डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

?जीवनरंग ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ क्षमा ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून. आज्जी आधीच गेलेली. साहजिकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं ‘ घरी बसुन ऐद्यासारखं खाऊ नका. काम करून हातभार लावा संसाराला.’ 

पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही. आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्यावाचून पर्याय उरला नाही.

बाहेरच मुलाला भेटून, लाज टाकून बाबा विचारायचे, ” येऊ का रे बाळा घरी रहायला? ” 

‘बाळ’ म्हणायचे, ” मला काही त्रास नाही बाबा, पण ‘हि’ला विचारुन सांगतो.” 

पण, ” या बाबा घरी ” असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही !

आता बाबा अट्टल भिकारी झाले…. झाले, की त्यांना केलं गेलं? 

अशीच भीक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, ” डाॕक्टर, म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.! “

बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही !

” नाव, पत्ता, पिनकोड सहित पत्र टाकूनही  पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहीतर वर्षानुवर्षे पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य ! नाव पत्ता सग्गळं बरोबर ! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले.” असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.

मी म्हणायचो, ” बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं.”

तर म्हणायचे. “आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू ? ” ….  मी निरुत्तर ! 

” वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा ?” …  बाबांचं बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो.

“काहीतरी काम करा बाबा,” असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.! म्हणायचे, “आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवून पाया पडतील. श्राद्धाला जेवताना 

‘ चांगला होता हो बिचारा ‘ असं म्हणतील. नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच !”

इतकं असुनही, एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भीक मागत नाहीत. 

… मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता ! 

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, ” एक गंमत सांगायचीय डाॕक्टर ! सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जाऊ दे म्हणते. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळून करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला भीक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.? 

” डाॕक्टर काय करु ? सल्ला द्या.”

साहजिकच मी बोललो, ” ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली, त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही, पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु ! “

बाबा म्हणाले, ” डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना ! चालेल तुम्हाला ? मी माझ्या माघारी, त्याला 

भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच ‘बाप’ असतो पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी, ‘ क्षमा ‘ म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डाॕक्टर…

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments