सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर 

चांडी सार पासून सानुर एक दीड तासावरच आहे.(by road)  बॅगा पॅक करून, भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. दोन निळ्या रंगाच्या स्वच्छ आणि आरामदायी टॅक्सीज आमच्यासाठी हजरच होत्या ऐटदार गणवेशातले हसतमुख ड्रायव्हर्स  आमच्यासाठी स्वागताला उभे  होते. दीड दोन तासातच आम्ही आमच्या कर्मा रॉयल सानुर रिसॉर्टला पोहोचलो.  पुन्हा एक सुंदर अद्ययावत सुविधांचा बंगला.  सभोवताली आल्हाददायी रोपवाटिका आणि जलतरण तलाव. इथे एक आवर्जून सांगावसं वाटतं की प्रत्येक शयनगृहात शयनमंचावर चाफ्याची फुले पसरलेली होती आणि हिरव्या पानांच्या कलात्मक रचनेत वेलकम असे लिहिले होते. मन छान गुलाबी होउन गेले हो!

वातावरणात काहीशी उष्णता आणि दमटपणा असला तरी थकवा मात्र जाणवत नव्हता. मन ताजे प्रफुल्लित होते. एका वेगळ्याच सुगंधी, मधुर आणि थंड पेयाने आमचे शीतल स्वागतही झाले. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आम्ही ८० च्या उंबरठ्यावरचे सहा जण नकळतच वय विसरत होतो हे मात्र खरे.

इथे आम्ही फक्त एकच दिवस थांबणार होतो.

संध्याकाळी जवळच असलेल्या सिंधू बीचवर जायचे आम्ही ठरवले. इथल्या अनेक दुकानांची नावे, समुद्रकिनार्‍यांची नावे, अगदी माणसांची विशेषनामेही  संस्कृत भाषेतील आहेत.  पुराणातल्या व्यक्तींची नावे आहेत.  जरी बालीनीज लिपीतल्या पाट्या वाचता येत नसल्या तरी इंग्लिश भाषांतरातील भगवान, कृष्णा, महादेव सिंधू अशी नावे कळत होती.नावात काय आहे आपण म्हणतो पण परदेशी गेल्यावर आपल्या भाषेतलं नाव आपुलकीचं नातं लगेच जोडतं.

संध्याकाळी बीचवर फिरायचे व तिथेच रेस्टॉरंट मध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आम्ही ठरवले. हा समुद्रकिनारा काहीसा चौपाटी सदृश होता. पर्यटकांची गर्दी होती. फारशी स्वच्छता ही नव्हती. फेरीवाले, किनाऱ्यावरची दुकाने ,हॉटेल्स यामुळे या परिसरात गजबज आणि काहीसा व्यापारी स्पर्श होता.  पण बाली बेट हे खास सहल प्रेमींसाठीच असल्यामुळे वातावरणात मात्र मौज मजा आनंद होता.  तिथे चालताना मला पालघरच्या केळवा बीचची आठवण झाली. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणारी गरीब विक्रेती माणसं, यात अधिक तर स्त्रियाच होत्या.  इथे भाजलेली कणसे आणि शहाळी पिण्याचा काहीसा ग्रामीण आनंद आम्ही लुटला. पदार्थ ओळखीचे जरी असले तरी चावीमध्ये बदल का जाणवतो? इथले मीठ तिखट, आपले मीठ तिखट हे वेगळे असते का? की जमीन, पाणी, अक्षांश रेखांश या भौगोलिक घटकांचा परिणाम असतो? देशाटन करताना या अनुभवांची खरोखरच मजा येते.

इथल्या फेरीवाल्यांकडे आम्ही अगदी निराळीच कधी न पाहिलेली न खाल्लेली अशी स्थानिक फळे ही  चाखली. मॅंगो स्टीन नावाचे वरून लाल टरफल असलेले टणक फळ फारच रसाळ आणि मधुर होतं .फोडल्यावर आत मध्ये लसणाच्या पाकळ्यासारखे छोटे गर होते. काहीसं किचकट असलं तरी हे स्थानिक फळ आम्हाला खूपच आवडलं. 

बालीमध्ये भरपूर फळे मिळतात.  अननस, पपनस, पपया, फणस, आंबे पेरू या व्यतिरिक्त इथली दुरियन (काटेरी फणसासारखं पण लहान ), लाल रंगाचं केसाळ मधुर चवीचं राम्बुबुटन,टणक  टरफल फोडून आत काहीसा करकरीत सफरचंदासारखा गर असलेले सालक.. असा बालीचा  रानमेवा खाऊन आम्ही तृप्त झालो. 

 पाणी प्यावं बारा गावचं, चाखावा रानमेवा देशोदेशीचा—— असंच म्हणेन मी.

सी फुड साठी प्रसिद्ध असलेलं हे बाली बेट.  शाकाहारी लोकांसाठी भरपूर पर्याय असले तरी मासे प्रेमी लोकांसाठी मात्र येथे खासच मेजवानी असते असे म्हटले तर ते चुकीचे नाही.

समुद्रकिनाऱ्यावर आम्ही असे खात पीत भरपूर भटकलो. सहा म्हातारे तरुण तुर्क!  

आता आम्हाला  स्थानिक मासे खाण्याचा आनंद लुटायचा होता. मेरीनो नावाचे एक बालीयन रेस्टॉरंट आम्हाला आवडले.  किनाऱ्यावरचे सहा जणांचे टेबल आम्ही सुरक्षित केले. कसलीच घाई नव्हती. आरामशीर मासळी भोजनाचा आनंद लुटायचा हेच आमचे ध्येय होते. सारेच स्वप्नवत होते. समुद्राची गाज ,डोक्यावर ढगाळलेलं आकाश आणि टेबलावर मस्त तळलेले खमंग चमचमीत ग्रेव्हीतले मोठे झिंगे( प्राॅन्स) , टुना मासा आणि इथला प्रसिद्ध बारा मुंडी मासा. सोबतीला सुगंधी गरम आणि नरम वाफाळलेला भात आणि हो.. सोनेरी जलपानही. रसनेला आणखी काय हवे हो? गोड गोजीर्‍या बालीयन लेकी आम्हाला अगदी प्रेमाने वाढत होत्या! बाळपणीच्या, तरुणपणीच्या आठवणीत रमत आम्ही सारे तृप्तीचा ढेकर देत फस्त केले.  वृद्धत्वातही शैशवाला जपण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर पावसाच्या सरी बरसु लागल्या. भिजतच आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि टॅक्सी करून रिसॉर्टवर परतलो. जेवणाचे बिल अडीच लाख आयडिआर, आणि टॅक्सीचे बिल तीस हजार आयडिआर. धडाधड नोटा मोजताना आम्हाला खूपच मजा वाटायची.

आता आमच्या सहलीचे तीनच दिवस उरलेले होते आणि या पुढच्या तीन दिवसाचा आमचा मुक्काम कर्मा कंदारा येथे होता. कंदारा मधली  कर्मा ग्रुपची ही प्रॉपर्टी केवळ रमणीय होती. निसर्ग, भूभागाची नैसर्गिक उंच सखलता, चढ-उतार जसेच्या तसे जपून इथे जवळजवळ ७० बंगले बांधलेले आहेत. आमचा ६७ नंबरचा बंगला फारच सुंदर होता.आरामदायी, सुरेख डेकाॅर, सुविधायुक्त, खाजगी जलतरण तलाव, खुल्या आकाशाखाली ध्यानाची केलेली व्यवस्था वगैरे सगळं मनाला प्रफुल्लित करणार होतं. रिसेप्शन काउंटर पासून आमचा बंगला काहीसा दूर होता. पण इकडून तिकडे जायला बग्या होत्या.  एकंदरीत इथली सेवेतली तत्परता अनुभवताना समाधान वाटत होते. बारीक डोळ्यांची गोबर्‍या गालांची, चपट्या नाकांची, ठेंगणी गुटगुटीत बाली माणसं आणि त्यांची कार्यक्षमता प्रशंसनीय होती. त्यांच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा उबदारपणा होता.  वास्तविक फारसे उद्योगधंदे नसलेला हा प्रदेश. शेती, मच्छीमारी या व्यतिरिक्त पर्यटन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय.  त्यांचे सारे जीवन हे देशोदेशाहून येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून. त्यामुळे पर्यटकांना जास्तीत जास्त कसे खूश ठेवता येईल  यावरच त्यांचा भर असावा.

यानिमित्ताने दक्षिण पूर्व आशिया खंडातल्या इंडोनेशियाबद्दलही माहिती मिळत होती. इथल्या बाली  बेटावर आमचं सध्याचं वास्तव्य होतं. मात्र जकार्ता राजधानी असलेला  इंडोनेशिया म्हणजे जवळजवळ १७००० बेटांचा समूह हिंदी आणि पॅसिफिक महासागरात पसरलेला आहे. हिंदू आणि बुद्ध धर्माचे वर्चस्व असले तरी ८७ टक्के लोक मुस्लिम आहेत. जवळजवळ तीन शतके इथे डच्यांचे राज्य होते. १७ ऑगस्ट १९४५ साली नेदरलँड पासून ते स्वतंत्र झाले आणि प्रेसिडेन्शिअल युनिटरी स्टेट ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया म्हणून ओळखले जाऊ लागले जगातली तिसरी मोठी लोकशाही येथे आहे २००४  पासून जोकोविडो हे इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. अनेक नैसर्गिक आपत्ती, भौगोलिक विषमता, जात, धर्म भाषेतील अनेकता सांभाळत इंडोनेशियाची इकॉनॉमी ही जगात सतराव्या नंबर वर आहे. 

इथल्या वास्तव्यातलं आमचं आजचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे बाली फायर डान्स . अग्नी नृत्य.  याविषयी आपण पुढच्या भागात वाचूया.

 – क्रमशः भाग पाचवा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments