सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर 

आमच्या रिसॉर्टला लागूनच समुद्रकिनारा असल्यामुळे आम्ही सकाळी समुद्रावरच फेरफटका मारला. ढगाळ वातावरणामुळे सूर्योदयाचा आनंद मात्र मनासारखा घेता आला नाही.  पण एकंदर सारे सुखद होते.

एक मच्छीमार त्याची छोटीशी नाव समुद्रात ढकलून काहीसा आत जाऊन मासेमारी करत होता. थोड्यावेळाने तो परतला आणि त्याच्या जाळ्यात अडकलेली मासळी तो सोडवू लागला.  किनाऱ्यावर बोट खेचली, तिला उलटी करून त्यातले पाणी रेती उपसले.  पसरलेल्या जाळ्यांची नीट घडी घालून सारे आवरले आणि पकडलेल्या मासळीची थैली घेऊन तो परतला.  संपूर्ण भिजला होता. कमरेला आपल्या कोळ्यांसारखेच घट्ट वस्त्र आणि डोक्यावर आडवी टोकदार टोपी.  एकटाच मन लावून काम करत होता.  कदाचित मिळालेल्या मासळीवरच त्याची आजच्या दिवसाची उपजीविका असेल.  पण तो त्रासलेला, थकलेला वाटला नाही.  कर्तव्यनिष्ठ, जीवनाला सामोरा जाणारा धीट दर्यावर्दीच भासला.  पुन्हा एकदा वाटलं, देश कोणताही असू दे, माणूस भले रंगा रूपाने वेगळा असू दे, पण माणूस हा माणूसच असतो. भाव भावनांचं, जगण्याचं एकच रसायन.  प्रवासामध्ये असे वैचारिक दृष्टिकोन आपोआपच विस्तृत होत जातात.वसुधैव कुटुंबकम*याचा अर्थ कळतो.  एक सांगायचं राहिलंच!  त्या मच्छीमाराच्या टोपलीतले ताजे मासे पाहून आम्हा सगळ्यांनाच त्याच्याकडून एक तरी फ्रेश कॅच घ्यावा आणि मस्त भारतीय पद्धतीने तेलावर परतून खावा असे वाटले.  आम्हाला पाकखाना  व्यवस्था होती.  मात्र तेल, मीठ, तिखट आणावे लागले असते आणि त्यासाठी पुन्हा काही हजार आयडिआर लागले असते! म्हणून ती खमंग, चमचमीत कल्पना नाईलाजाने आम्ही सोडूनच दिली.

बाली इंडोनेशियन बेटावर मुक्तपणे हिंडताना जाणवत होता तो इथला  नयनरम्य निसर्ग !रम्य समुद्रकिनारे. पारंपारिक संस्कृती, सर्जनशीलता, कला, हस्तकला आणि इथल्या स्थानिक लोकांचा अस्सल उबदारपणा. बाली बेटावर फिरत असताना वेगळेपणा जाणवत असला तरी आपण भारतापासून दूर आहोत असे मात्र वाटत नाही. आंबा, केळी, नारळाची झाडे आपल्याला कोकण केरळची आठवण करून देतात.  हिरवीगार भाताची पसरलेली शेतं,  त्यावर अलगद पडलेले सूर्यकिरण आणि वातावरणात दरवळलेला आंबेमोहोराचा सुगंध हा अनुभव केवळ वर्णनातीत. डिसेंबर महिन्यातही आंब्याच्या झुबक्यांनी लगडलेले आम्रवृक्ष पाहताना मन आनंदित होते, थक्क होते.  रस्त्यावर जिकडे तिकडे बहरलेले गुलमोहर भारतातल्या चैत्र वैशाखाची आठवण करून देतात. टवटवीत विविध रंगाच्या बोगन वेली, पांढऱ्या आणि पिवळ्या चाफ्यांनी पानोपानी  बहरलेली झाडं  कॅमेरातली मेमरी संपवतात.  इथली जास्वंदी, एक्झोरा, झेंडू जणू काही  आपल्याशी संवाद साधतात.

“तुम्ही आणि आम्ही एकच आहोत” अशी भावना निर्माण करतात.

रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, फळवाले, खाद्यपदार्थांच्या गाड्या पाहताना तर वाटते हे सारं अगदी आपल्या देशातल्या सारखंच आहे.

रस्ते आखीव आणि रुंद असले तरी वाहनांची वर्दळ जाणवते. मात्र एक जाणवतं ते या वर्दळीला असलेली शिस्त.  अजिबात घाई नाही. नियम मोडण्याची वृत्ती नाही, हॉर्नचा कलकलाट, नाही सिग्नलचे इशारे काटेकोरपणे पाळणारा हा ट्रॅफिक मात्र अमेरिकन वाटतो.  चुकारपणे मनात येते हे इंडोनेशियन लोक मुंबई पुण्यात गाडी चालवू शकतील का?

इथली टप्पे असलेली लाल कौलारू घरे लक्षवेधीच आहेत. या घरांची बांधणी काहीशी चिनी, नेपाळी, हिमाचल प्रदेशीय वाटते.  हिंदू मंदिरे जशी आहेत तसेच इथे बौद्धविहारही आहेत. भिंतीवरची रंगीबेरंगी तिबेटियन कलाकारी आणि वास्तुकला इथे पहायला मिळतेच पण वैविध्य व निराळेपण जाणवतं ते चौकाचौकातली  हिंदू पुराणातल्या व्यक्तींची भव्य शिल्पे पाहताना. संगीत आणि नृत्यकलेसाठी हे बेट प्रसिद्ध आहे हे  इथल्या नृत्यांगना, वाद्यं यांची शिल्पं अधोरेखित करतात.  ही रस्त्यावरची शिल्पं अतिशय काळजीपूर्वक सांभाळलेली आहेत. कुठेही धूळ नाही, रंग उडालेले नाहीत.  बालीत हिंडताना नेत्रांना दिसणारा हा नजारा फारच सुखद वाटतो.

शहरीकरण आणि परंपरा यांची सुरेख सरमिसळ इथे आहे. कोकोमार्ट, अल्फा मार्ट सारखी सुपर मार्केट्स, ब्रँडेड दुकाने एकीकडे तर पारंपारिक कला, संस्कृती हिंदू धर्माचे वर्चस्व दाखवणारी मंदिरे आणि विहार, तसेच सर्वत्र पसरलेला अथांग सागर आणि झाडीझुडपातला निसर्ग एकीकडे.  मानवनिर्मित आणि निसर्ग यांची झालेली दोस्ती एक सुंदर संदेश देते.. विकास करा निसर्ग जपा 

चांडीसार मधला आजचा आमचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सानुरला जाणार होतो.  तत्पूर्वी आमच्या रिसॉर्ट तर्फे समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंट मध्ये कर्मा सदस्यांना बार्बेक्यू आणि वाईन डिनर होतं. तरुण आणि ज्येष्ठ पर्यटकांसाठी ही एक मनोरंजक भेट(treat) होती. गंमत म्हणजे इथे रात्रीचे भोजनही संध्याकाळी पाच पासूनच सुरू होते आणि आठला संपते.  त्यामुळे आम्ही सकाळचे लंच घेतलेच नाही. या कॉम्प्लिमेंटरी डिनरचा आस्वादच पूर्णपणे घ्यायचा ठरवला आणि तो घेतलाही. समुद्राची गाज, सोबत बालीनियन लोक संगीत.. हेही काहीसे भारतीय संगीताच्या जवळपासचे आणि गरमागरम तंदुरी व्हेज नॉनव्हेज पदार्थ आणि सोबत रेड वाईनचा प्याला.  वाचकहो!  गैरसमज करून घेऊ नका पण अशा वातावरणात जीवन जगण्याचा हलका आणि चौफेर आनंद का घेऊ नये?”थोडासा झूम लो..”

आमच्याबरोबर आमच्यासारखेच सारे तरुण, म्हातारे पर्यटक मस्त रंगीन पणे या सहलीची मौज लुटत होते, वय विसरत होते  हे मात्र नक्की.

 – क्रमशः भाग चौथा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments