्य काय गं.”
मी त्यांना सांगायचे, “अगं, अगदी सोपं आहे ते, वेळच्यावेळी अभ्यास, हाच माझा यशाचा पासवर्ड, मग ऐनवेळी माझी धावपळ होत नाही कि रात्र /रात्र जागरणं करावी लागत नाहीत म्हणून कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. म्हणून मी अगदी बिनधास्त असते.”
“आम्हांलाही आत्मसात करावा लागेल ग हा सुखाचा पासवर्ड.”
अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ‘पुस्तकी किडा’. कोणी काहीही म्हणू दे, मी तर सुखी आहे ना.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]