सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ मराठी साजूक तुपातली… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(शनिवार दि १७ रोजी श्री.विश्वास देशपांडे यांच्या लेखावर (बाळा मला समजून घेशील ना?) प्रतिक्रियात्मक काव्य)
☆
मराठी ईंग्लीश प्रेमानं समदा समाज झालाय बाद ;
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥
*
अाई बाप म्हणजे मदर फादर
वाटत न्हाई जराबी कदर
करत न्हाई म्हणती आदर
गळ्यातली वाटतीया ब्याद
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ १॥
*
ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण न्हाई पण गुण लागला
ईंग्लीशचा पगडा येवढा पडला
पिझ्झा बर्गरलाच स्वाद
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ २ ॥
*
ईंग्लीश वरती न्हाई पकड
मराठी सुद्धा बोलेना धड
वाक्यात अनेक ईंग्लीश शब्द
घालू किती मी वाद
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ३॥
*
टिळक आगरकर रानडे गोखले
मराठीतच शाळा शिकले
ईंग्लीश ज्ञान जरी संपादले
मराठीचीच ऐकली साद
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ४॥
*
शेव शेव म्हणता करतोया दाढी
सर सर म्हणता होतोया गडी
रोज रोज म्हणता गुलाब हाती
मागू कुणाला दाद
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ५ ॥
*
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे
ईंग्लीश देते मराठी घेते
ईंग्लीशचाच होणार का माद (Mad)
मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ६ ॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈