सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आमचे काका ति स्वः दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मितल्या,ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या  शूरवीरांच्या कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता- ऐकतांना प्रसंग डोळ्या समोर  उभा राहयचा.लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली,  अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे; श्री कर्णिकांची.  पुण्यातल्या श्री तांबडी जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता,..थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडुशेट   गणपती   मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे नां ! तोचं तो रस्ता.  त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दिपस्तंभ अजूनही कित्येक वर्षाचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे. आणि त्यावर नांव कोरलय” –भास्कर दा.कर्णिक.–   कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठ बलिदान केलंआहे . पण=पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावांची ही निशाणी?      श्री कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श -त्यांचं बलिदान, त्यांच नांव आपण मनांत जागवूया. श्री.भास्कर दा.कर्णिक ऑडिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व . त्या काळचे १९४० -४२ सालचे उच्च पदवी विभूषित  असलेले हे धडाडीचे तरुण,देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनांत विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तिथलीच  सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब   तयार केले.    थोडे  थोडके नाहीं तर अर्धा ट्रॅक भरून बॉम्बची सज्जता  झाली. आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना  देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांव सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे श्री दिक्षित श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय देवीच्या मंदिरातही हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबतं होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले.  पण — पण हाय रे देवा ! कसा   कोण जाणे! दुर्देवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारासह श्री कर्णिक पकडले गेले.      फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं, आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे नां ?तीच ती जागा!.पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण.. पण श्री कर्णिक, मुख्य आरोपी म्हणून, डाव फसलयामूळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं .. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजुला गेले. क्षणार्धात… क्षणार्धात.. खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते,.. ते कोसळले…. आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग -केला.  तर मंडळी असा  आहे त्या पायरीचा इतिहास…..  मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी,हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय.   मध्यंतरी बराच काळ गेला  आहे .भास्कर दा.  कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत.त्यामुळे आतां – -हया हुताम्याचाही दुर्देवाने  पुणेकरांना विसर पडलाय.    संपली श्री भास्कर दा. कर्णिक  यांची  कहाणी . ज्यांना ही कथा माहित आहे. ते दगडूशेठ गणपती मंदिरातून बाहेर पडतात. डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात. क्षणभर विसावतात. आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. 

कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तू सध्या उपेक्षित ठरलीय.  कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.  स्तंभावरील अक्षरे पण  पुसट झाली आहेत. तरीपण आपण श्री कर्णिकांच्या शौर्याला स्मरून,ह्या हुतात्म्याची आठवण म्हणून, स्तंभापुढे नतमस्तक होऊयात का ?      

धन्यवाद ..       

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments