श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडतांना एका पाकिटात फक्त एक कागद अन् एक रुपयाचा ठोकळा हातात लागल्यानं त्यांची उत्सुकता वाढली. कागदाची घडी उघडली अन् त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहील होत, ” माफ करा. मी तुमच्या नात्यातला काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई-वडीलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्चशिक्षित बेरोजगार तरूण आहे मी. कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जातांना हे लग्न दिसलं. तसाच आत शिरलो नि भूक शमवली. या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे पुरेपूर जाणून आहे मी. तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता, म्हणून यात हा रुपया टाकला आहे.”
— या एकाच गोष्टीला किती पैलू आहेत !
भूक पापी आहे.
परिस्थिती नाइलाजाची आहे.
हातून अपकृत्य घडलं आहे.
त्याची मनाला खंत आहे.
कांटा बोचरा आहे.
पश्चात्तापाची भावना आहे.
पापक्षालनाची इच्छा आहे.
पण तेव्हढीही ताकद खिशात नाहीये.
रुपयाला अर्थ नाही याची जाण आहे.
पाकिटातल्या रुपयाला नुकसानभरपाई म्हणावं की आहेर म्हणावं? समजत नाही !
या साऱ्या प्रकाराला एकच गोष्ट जबाबदार आहे – पापी भूक.
ती सुद्धा रोज रोज लागते.
उपाशी माणसाने अन्नाची चोरी करावी कां – हा प्रश्नच अमानुष आहे.
“पापी पेटका सवाल है भाई”
पण माणूस नेक आहे.
त्याच्यापाशी देण्यासारखं असलेलं सर्वस्व –
एक रुपया – देऊन त्यानं लाखमोलाचं पुण्य जोडलं आहे.
म्हणूनच ही कथा कोटीमोलाची आहे !
मित्रांनो, काळजी घ्या…. कृपया अन्न वाया घालू नका. भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहक – सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈