सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “हर्षोत्सव…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
किती घातले देहावर घाव
गणना त्याची नाही केली
कित्येकांनी साल काढली
मूकपणाने तीही साहिली
*
गेली पाने शाखाही मोडल्या
सौंदर्यासह श्वास गुदमरला
असंख्य जखमा अंगी घेऊन
बुंधाही हताशवाणा झाला
*
मुळे परंतु भक्कम होती
पोषण पुरवत होती माती
घरतीमाता मुळे धरूनीया
हिंमत आतून पुरवित होती
*
त्या धरतीने हलके मजला
कोवळा नजराणा दिधला
यातुन वाढव वैभव गेलेले
वसा हिरवा मज पुन्हा लाभला
*
हर्षोत्सव माझ्या मनीचा
नवनिर्मितीच्या आनंदाचा
नर्तन करती कोवळी पाने
फुटतील आणखी जोमाने
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈