कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 209 – विजय साहित्य
☆ रूप गणेशाचे… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
सगुण निर्गुण
भक्ती आणि शक्ती
लागते आसक्ती
दर्शनाची…! १
*
चौसष्ट कलांचा
पहा अधिपती
ऋद्धी सिद्धी पती
गुणाधीश…! २
*
रूप गणेशाचे
अष्ट सात्विकात
मूर्ती अंतरात
आशीर्वादी…! ३
*
वक्रतुंड कधी
कधी एकदंत
दाखवी अनंत
निजरूप…! ४
*
कृष्ण पिंगाक्षात
गजवक्त्र वसे
लंबोदर ठसे
नामजपी…! ५
*
विघ्न राजेंद्राचा
अलौकीक थाट
संकटांची लाट
थोपवितो…! ६
*
विकट रूपात
गणेशाची माया
सुखशांती छाया
भक्तांमाजी…! ७
*
धूम्रवर्ण छबी
भालचंद्र कांती
देई मनःशांती
शुभंकर…! ८
*
देतसे दर्शन
गणपती इथे
गजानन तिथे
पदोपदी..!९
*
अष्ट विनायकी
गुणकारी मात्रा
फलदायी यात्रा
सालंकृत…!१०
*
विघ्ननाश करी
व्यक्त प्रेम भाव
पैलतीरा लाव
नाव माझी..!११
*
रूप गणेशाचे
वर्णी कविराज
जन्मोत्सव आज
निजधामी….!१२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈