सुश्री त्रिशला शहा
मनमंजुषेतून
☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
समाजात सध्या अतिशय चर्चेत असलेला विषय म्हणजे अयोध्यामधील राममुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.या सोहळ्यानिमित्त अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भागात मंदिराची तात्पुरत्या स्वरुपाची प्रतिक्रुती बनवून कोट्यावधी रुपये खर्च केले.पण याचवेळी एका लहान गावात मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी स्वखर्चाने इमारत बांधून गावच्या सरपंचाने हिंदू मुस्लिम ऐक्य साधून समाजापुढे आदर्श ठेवला.
ही घटना आहे,कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गलगली या लहान गावातील.गलगली या गावी माझ्या बहिणीच्या मुलीचे,तनुजाचे सासर आहे.तनुजाचे पती श्री. राहुलकुमार गुजर म्हणजेच आमच्या घरचे जावयी.स्वतःची शेती,आँटोमोबाईलचे दुकान आणि गावचे सरपंचपद सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत रहाण्याची त्यांची मनोवृत्ती.गावातील कौटुंबिक कलह मिटवणे, लग्न जमवणे,शिक्षणासाठी गरजू मुलांना मदत करणे,गावात काही सुधारणा करणे अशी कामे ते नेहमीच करत असतात.
कोरोना काळात 2020 मध्ये अचानक लाँकडाऊन झाले त्याआधी दोन दिवस काही घरगुती कामानिमित्त राहुल आपल्या आईसमवेत दौंड,जि. पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेले होते,दोन दिवसांनी अचानक लाँकडाऊन चालू झाले आणि ते तिथेच अडकून राहिले.परतीचा मार्गच बंद झाला.त्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. एक महिन्याने बऱ्याच प्रयत्नातून गावी यायला परवानगी मिळाली पण गावात आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाईन म्हणून गलगली येथील एका उर्दू शाळेत रहावे लागले.या सात दिवसाच्या वास्तव्यात शाळेची दुरावस्था राहुल यांच्या लक्षात आली.त्यातच याकाळात त्यांना मुस्लीम समाजाकडून अतिशय मोलाचे सहकार्य ही मिळाले.यातूनच या शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार राहुल यांच्या मनी आला.पुढे कोरोना संपल्यानंतर या शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने करण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा करुन त्यांनी हा विषय मांडला आणि कामाला सुरवात करण्यास सांगितले. आर्थिक बाजू मी सांभाळेन असे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे या शाळेचे बांधकाम चालू झाले. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच राहुलना अपघात होऊन तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.त्यामुळे कामात थोडा खंड पडला. शारीरिक द्रुष्ट्या व्यवस्थित झाल्यावर काम परत जोमाने सुरु झाले आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण झाले. शाळेच्या या सुंदर वास्तुचा लोकार्पण सोहळा 26 जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा केला गेला. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय क्रुतज्ञतेने राहुलकुमार यांचा गौरव केलाच शिवाय त्यांच्या आईंचाही सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.
विशेष म्हणजे चांगले काम करीत असताना कुणीही मोडत घालू नये आणि ते व्यवस्थित पार पडावे म्हणूनच की काय या समाजोपयोगी कामाची वाच्यता काम पुर्ण होईपर्यंत राहुलकुमारनी कुठेही केली नाही,अगदी आपल्या आई व पत्नीलाही याबद्दल सांगितले नव्हते.10 वर्षांपूर्वी राहुल यांच्या पिताजींचे निधन झाले,त्यांची स्मृती म्हणून शिक्षकांनी त्यांचे नाव शाळेला दिले.कोरोना काळात हरवलेल्या माणुसकीचे दर्शन हिंदू- मुस्लिम एकतेतून घडले.
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈