सौ. अंजोर चाफेकर
इंद्रधनुष्य
☆ “करिअर – स्ट्रेस – आणि वांझपण” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
ती त्यादिवशी घरी आली.एकटी असली, नवऱ्याला वेळ असला की नेहमीच यायची.
मलाही तिचं घरात मनमोकळं बागडणं आवडायचं.
त्यादिवशी शेजारणीचे १ वर्षांचे मूल माझ्याकडे बागडत होते. तिने पटकन त्याला मोठ्या प्रेमाने मांडीवर घेतले. इतक्यात तिचा नवरा डाॅ.प्रथमेश तिला न्यायला घरी आला. तिच्या हातात मूल बघून मला म्हणाला,
“ किती छान दिसते ना पियू बाळाबरोबर? “ — मला त्याची व्यथा जाणवली.
ती दुसऱ्या दिवशी माॅर्निंग वाॅकला भेटली. ती जाॅगिंग करत होती. मी चालत होते.
“ आन्टी, मी चालते तुमच्या बरोबर. “ तिला मन मोकळे करायचे होते.
” बघितले ना, काल कसं बोलला तो ? मला नाही का वाटत मूल व्हावे? आता मी ३५ हून जास्ती आहे.
याला सर्व पाॅश हवे. घर घेतले. इंटिरिअरला दीड कोटी. नवीन क्लिनिकवर इतका खर्च केला. आम्ही दोघे dermatologist. एकेक लेझर मशीन १ कोटीच्या वरती. सर्व लोनचा EMI भरावाच लागतो. मी प्रेगन्सीत घरी बसू शकत नाही. तरी आम्ही मागे ट्राय केले, पण मिसकॅरेज झाले. आता भीतीच वाटते.”
माझ्या कांप्लेक्स मधली सोनिया. इतकी हुषार, एम्.बी.ए.झालेली. सर्व जगाची सफर केलेली. २०-२५ कंन्ट्रीज फिरून आलेली. बाबा गाडीतून रोज जुळ्या मुलींना फिरवते. मुली इतक्या गोड.
“आन्टी मी ४० वर्षांची होईपर्यंत मूल होऊ देण्याचा विचारच नाही केला. माझी करिअर इतकी छान चालली होती. पण म्हटलं, ४० नंतर विचार करता येणार नाही. माझी तीन ivf cycles फेल गेली. आणि चौथ्या वेळी जुळे detect झाले. मग नऊ महिने बेड रेस्ट. मुलींना सांभाळायला ३ मुली ठेवल्यात.
आता मुली वर्षांच्या झाल्यावर नवीन जाॅब शोधीन. मी घरी बसूच शकत नाही.”
माझ्या मुलीची नणंद. इतकी हुषार. इतकी सुंदर. स्वभावानी इतकी लाघवी. एम्.बी. बी. एस्. झाली.
लग्नासाठी मुलगा बघून दिला नाही. ती एम्.डी.झाली. मग फेलोशीप घेतली. आता ३६ वर्षांची झाली.
आता म्हणते, मुलगा बघा.
” तुला कुणी आवडला नाही का?”
” मामी ,मी माझ्या अभ्यासात इतकी फोकस्ड होते .मला माझ्या कॅलीबरचा तर मिळायला नको.”
— तिला एकही मुलगा पसंतच पडत नाही. आता लग्न झाले तरी मूल नैसर्गिक होणे अशक्य. शिवाय पस्तीशीनंतर मुलींची फर्टिलिटी कमी होते. मुलांचाही स्पर्म काउंट कमी होतो. त्यामुळे आय् व्ही. एफ्.सक्सेसफुल होईल याचीही खात्री नाही. बरं, त्यातूनही चाळिशीनंतर मूल झालेच तर त्याच्यात काॅन्जिनिअल डिफेक्टस, abnormilities राहण्याची शक्यता असते.
माझ्या मैत्रिणीची मुलगी नेहा, ३४ वर्षांची आहे. नुकतीच ती कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट झाली.
आता नेक्स्ट स्टेप म्हणजे डिरेक्टर. “ आन्टी, मी आता प्रेग्ननसीचा विचार नाही करु शकत. मी मॅटरनिटी लिव्ह घेतली तर माझ्या खालच्याला तो चान्स मिळेल.व ते मी नाही सहन करू शकणार. ३० ते ३८ ही आमच्या करिअरची क्रूशियल वर्षे असतात. मी माझे एग्ज फ्रीज करून ठेवलेत. “
– एग्ज फ्रीज करण्याचा विचार २० ते ३० व्या वर्षी करावा लागतो.
निमाचा जाॅब असा आहे की तिला खूप ट्राव्हल करावे लागते. ती म्हणते, “ मी सरोगसी पसंत करीन.
म्हणजे मला नऊ महीने अडकून पडायला नको.”
नैसर्गिकरित्या गर्भारोपण हे आता मागे पडत चाललंय. सर्वजण टेक्नाॅलाॅजीचा उपयोग करतात.
१९८६ मधे जेव्हा डाॅ. इंदिरा हिंदुजाने भारतात पहिल्यांदा के ई एम् हाॅस्पिटलमधे टेस्ट ट्यूब बेबीची डिलीव्हरी केली, तेव्हा मूल न होऊ शकणा-यांना दिलासा होता.
नेहा म्हणते, “ काकी, आई सारखी पाठी लागली आहे .. मूल होऊ दे म्हणून. पण मी कामावरून घरी येते तेव्हा मी इतकी थकलेली असते. तो ही दमलेला असतो. इंटिमसी जमत नाही. वीकएन्डला आठवड्याची
साचलेली कामे असतात. आणि आता इतकं पॅशनही वाटत नाही.”
हल्ली मुलीही दिवसाला सहा सात सिगरेट ओढतात. त्यामुळे एग्ज निर्माण होत नाहीत. फॅलोपिअन ट्यूब ब्लॉक होते. मुला मुलींचे कामाचे तास वाढलेत. कामाचा ताण वाढलाय. जाॅबचेही प्रेशर असतेच. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. त्यामुळेही infertility वाढते.
टेक्नाॅलाॅजी कितीही प्रगत झाली तरी स्ट्रेसमुळे ती कमीच पडणार…. आणि काळाबरोबर हा प्रॉब्लेम वाढतच जाणार…. पण विचार कोण करणार ? ….. आणि कधी ? ….
© सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈