श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

आनंदाची फुले वाटणारे झाड… ☆ श्री विश्वास देशपांडे

आज मी सांगणार आहे महाराष्ट्राच्या त्या लाडक्या व्यक्तिमत्वाबद्दल . ओळखलंच असेल तुम्ही. आपले ते भाई हो. म्हणजेच सर्वांचे लाडके पुलं . तर आज त्यांचे एक दोन किस्से सांगून  मी तुमची सकाळ आनंदी करणार आहे. पुलं म्हणजे मोठे साहित्यिक, गायक, वादक, संगीतकार, वक्ता. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पण अशी माणसं माणूस म्हणून सुद्धा किती मोठी असतात, ते दर्शविणारी ही घटना. मधू गानू यांनी पुलंना ‘ माणसांनी मोहरलेलं झाड . असं त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. ते खरंच आहे. कारण पुलंच्या घरी सतत गायक, वादक, कलाकार, साहित्यिक, त्यांचे चाहते इ चा सतत राबता असायचा. पण पुलं आणि सुनीताबाई न कंटाळता त्या सर्वांची सरबराई करत असायचे. जसं रानातलं एखादं चवदार आणि थंड पाण्याचं तळं असावं, आणि त्या तळ्यावर येऊन प्रत्येकानं आपली तहान भागवावी, तसे पुलंकडे येऊन प्रत्येकजण समाधानी आणि आनंदी होऊन जायचा. पण कधी कधी हे तळच तृषार्तांकडे आपण होऊन जायचं. एक प्रसंग घडला तो असा.

पुलं इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात वारणानगरची काही मुले येऊन आपली कला सादर करणार होती. पण काही कारणाने ती मुले संमेलनात येऊ शकली नाहीत. पुलंना हे कळले तेव्हा त्यांनी संमेलन आटोपल्यानंतर त्या मुलांच्या भेटीसाठी जाण्याचे ठरवले. आणि ते वारणानगरला गेले. जणू पुंडलिका भेटी परब्रह्म आले. त्यांना पाहिल्यावर मुलांचा आनंद गगनात मावेना.

एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, ” आम्हाला साहित्य संमेलनात आमची कला सादर करायला मिळेल असे वाटले होते. पण आम्हाला आमंत्रणच आले नाही. पण आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वतः आम्हाला भेटायला आले आणि आम्हाला खूप आनंद झाला. आता त्यांच्यासमोर आम्ही आपली कला सादर करू. पण आमची एक अट आहे. आमचा कार्यक्रम आवडला तर पुलंनी आम्हाला पेटी वाजवून दाखवावी. पुलंनी अर्थातच त्यांची ही अट मान्य केली.

आणि नंतर घडले ते सगळे अद्भुत ! मुलांच्या कलागुणांवर पुलं अफाट भाळले. त्यांनी मुलांना मग पेटी तर वाजवून दाखवलीच, पण त्यांना जे जे हवे ते सगळे केले. एवढे करून पुलं  थांबले नाहीत. त्यांनी त्या मुलांच्या कलागुणांचे कौतुक वर्तमानपत्रात लेख लिहून केले. शिवाय आपल्या पुढाकाराने त्या मुलांचा कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. मुलं  आणि पुलं  यांची झकास गट्टी जमली. मुलांचे ते आवडते ‘ भाईकाका ‘ झाले. असे होते पुलं . जेवढे साहित्यिक म्हणून मोठे, तेवढेच माणूस म्हणूनही.

एकदा पुलंच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेला. काही प्रश्न विचारल्यानंतर ‘ तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता’ असे त्याने पुलंना विचारले. काही क्षण पुलं शांत होते. पत्रकाराला वाटले की बहुधा त्यांना काय सांगावे हा प्रश्न पडला असेल. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण इ पैकी कोणता सांगावा असा त्यांना प्रश्न पडला असेल. तो काही बोलणार तेवढ्यात पुलं म्हणाले, ‘ एकदा माजी पंतप्रधान इंदिराजी आपल्या मंत्रिमंडळासमवेत चर्चा करीत होत्या. त्या म्हणाल्या की आपल्या देशातले जे महान लोक होऊन गेले , त्यांचा सन्मान तर आपण टपाल तिकीट काढून करतोच, पण एखाद्या परदेशातील व्यक्तीवर तिकीट काढून त्यांचा सन्मान करावा असे वाटते. त्यांचे सहकारी म्हणाले की छान कल्पना आहे. कोणाचे नाव आपल्या डोळ्यांसमोर आहे का ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या जगाला हसवणाऱ्या आणि काही काळ का होईना पण आपले दुःख विसरायला लावणाऱ्या चार्ली चॅप्लिनवर तिकीट काढावे असे वाटते. ‘ वा. फारच छान कल्पना ! ‘ सहकारी म्हणाले.

तेव्हा एका मंत्र्याने विचारले की कोणाच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे आपल्याला वाटते ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘ तो महाराष्ट्रातला पी एल आहे ना, लोकांना आपल्या नर्मविनोदाने हसवणारा, त्याच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे वाटते. ‘

पुलं  त्या पत्रकाराला म्हणाले , ‘ तो माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण ! ‘

एकदा पुलंना कोणीतरी तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार असे विचारले होते. तेव्हा पुलं म्हणाले, ‘ मी आत्मचरित्र लिहीन की नाही हे माहिती नाही, पण लिहिलेच तर त्याचे नाव ‘ निघून नरजातीला रमविण्यात गेले वय ‘ असे असेल असे सांगून टाकले. आपल्या साठ वर्षांच्या जगण्याचे मर्म अशा रीतीने पुलंनी एका ओळीत सांगून टाकले होते. असे हे आनंदाची फुले वाटणारे झाड..!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments