श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आई-वडिलांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याकाठी गेलेला श्रावणबाळ परतलाच नाही. मृगयेसाठी पाणवठ्याजवळच्या वृक्षावर अंधारात दबा धरून बसलेल्या राजा दशरथांच्या मरणबाणाला माणूस आणि जनावर यांतील भेद समजण्याचं काही कारण नव्हतं. पाण्यात बुचकाळल्या गेलेल्या घागरीचा आवाज दशरथांना हरिणाचा आवाज भासला आणि त्यांच्या प्रत्यंचेवरून बाण निघाला….आणि थेट श्रावणाच्या काळजात घुसला तो मृत्यूचा वैशाखवणवा घेऊनच. लाडक्या पुत्राला डोळ्यांनी कधी बघूही न शकलेल्या त्या म्हाता-या काळजांनी महाराज दशरथांना पुत्रविरहाचा शाप अगदी हृदयापासून दिला. आणि मग कर्मधर्मसंयोगाने महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या हृदयाकाशातील राम’चंद्र’ वनवासाच्या काळोखात लुप्त झाला…चौदा वर्षांसाठी….ही दीर्घ अमावस्याच म्हणावी!
महाराज दशरथ पुत्रविरहाच्या वेदनेच्या वाटेवर चालताना लवकरच थकले आणि त्यांची मृत्यूनेच सुटका केली….ईहलोकात रामनाम घेत प्राण सोडणा-यांमध्ये दशरथ सर्वप्रथम ठरले. परंतू महाराणी कौसल्या पुत्रमुख पुन्हा पाहण्यात सुदैवी ठरल्या….त्यांचे पुत्र श्रीराम परतले आणि त्यांच्या सोबतीला गेलेले राणी सुमित्रा आणि दशरथ महाराजांचे सुपुत्र लक्ष्मण सुद्धा!
पण कलियुगातील एका सुमित्रेचे राम परतलेच नाहीत….हिच्यापोटी एक नव्हे तर दोन दोन राम जन्मले होते!
रामयाणात कौसल्येचे श्री राम आणि सुमित्रेचे श्री लक्ष्मण अशी जोडी. पण या सुमित्रेच्या पोटी जणू राम-लक्ष्मण एकापाठोपाठ जन्मले. फरक इतकाच की एक राम आणि दुसरा शरद म्हणून ओळखला जात होता. त्यांना एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की तुम्हांला चार मुलगे होतील. अत्यंत भाविक असलेल्या या दांमप्त्याने त्यांच्या या होणार असलेल्या मुलग्यांची नांवे आधीच ठरवून ठेवली होती….राजा दशरथांचे चार पुत्र…..राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न! त्यांना पहिला मुलगा झाला…त्याचे नामकरण अर्थातच राम…दुसरा लक्ष्मण! पण तिसरी मुलगी झाली..पौर्णिमा! म्हणून मग लक्ष्मणाचे नाव बदलून शरद ठेवण्यात आले.
त्रेता युगात यज्ञांना संरक्षण देण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि श्रीलक्ष्मण या दोघाही कुमारांची मागणी केली होती. कलियुगात काळाने अनेक मातां-पित्यांकडे श्रीरामाच्या सुटकेसाठी पुत्रांची मागणी केली.
वर्ष १९९0. महिना ऑक्टोबरचा. दिवाळीच्या आसपासचे दिवस. म्हणजे आजपासून साधारण तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ. राजस्थानातील बिकानेरमधून कोलकात्यात व्यापारामध्ये आपले नशीब आजमावयला आलेल्या हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्या पोटी जन्मलेले दोन मुलगे असेच रामकार्यासाठी मागितले गेले आणि त्यांनी ते दिलेही. वीस बावीस वर्षांचे हे सुकुमार. १२ डिसेंबरला बहिणीचे लग्न होणार होते. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना या सुकुमारांनी आधी लगीन अयोध्येचे असा चंग बांधला. त्यांनी आई-वडिलांची परवानगी मिळवली. कारसेवा म्हणजे अयोध्येत जाऊन श्रीराम रायाची सेवा अशीच त्या जन्मदात्यांची कल्पना होती. कारण तोवर अयोध्येत असा रक्तरंजित संघर्ष पेटेल याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवाय हे कारसेवक प्रभु श्री रामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्यासारखे हाती धनुष्यबाण घेऊन निघालेले नव्हते. यांच्या हाती असणार होते फक्त भगवे ध्वज. हजारो वर्षांपूर्वी ज्या जागी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला होता, ते पवित्र स्थळ १५२८ मध्ये परकीय आक्रमक बाबरच्या एका सरदाराने, मीर बाकीने नष्ट करून त्यावर मस्जिद उभारली होती…त्याजागी पुन्हा मूळचे राममंदिर उभारण्यासाठी सेवा करायची होती…!
प्रवासादरम्यान दररोज एक पत्र लिहाल अशी अट हीरालाल आणि सुमित्रा यांनी आपल्या या पोरांना घातली. आणि ती त्यांना मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पोरांनी पळतच जाऊन दुकानातून पोस्ट कार्ड्स आणली आणि त्यावर पत्ते लिहिले…..प्रति,मा.श्री.हिरालालजी कोठारी….बडा बाजार…कोलकाता! काम आटोपून दहा बारा दिवसांत तर परतायचे होते.
दिवाळी संपून चार दिवस झाले होते…दिनांक २२ ऑक्टोबर,१९९०….कोलकात्यातील साथीदारांचे नेतृत्व करीत थोरले रामकुमार आणि धाकटे शरदकुमार अयोध्येकडे प्रस्थान करते झाले. संध्याकाळी सातची रेल्वेगाडी होती….उत्तर प्रदेशातील त्यावेळी मुघल सराय असे नाव असणा-या स्टेशनपर्यंत जाणारी. पण ही गाडी रद्द करण्यात आली. पण हे कारसेवक त्याच रेल्वेस्टेशनवर बसून राहिले….आणि प्रशासनाने रात्री दहा वाजता गुपचूप ती रेल्वे रवाना केली. मुलं पळतच त्या गाडीत शिरली आणि पहाटे मुघल सरायमध्ये पोहचली. तिथून त्यांना खाजगी वाहनातून अयोध्येत नेले जाणार होते.
यांच्या मस्तकात कारसेवा होती आणि मस्तकावर बांधलेल्या पट्टीवर कपाळावर शब्द दिसत होती जय श्री राम! कारसेवकांचा हा जत्था त्या दिवशी रात्री उशिरा रायबरेलीजवळच्या लालगंजपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे वाहनव्यवस्था उपलब्ध नव्हती. कारण प्रशासनाने प्रवासाची सरकारी साधने रोखून धरली होती. मग एका खाजगी टॅक्सीने हे दोघे आणि त्यांचे एक सहकारी राजेश अग्रवाल आझमगडच्या फुलपूर कसब्यात पोहोचले. येथून पुढे तर रस्ताच बंद केला गेला होता. मग ही जोडगोळी २५ ऑक्टोबरला इतर कारसेवकांसोबत चक्क शेतांतून लपतछपत पायीच अयोध्येकडे निघाली…बहुतांश प्रवास रात्रीच उरकायचा…वाटेत गावकरी देतील ते अन्न स्विकारायचे असा क्रम होता. तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈