सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ रथसप्तमी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

प्रातः स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यं

रूपं हि मण्डलमूचोSथ तनुर्यजूंषि |

सामानि यस्य किरणा: प्रभवादि हेतुं

ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपं ||

अर्थ –

ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.

रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा  सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!

वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.

(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)

सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)

एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.

प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता

आभा – धर्मशक्ती दाता

प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता

रश्मी – सृजनशक्ती दाता

ज्योती – भक्तीरस निर्माती

तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी

महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी

या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.

सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.

वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)

सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!

त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर  इंद्रदेव  मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!

सूर्यदेवा,

पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर  सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती?  हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा,  तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.

माथी किरीट, हाती  कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात  घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!

तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.

कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे,  अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.

तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.

आणखी एक –

स्तुती सुमनांची नाही ओंजळ

 ही तर आहे कबुली प्रांजळ

दिनमणी

आकाशी अरुणिमा पसरली,

 रविरथ चाहूल विश्वा आली

शतशतकोटी किरणे ल्याली,

तमनाशक ती प्रभा उमलली ।।

*

सप्त वारु अन् एक चक्री रथ,

सारथी त्याचा पांगुळा

ना आकाशी,ना धरेवरी

तरीही आक्रमितो भूमंडळा ।।

*

घेऊन संज्ञा वामांगी,

पद्मासनी तो वरद हस्त साजे

शंख, चक्र, पद्मधारी

शिरी सुवर्ण मुकुट विराजे ।।

*

रविवासर तो सप्तमीला

उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आले

तेजःपुंज ते रुप पाहुनी

अदिती कश्यप धन्य झाले ।।

*

सुग्रीव, कर्ण हे तुझेच अंश रे,

ज्ञान दिले तू हनुमंता

ब्रह्मा, विष्णू, शिवस्वरूप तू

पंच महाभूतांचा निर्माता ।।

*

देव, पितर, यक्ष तव सेवेला

ग्रहांचा तू अधिपती

असूर, निशाचर, सिद्ध वंदिती

त्रिलोका तू कालगती ।।

*

रूप ऋग्वेदी, तनू यजुर्वेदी,

सामवेदी तव रश्मी

पितामह तू या विश्वाचा,

आकाशाचा तू स्वामी ।।

*

मार्ग दाविसी आम्हा पामरा

असत्या कडून सत्याकडे

धर्मसूर्य तू नेसी जीवा

मृत्यू पासून अमरत्वाकडे ।।

*

दिपते धरती तव तेजाने

क्षुद्र जीव रे आम्ही सारे

तरी स्पर्शूनी आमुचे चरण तू

नम्रतेचा आदर्श रे  ।।

*

निर्विवाद असे, अधिराज्य तुझे

या त्रैलोक्यावरती

अनासक्त तू , क्षणात सारे,

आवरुन घेशी या मावळती ।।

*

तू येण्याच्या आधीच पडतो,

सडा मोतियांचा भूवरी

कंठातील तो हार देऊनी

जाशी का पश्चिमेवरी ।।

*

जपून ठेवीन ठेव तुझिया

तेजाची अन् शक्तीची

देवघरी या रोज तेवते

एक वात तव ज्योतीची ।।

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments