सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ एकटं एकटं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
सगळ्या भाऊगर्दीत तू एकटा
मी एकटीने हे पाहिलं
हात घेतला तुझा हातात
मनाला भाऊगर्दीनं गाठलं||
*
एका प्रश्नाला हजार पर्याय
विचार कुणाशी जुळेना
तू पडला अगदी एकटा
मला एकटीला हे कळलं
हळूच ठेवला खांद्यावर हात
काळजी करू नको म्हटलं
विचार पटतात एकमेकांना
एकाकी मनाला हे पटलं||
*
एकटा तू एकटी मी
दोघांमध्ये एकता आली
एकुलत्या एका टॅहॅटॅहॅने
ओळख पटवून दिली
एकुलत्या एकाला एकटेपणा द्यायचा नाही म्हणून
एकेकाने साथ त्याला दिली
सुख दुःख झालं आपलं
वाटून घेतलं सारखं फक्त
अगदी खरं सांगते तुला
एकटा एकटी असूनही नाही वाटतं एकटं एकटं ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈