श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एस ए ग्रुप … – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती, ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता.) – इथून पुढे — 

ॲम्बुलन्स हॉस्पिटलजवळ आली. लगेच मनीषने सर्व कागदपत्र हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये नेऊन दिले. दोन मिनिटात प्रणिता स्पेशल रूममध्ये ऍडमिट झाली. मग भराभर सर्व टेस्ट घेतल्या गेल्या. ऑक्सीजन सिलेंडर जोडला गेला, अंगात भराभर इंजेक्शन दिली गेली. सलाईन मधून औषधं दिली गेली.

रात्री दहाच्या सुमारास मनिषच्या मोबाईलवर प्रणिताच्या भावाचा फोन आला, मनीषने त्याला ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बोलावले. तिचा भाऊ हॉस्पिटलकडे आला, त्याची व मनीषची ओळख झाली. मनीषने त्याला आपल्या एस ए ग्रुप मधील मंडळीची ओळख दिली.

भाऊ – कशी आहे तिची तब्येत? आणि कोठे अपघात झाला आणि कसा?

वंदना – तिचा अपघात झाला नाही, पण ती काल सकाळी फोन उचलेना तेव्हा मी तिच्या घरी गेले.  तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. मी लगेच आमच्या ग्रुपवर ही बातमी कळवली आणि तिला काल दुपारी वाशीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मग सायंकाळी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

तिचा फेसबुक वर पाहिलेला फोटो आणि पोलिसांनी फोडलेले दार या सर्व गोष्टी तिच्या भावापासून लपविल्या.

भाऊ – मग डॉक्टरांचे काय म्हणणं आहे?

मनिष – सध्या आम्हाला कोणाला तिला भेटायला देत नाही आहेत, त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे एवढ्यात कळणार नाही. ती शुद्धीवर आली की सर्व काही कळेल. तिची आई येते आहे का?

भाऊ –हो, आरती माझ्या आई बाबांना घेऊन येते आहे. एवढ्यात पुण्यापर्यत आली आहे.

संगीता – तिचे बाबा पण येत आहेत का, बरं झालं .

तोपर्यंत प्रणिताच्या बाबांचा फोन भावाच्या मोबाईलवर आला. तिच्या भावाने आपण हॉस्पिटलजवळ पोहोचल्याचे सांगितले. तिची सर्व मित्रमंडळी म्हणजेच त्यांचा एस ए ग्रुप तिच्यासाठी धडपडत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश आनंदाने या असा निरोप दिला.

आत डॉक्टर्स प्रांणिताच्या ऑक्सिजन लेवलवर लक्ष ठेवून होते, ब्लडप्रेशर वर येण्यासाठी धडपडत होते.

बाहेर एस ए ग्रुपचे शंभराहून जास्त मेंबर्स चांगल्या बातमीची वाट पहात होते. तसेच प्रणिताची आई वडील येणार, त्याची वाट पहात होते.

पहाटे चार वाजता हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की प्रणिताची ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत आली आहे, ब्लडप्रेशर नॉर्मल होत आहे. एस ए ग्रुपच्या मेंबर्सनी आनंदाने जल्लोष केला. प्रणिताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. कोण कुठलीही अनोळखी मुले, नाटक सिनेमाच्या वेडापोटी इकडे जमा झाली आहेत, अजून पाय स्थिर नाहीत, आज काम आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती, पण प्रेमाने एकमेकाला धरून राहिले आहेत 

पहाटे चार वाजता आरती प्रणिताच्या आई-बाबांना घेऊन हॉस्पिटल जवळ आली. प्रणिताचा भाऊ बाहेर होताच. काळजीत पडलेल्या तिच्या आई-बाबांना त्याने धीर दिला, तसेच तिची तब्येत संकटातून बाहेर पडल्याचे त्याने त्यांना सांगितले. ही सर्व मुलं प्रणिताची मित्रमंडळी, तिच्यासारखी नाटक सिनेमा मालिकाच्या वेडापायी घरदार सोडून या पट्ट्यात राहत आहेत. कधी जेवण मिळते कधी नाही. कधी काम असते कधी नसते. पण सर्वजण एका ग्रुपवर  मैत्री सांभाळतात. आज सकाळपासून हीच मंडळी प्रणिताच्या आजूबाजूला आहेत. या मंडळींना कळले की ती रूममध्ये बेशुद्ध पडली आहे. त्यावेळीपासून ही मुलं ती बरी होण्यासाठी धडपडत आहेत… प्रणिताच्या आईने सर्वाकडे प्रेमाने पाहिले, बाबा पण सदगदित झाले.  त्यांनी मनिषच्या खांद्यावर थोपटले.

एव्हडयात हॉस्पिटल मधून बातमी आली, प्रणिता शुद्धीवर आली आहे. एस ए ग्रुप ने आनंदोत्सव सुरू केला. सकाळी सहा वाजता प्रणिताच्या आईला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईला बघतल्यावर प्रणिता पुन्हा रडू लागली. मग तिचे बाबा, भाऊ आत गेले. प्रणिताच्या लक्षात येत नव्हते, आपण कुठे आहोत? आजूबाजूला सलाईन, ऑक्सीजन मॉनिटर  दिसतो आहे, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असणार. मग आपल्याला इकडे कुणी आणले?

सकाळी नऊ वाजता डॉक्टरांची टीम तपासण्यासाठी आली. त्यांनी तिला तपासले आणि आता ती संकटातून बाहेर आल्याचे तिच्या आई-बाबांना सांगितले. बाबांनी डॉक्टरांना विचारले .. 

“पण ती बेशुद्ध का झाली?

डॉक्टर – तिला ड्रग्सचे व्यसन आहे, ड्रग्सचा जास्त डोस तिच्या शरीरात गेला होता, आता ड्रग्सपासून तिला लांब ठेवायला हवे. ती वेळेत या हॉस्पिटलमध्ये पोचली म्हणून.. अन्यथा तिचा कालच अंत झाला असता.

प्रणिताचे आई-बाबा सुन्न झाले. काय आपल्या या मुलीची परिस्थिती? प्रणिताच्या बाबांच्या मनात आले, आपण सुद्धा तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत. तिची आवड निवड आपण लक्षात घेतली नाही. तिच्याशी संबंध तोडले. तिच्या आईला पण तिला भेटायला बंदी केली. जर तिच्या आवडीला आपण सुद्धा प्रोत्साहन दिले असते, तर ती एकटी पडली नसती. प्रणिताची आई गप्प बसून होती, तिचा भाऊ पण गप्प बसून होता, ड्रगचे व्यसन लागलेल्या आपल्या या बहिणीला त्यातून कसे बाहेर काढायचे याचा तो विचार करत होता. प्रणिताची आई मनात म्हणत होती, आपल्या घरी किंवा माहेरी कुणाला सुपारीचे सुद्धा व्यसन नाही, उलट तिचे बाबा कोण व्यसनी दिसला तर त्याचे व्यसन कसे सुटेल, यासाठी धडपड करतात, आणि आमची मुलगी….

दुपारी प्रणिता पूर्णपणे शुद्धीवर आली, पण आता तिच्या ड्रग्स घेण्याची वेळ झाली होती, त्यामुळे ती रेस्टलेस होऊ लागली, आळोखे पाळोखे देऊ लागली, तिची बुबूळ वर खाली होऊ लागले. पुन्हा डॉक्टर धावत आले, त्यानी तिला झोपेचे इंजेक्शन दिले तशी ती झोपी गेली.

दुपारी प्रणिताचे बाबा आणि भाऊ बाहेर आले, बाहेर एसए ग्रुपचे मेंबर्स उभे होते. एवढ्या कडकडीत दुपारी सुद्धा 50 पेक्षा जास्त मंडळी बाहेर उभी असल्याचे पाहून बाबांना गहिवरून आले.

बाबांनी मनीषला जवळ घेऊन सांगितले,

” डॉक्टर म्हणतात तिला ड्रग्सचे व्यसन लागले आहे. मघा ती जागी झाली, पुन्हा तिचे शरीर ड्रग्स मागू लागले, ती रेस्टलेस झाली, डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन देऊन झोपून ठेवले आहे, पण पुढे काय? या ड्रग्सच्या विळख्यातून ती बाहेर कशी पडणार?

एस ए ग्रुप मधील पूर्वा बोलू लागली

” अंकल, याकरता तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायला हवे. माझा मामेभाऊ असाच ड्रगच्या विळख्यात अडकला होता, पण पुण्यातील डॉक्टर अवचटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि तो त्याच्या व्यसनातून बाहेर पडला. तुम्ही जर हो म्हणालात तर मी माझ्या भावाकडे चौकशी करून थोड्या वेळात तुम्हाला सांगते.” 

प्रणिताच्या बाबानी होकार देताच तिने त्वरित आपल्या भावाला फोन लावला. त्याच्याकडून व्यसनमुक्ती केंद्राचा फोन नंबर घेतला. आणि तेथूनच व्यसनमुक्ती केंद्राला फोन लावून प्रणिताची केस सांगितली. व्यसनमुक्ती केंद्राने प्रणिताला आपल्या केंद्रात आणण्याची परवानगी दिली. चार दिवसांनी प्रणिता ठणठणीत बरी झाली आणि आई बाबा, भाऊ यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याची तयारी केली. प्रणिताचे आई बाबा एस ए ग्रुप मेंबर्सना भेटले. “ तुमच्यासारखी धडपडी प्रेमळ मुलं आहेत म्हणून जगात माणुसकी शिल्लक आहे हे म्हणायचे, “ असे म्हणताना ते भावुक झाले. “ या एसए ग्रुप मुळेच माझी मुलगी मला मिळाली, असेच एकत्र रहा, एकमेकांसाठी धावा, एकमेकांना मदत करा. तुमचे उपकार न फेडण्यासारखे “.  प्रणिताची आई सर्वाना सांगलीत येण्याचे आमंत्रण देत राहिली.

शेवटी प्रणिता आपल्या ग्रुप मेम्बर्सना भेटली, विशेष करून वंदना आणि मनीष, त्यांनी धावपळ करून घर फोडून आपल्याला हॉस्पिटल मध्ये नेले नसते तर….

प्रणिता व्यसन मुक्ती केंद्रात जाताना पुन्हा सर्व एस ए ग्रुप हजर होता. सर्वांनी तिला निरोप दिला.

त्या व्यसनमुक्ती केंद्रात ती दीड वर्ष राहिली पेशंट म्हणून, व्यसनातून पूर्ण बाहेर पडली आणि त्याच व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करू लागली.

पण तिच्या मनात एस ए ग्रुप बद्दल कृतज्ञता कायम राहिली.

– समाप्त – 

 © श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments