वाचताना वेचलेले
☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्यसंस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.
वकील म्हणाले, “अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते रॉयल्टी वगैरे देतात?”
गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली.
करकऱ्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व ते म्हणाले, ”यावर सही करून द्या.”
गदिमांनी विचारले, “कशासाठी ?”
“ मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही.”
क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,
“मग गीतरामायण लिहिलं, याला काहीच अर्थ उरणार नाही. वकीलसाहेब, अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं? “
करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले.कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम अशा अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या. किती हा मनाचा मोठेपणा!गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात-
‘नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचे मूल्य मुनिजना
अवघ्या आशा श्रीरामार्पण’
*
प्रभू रामाच्या चरणी गदिमांची सेवा रुजू झाली आहे.
‘अवघ्या आशा श्रीरामार्पण!’
*****
लेखक : श्री.सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू).
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈