श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ एस ए ग्रुप … – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशन वर पोहोचली, तोपर्यंत S A ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशन कडे जमा झाले होते.) – इथून पुढे —
ही सर्व मंडळी येताच पोलिसांची जीप तिच्या घरच्या दिशेने निघाली. त्याच्या पाठोपाठ S A ग्रुप मधील मेंबर्स पण निघाले. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली, दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग या ग्रुपमधील मेंबर्स पण आता घुसले.दार उघडताच अस्ताव्यस्त अवस्थेत प्रणिता कॉटवर पडलेली दिसली, लेडी पोलीस पुढे झाली, तिने तिला हलवायचा प्रयत्न केला, मग तिने तिची नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, ” नाडी संथ आहे पण लागते आहे, तिला हॉस्पिटलला तातडीने न्यायला लागेल.”
मनिषने मघा येताना एका राजकीय पक्षाचे ऑफिस जवळच असल्याचे पाहिले होते, त्यामुळे मनिष धावत खाली उतरला आणि त्या ऑफिसमध्ये गेला. सुदैवाने त्या पक्षाची ऍम्ब्युलन्स बाजूच्याच गल्लीत पार्क केलेली होती, त्याने ड्रायव्हरला ती चाळीखाली आणायला सांगितली. महिला पोलीस आणि वंदनाने तिला उचलून जिन्यातून खाली घेतले. एव्हाना एस ए ग्रुप मेंबर्सना हा पत्ता कळला होता, त्यामुळे त्या ग्रुपमधील बरीच मंडळी जमा होऊ लागली… .. ऍम्ब्युलन्स पुढे, त्यात लेडी पोलीस सोबत वंदना होती आणि पाठोपाठ एस ए ग्रुप्स मधील पुरुष स्त्रिया आपापल्या गाडीतून येत होती.
ऍम्ब्युलन्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पोलिसांनी प्रणिताला ऍडमिट केले.
मेडिसिन डिपार्टमेंटच्या मुख्य डॉक्टरांनी तिला तपासले. तिची नाडी मंद चालू होती, ब्लड प्रेशर खूपच खाली गेलं होतं, ऑक्सिजन लेव्हल चिंताजनक होती.
सोबत असलेल्या वंदनाला डॉक्टर म्हणाले, ” खूपच क्रिटिकल कंडिशन आहे, बहुतेक हिने भरपूर ड्रग्स घेतले असण्याची शक्यता आहे, वाचण्याची शक्यता कमी आहे. हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या.”
वंदनाला प्रश्न पडला, हिची फारशी ओळखच नव्हती, मग हिचे नातेवाईक शोधायचे कसे? हिचे गाव तालुका ही काही माहित नाही. एवढ्यात वंदनाच्या लक्षात आले, ‘ मगाशी हा तिच्या रूममध्ये तिच्या कॉटवर असलेला मोबाईल मी माझ्या पर्समध्ये टाकला होता.’ वंदनाने आपली पर्स उघडून प्रणिताचा मोबाईल बाहेर काढला. तो आता चालू कसा करायचा हे तिला कळेना. मग अनेक युक्त्या वापरून (नेहेमीच्या ) तिने तिचा मोबाईल उघडला. तिचे कॉल उघडून कोणी ओळखीचे नाव येते का ती पहात होती, एवढ्यात तिला ‘ आई ‘ असे नाव दिसले. वंदनाने ओळखले हा प्रणिताच्या आईचा नंबर असणार.
तिने मनीषला आणि संगीताला तिच्या मोबाईलमधला आईचा नंबर दाखवला. मनीष तिला म्हणाला ” तूच तिच्या आईला फोन कर, ती सिरीयस आहे असे सांगू नको, तिचा अपघात झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे असे तिच्या आईला सांग “. संगीताचे पण तसेच म्हणणे होते. यावेळेपर्यत त्यांच्या एस ए ग्रुप मधील बरीच मंडळी जमा झाली होती. त्या ग्रुपमधील श्याम, अनुजा यांचं पण तेच म्हणणं, ‘ तू फोन कर आणि तिच्या आईला न घाबरवता कळव आणि ती मंडळी मुंबईत येत असतील तर येउ दे.’
मग वंदनाने ‘ आई ‘ या फोनवर फोन लावला.
आई – काय ग, नवीन काही काम मिळत आहे का?
वंदनाला कळले .. फोन प्रणिताचा म्हणून तिच्या आईला फोनवर प्रणिता वाटली असणार.
वंदना – काकू, मी प्रणिताची मैत्रीण वंदना, मी आणि तिने अनेक मालिकामध्ये एकत्र काम केले आहे.
आई – अग मग प्रणिता कुठे आहे?
वंदना – काकू, प्रणिताला लहानसा अपघात झाला आहे. आता ती तशी बरी आहे. पण डॉक्टरनी तिला बोलायला बंदी केली आहे.
आई – अरे बापरे, काय झालं प्रणिताला ?…. असं म्हणून प्रणिताची आई रडू लागली.
वंदना – अहो काकू ती बरी आहे, पण तिला आईची आठवण येत आहे, म्हणून मी फोन केला. तुम्ही कुठे राहता?
आई – सांगलीला.
वंदना – तुम्ही मुंबईला येऊ शकता काय?
आई रडत रडत म्हणाली, “अग, ही आमचं न ऐकता घर सोडून गेली, तिचे बाबा तिचे नाव घेत नाहीत, आमचा मुलगा पुण्यात असतो, मी कशी येणार सांग.”
वंदनाने “बर ‘ म्हंटल आणि ती एस ए ग्रुप मेंबर्स जवळ आली. आता सुमारे साठ लोकं जमली होती, सगळी नाटक सिनेमाच्या मोहापोटी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुठून कुठून आलेली, अजून जम बसत नाही, पण एका ग्रुपमार्फत एकमेकांना धरून राहिलेली. एवढ्यात मनिष म्हणाला .. ” पण तिच्या आईला आणावेच लागेल, तिच्या बाबांचा आणि भावाचा नंबर मिळाला तर त्याला पण घेऊन येऊ. पण यांचे नंबर कसे मिळतील.? “
“ वंदना, तू अजून कॉन्टॅक्ट लिस्ट बघ, कोणी ओळखीचे भेटते का बघ.:किंवा तिचे जास्तीत जास्त कॉल कुणाला गेलेत ते बघ “.
वंदनाने परत मोबाईल उघडला, तेव्हा आरती नावाच्या मुलीला तिचे रोज फोन जात होते हे लक्षात आले.
वंदनाने आरतीला फोन लावला.
आरती – काय ग प्रणे, आज शूटिंग नाही वाटतं, आता कॉल केलीस म्हणून विचारते.
— वंदनाने तिला आपण प्रणिताची मैत्रीण असल्याचे सांगितले आणि प्रणिताला अॅक्सिडेंट झाला म्हणून तिचा फोन आपल्याकडे असल्याचे सांगितले. सुदैवाने आरती सांगलीतील तिची लहानपणापासूनची मैत्रीण निघाली. ती म्हणाली ‘ मी प्रणालीच्या आईला घेऊन एक तासात निघते.’
तिने प्रणालीच्या भावाचा नंबर दिला.
प्रणालीच्या भावाचा नंबर मिळाला. वंदना मनिषला म्हणाली, “मनीष, तिच्या भावाला तू फोन कर “.
मनिषने तिच्या भावाला फोन लावला, आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग तो नंबर मनीषने आपल्या फोनवरून लावला. त्या नंबरावरून त्याने फोन उचलला.
मनीष – मी मनिष बोलतोय, ठाण्यावरून. तुमची बहीण प्रणिता हिला लहानसा अपघात झालाय, आता ती बरी आहे, पण तिच्या घरचे तिच्याजवळ असावे म्हणून तिच्या मोबाईलमधून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला.
प्रणिताचा भाऊ – खरंतर गेली दोन वर्षे मी तिच्याशी बोललेलो नाही. तिने घेतलेला निर्णय आम्हाला पसंत नव्हता म्हणून. पण ती माझी बहीण आहे. तिला बरे नसेल तर मला तिकडे यावेच लागेल. मी माझ्या आईला कळवतो.
मनिष – आम्ही तुमच्या आईला कळवले आहे. बहुतेक ती प्रणिताची मैत्रीण आरती हिच्याबरोबर ठाण्याला येते आहे.
भाऊ – मग ठीक आहे, मी पण माझ्या आईला फोन करून सांगतो. पण माझी बहीण खरोखर बरी आहे ना? काही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे का?
मनीष – काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे कुणीतरी सोबत असायला हवे, आम्ही मित्रमंडळी जास्त वेळ राहू शकत नाही, म्हणून मी फोन केला.
भाऊ – मी लगेच निघतो. ठाण्याजवळ आलो की तुम्हाला या मोबाईलवर फोन करतो. मग मला कुणीतरी घ्यायला या.
मनिष – यायला लागा, ठाण्यात जवळ आला की मला फोन करा. तुम्ही कसे येणार आहात ते पण कळवा.
— अशा रीतीने प्रणिताचा भाऊ ठाण्यात येत होता.
वंदना – मनीष आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असे का सांगितलेस?
मनीष – याचे कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल असे मला वाटत नाही. तेव्हा आपण तिला पोलिसांची परवानगी घेऊन ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे हे बरं .
वंदना – हो हे खरे आहे, पण आपल्या ग्रुपच्या सर्व मेंबर्सचे मत घ्यायला हवे.
मनीषने सर्व एस ए ग्रुप मेंबर्स ना जवळ बोलावले.
मनीष – ग्रुप मेंबर्स, प्रणिताची कंडिशन अजून क्रिटिकल आहें, या हॉस्पिटलमध्ये फारश्या सुविधा नाहीत, तेव्हा आपण तिला ठाण्यात ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. .तुमचे काय मत आहे?
श्याम – होय, बरोबर आहे. लवकर हालचाल करायला हवी.
संगीता – त्या हॉस्पिटलमध्ये माझा मावसभाऊ सर्जरीमध्ये डॉक्टर आहे. तो या वेळेस ड्युटीवर असेल. मी त्याला फोन करून लक्ष देण्यास सांगते. संगीताने आपल्या मावसभावाला फोन लावला. मनीष आणि वंदना तिथल्या डॉक्टर्सना इथून डिस्चार्ज मिळविण्यासाठी भेटायला गेली. मनोज ऍम्ब्युलन्स शोधू लागला. त्याला सुसज्ज ऍम्ब्युलन्स मिळाली. पंधरा मिनिटात वाशीच्या हॉस्पिटलमधून डिसचार्ज घेऊन प्रणिताला ठाण्यात शिफ्ट केले गेले, ऍम्ब्युलन्स पाठोपाठ एस ए ग्रुप्स मेंबर्स स्कूटर, मोटरसायकल घेऊन जात होते.
संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती. ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता.
– क्रमशः भाग दुसरा.
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈