श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ जीवन एक नाटक… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(त्यांच्या शिस्तबध्द जीवनाचं वेळापत्रकच कोसळलं. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडायचे आणि सकाळचा चहा बाहेरच घेऊन यायचे.) इथून पुढे —
एके दिवशी बाहेरून फिरून आल्यावर ते वृत्तपत्र वाचत बसले होते. त्यानंतर तासाभराने त्यांच्या समोरच्या टेबलावर चहाचा कप ठेवताच ताऊजींनी सहज सांगितलं, “माझा चहा झालाय. बाहेरच घेऊन आलोय.”
कौशिक लगेच संतापून म्हणाला, “हेच दाखवायचं ना तुम्हाला की मम्मी गेल्यानंतर आम्ही तुमची काळजी घेत नाहीय ते.”
“अरे तसं काही नाही बेटा.” ताऊजीनं सांगितलं त्यावर कौशिक उसळून म्हणाला, “अंजू सकाळी उठल्यापासून राब राब राबत असते. घरात बरीच कामं असतात तिला. थोडा उशीर झाला म्हणून काय बिघडलं? तुम्ही थोडं धीर धरायला हवं ना? आता तुम्हाला कुठं जायचं असतं, रिटायरच आहात ना?”
ताऊजी एवढंच बोलले, “थोडासा उशीर? अरे एकदा घड्याळाकडे पाहा किती वाजलेत ते आणि आठव तुझी आई किती वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट द्यायची आणि कधी सगळ्यांचे डबे भरून द्यायची ते.”
कौशिक तुच्छपणे म्हणाला, “ठीक आहे, पापा तुम्हाला जसं वाटेल तसं करा. चहा नाष्टा बाहेर करायचा असेल तर खुशाल करा. घरात अंजूच्या वेळेप्रमाणे नाष्टा आणि जेवण तयार होईल. याउपर तुमची मर्जी.” कौशिकने एका क्षणात एक घाव दोन तुकडे करून टाकले.
यापुढे वाद होऊ नयेत म्हणून ताऊजींनी संवादच थांबवला. जे काही पुढ्यात यायचं, ते निमूटपणे जेवून आपल्या खोलीत जायचे. मागच्या महिन्यात कहरच झाला. ताऊजींना न विचारताच कौशिकने वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या.
ताऊजी म्हणाले, “अरे किमान मला सांगायचं तरी होतंस.” त्यावर कौशिक कोरडेपणाने म्हणाला, “त्यात तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही घर माझ्या नांवावर करून दिलंत ना, मग मी काहीही करायला मोकळा आहे.”
ताऊजींच्या नांवात ‘धीरज’ असलं तरी त्यांचा धीर सुटला होता. सकाळी फिरायला म्हणून निघाले. घरी परतलेच नाहीत. किती तरी वेळ बागेतच ताटकळत बसले. कुणीतरी येऊन माझ्या बाबांना सांगितलं. मग आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. ते अजूनही कुणाशी जास्त बोलत नाहीत. किमान पुस्तकांत तेवढे रमतात. काल तुम्ही आलात आणि फार काळानंतर त्यांना इतक्या उत्स्फूर्तपणे बोलताना पाहिलं. पुन्हा एकदा थॅंक यू सर !”
त्यानंतरच्या दोनच दिवसांनी संध्याकाळी धीरजजीना भेटायला गेलो. धीरजजी माझी वाटच पाहत होते. नमस्कार करीत त्यांना म्हटलं, “तुमच्यातल्या मराठी नाटक प्रेमाने मला तुमच्यापर्यंत खेचून आणलं आहे. माझ्याही जुन्या स्मृती जागा झाल्या. एवढे कसे तुम्ही मराठी नाटकांच्या प्रेमात पडलात?”
धीरजजी म्हणाले, “तुम्हाला सांगितलं ना, माझी पत्नी कुसुम महाराष्ट्रीयन होती म्हणून. तिला नाटकांचं प्रचंड वेड होतं. त्याकाळी मराठी रसिक प्रेक्षक नाटकांना भरभरून दाद द्यायचे. स्त्रिया आपल्या ठेवणीतल्या साड्या नेसून आणि खांद्यावर नक्षीदार शॉल, केसांत मोगऱ्याची फुलं माळून नाटकाला यायच्या. नाटक सुरू व्हायच्या आधी मंगल सनईचे सूर घुमत राहायचे.
आम्ही दोघांनी खूप नाटकं पाहिली. ‘तो मी नव्हेच’, असं इब्लिसपणे हसत ओघवत्या शैलीत बोलणारा तो लखोबा लोखंडे आणि इथे ओशाळला मृत्यू नाटकातील औरंगजेबाच्या भूमिकेतील, प्रभाकर पणशीकर. भक्ती बर्वे इनामदार यांची ‘ती फुलराणी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी, देव दीनाघरी धावला’ या सारख्या ताई-भाऊंची कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके सादर करून मराठी घराघरात पोहोचलेला तुमचा तो नऊ अक्षरांचा प्रतिभावंत नाटककार बाळ कोल्हटकर. मराठी संगीत नाटकांनी तर काय बहार उडवून दिली होती. कीर्ती शिलेदार यांचा ‘स्वरसम्राज्ञी. वसंतराव देशपांडे यांचं ‘कट्यार काळजात घुसली’ अशी एक ना अनेक नाटके पाहिली.
मी मध्येच म्हणालो, “धीरजजी, लहान तोंडी मोठा घास म्हणा हवं तर, तुम्ही नवीन काहीतरी लिहित राहावं, असं वाटतं. वाचकसुध्दा तुमच्या हातून लिहिलेले साहित्य वाचण्यासाठी तेवढाच आतुर असतो.”
“खरं सांगू साहेब. माझी प्रेरणास्रोत कुसुम मला अर्ध्यावर सोडून गेली आहे. माझं मन आता कुठेच रमत नाहीये. माझ्यातली प्रतिभा आता उतरणीला लागलीय हे मान्य करायला हवं. वाचकांची मागणी पूर्ण करणं आता अवघड होत चाललंय. शब्दावर शब्द चढवून लेखांचे इमारती बांधणारे लेखक कित्येक सापडतील. आजचे वृत्तपत्र उद्याची रद्दी होते. अशा प्रकारच्या लेखनाची गत तीच होते. तुम्ही माझं ‘बहुत याद आओगे’ हे नाटक वाचलंत ना? बस्स माझे एखादे नाटक, एखादी कथा जरी कुणाच्या स्मरणात राहिली तरी पुरेसे आहे.”
मी विषयांतर करत म्हणालो, “वि. वा. शिरवाडकरांचं ‘नटसम्राट’ पाहिलंत का हो?”
“हो. कुसुमचं ते आवडतं नाटक होतं. डॉ. श्रीराम लागूंची गणपतराव बेलवलकर ही भूमिका कशी विसरता येईल? हे नाटक आपल्या जीवनातील जोडीदाराचं अस्तित्व अधोरेखित करतं! परमेश्वराशिवाय दुसरा कुणीच ‘आपला’ नसतो हे जरी खरं असलं तरी पोटच्या मुलांपेक्षाही आपली अर्धांगिनी ‘आपली’ असते. आई-वडिलांचं प्रेम अगदी निरपेक्ष असतं; त्यांच्यानंतर आपल्या सुख-दु:खात आपलं ‘सरकार’ अर्थात पत्नीच सहभागी असते. आयुष्यभराची कमाई दोन्ही लेकरांमध्ये वाटून टाकायला निघालेल्या गणपतरावांना त्यांची पत्नी कावेरी सांगते, ‘एक वेळ समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये.’ हा सल्ला न ऐकणाऱ्या गणपतरावांवर अखेर बेघर होण्याची वेळ येते.
कुसुमही तेच म्हणायची, ‘मुलं वाईट नसतात हो. म्हातारपण वाईट असतं!. मी माझ्या सरकारचं, कुसुमचं ऐकायला हवं होतं. श्रीकांतसाहेब हे नाटक माझ्या जीवनातच रूतून बसेल आणि माझ्या जीवनाचंच असं नाटक होईल असं कधी वाटलं नव्हतं.”
त्यांच्या बोलण्यानंतर काही क्षण शांतता पसरली. थोड्या वेळाने तेच बोलले, “श्रीकांत साहेब, माझ्याकडून चूक झाली का हो?”
ह्या प्रश्नावर मी काय सांगणार. “धीरजजी, ज्या चुका दुरूस्त करता येत नाहीत त्याचा विचार करून काय उपयोग आहे? आपल्या हातात जे आहे ते करावं?”
माझ्या बोलण्यावर धीरजजींचा चेहरा प्रश्नांकित झाला.
“धीरजजी यापुढेही लिहित राहणं, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही पुन्हा लिहित असलेलं पाहून कुसुमताई जिथे असतील तिथे निश्चित आनंदी राहतील, एवढं मात्र खरं!”
धीरजजींचे दोन्ही थरथरते हात हातात घेऊन मी निरोप घेतला. एके दिवशी त्यांचा निरोप आला. त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक ठेवलं आणि “श्रीकांत सर, धन्यवाद.” असं म्हणत आत्मविश्वासानं हस्तांदोलन केलं.
नुकतंच फुलांनी सजवलेल्या तसबिरीत कुसुमताई अगदीच प्रसन्नपणे हसत होत्या असं मला वाटून गेलं.
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈