? इंद्रधनुष्य ?

☆ वसाहती अंतराळातील — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.

अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार, आणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.

अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण वजन हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल, शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.

एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments