श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बेरीज… वजाबाकी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काय चुकल माझं?…. काय केलं मी?….

काय करायला हवं होतं?…. काय केलं नाही?…… कोणासाठी केलं?…… असे आणि यांसारखे कितीतरी प्रश्न कानावर आले असतील. नसतील तर या सारखी आनंदाची गोष्ट नाही.

वरच्या अनेक प्रश्नात कधी आपण असे प्रश्न विचारण्याऱ्यांमध्ये असतो. तर कधी ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांच्यामध्ये असतो. पण आपण असतोच.

अशा वेळी प्रश्न विचारणारा बऱ्याचदा रागातच असतो. किंवा राग आल्यावरच अशी प्रश्नावली सुरू होते.  ज्याला असे प्रश्न विचारले जातात तो देखील रागात असेल तर तिथे सगळं संपतं. आणि सुरू होते ती एक मन अस्वस्थ करणारी शांतता…….. यात कोण चूक कोण बरोबर हा आणखीन एक प्रश्न नंतर असतोच.

पण त्याचवेळी  सुरू होतो तो बेरीज वजाबाकीचा खेळ. या खेळात होते ती फक्त चुकांची बेरीज आणि  चांगल्या कामाची, वागण्याची  नकळत वजाबाकी.

यावेळी  उजाळा मिळतो तो फक्त झालेल्या चुकीच्या गोष्टींना. आणि अगदी मागच्या ते अलिकडच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला जातो. आणि सगळ्या चुकांची फक्त बेरीज आणि बेरीजच मांडली जाते. हा चुकांच्या बेरजेचा आकडा थोडक्यात उत्तर वाढतच जातं.

आणि चांगल्या गोष्टींची वजाबाकी होते आहे किंवा आपण ती करतोय याची जाणीव रहात नाही‌.  शेवटी चांगल्या कामाचे शून्य फक्त शिल्लक रहात. अगदी काल परवा पर्यंत केलेली चांगली कामं यात मातीमोल ठरतात, किंवा ठरवली जातात.

किंवा त्या चांगल्या कामाची आठवण करून दिली तर……… त्यात काय?…… सगळेच करतात…….. करायलाच पाहिजे…. कर्तव्य आहे ते…… जमत नसेल तरीही जमवाव लागेल…… या प्रकारचीच उत्तर येतात.

असे प्रश्न जिथे जिथे संबंध आहेत, मग ते नात्यातले, मित्रांचे, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांचे, शेजारी अशा सगळ्या ठिकाणी होतात. काही वेळा ते योग्य असतील. पण प्रत्येकवेळी ते रास्तच असतील अस नाही. पण त्याचा विचार होत नाही.

या बेरीज वजाबाकीत बऱ्याचदा चुकीच्या कामांच्या बेरीज मध्ये, किंवा चांगल्या कामांच्या वजाबाकीत संबंध दुरावतात. आणि परत एका नात्याची वजाबाकी होते.

अशा प्रसंगी शांतपणे विचार केल्यास खरच लक्षात येइल की आपण चांगल्या कामांची बेरीज आणि चूकांची वजाबाकी केली तर सगळेच नाही पण काही प्रश्न हे प्रश्न न करता सुटतील.

बेरीज आणि वजाबाकी करायचं चिन्ह आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की बेरजेच्या चिन्हासाठी + दोन रेषा लागतात. ज्या परस्परांना मध्यभागी मिळतात. पण वजाबाकीच्या चिन्हात – ती एकटीच असते. त्यामुळे आपण आपसात भेटाव असं वाटलं तर बेरीज करा. आणि एकटच रहायच असेल तर वजाबाकी आहेच.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments