सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ आयुष्याचा उद्देश – सिद्धांत ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. त्या गोष्टी मिळाव्यात अशी गरजही असते. त्याचा क्रम साधारण पुढील प्रमाणे असतो.
अन्न,वस्त्र,निवारा,पैसा,प्रतिष्ठा व मी कोण? याचा शोध.
त्यातील अन्न,वस्त्र,निवारा,पैसा व भौतिक सुख सुविधा याच्या मागे माणूस लागतो.आणि आपण जेवढे त्याच्या मागे लागतो तितकेच ते पुढे पळते.जशी सावली धरता येत नाही तसेच काहीसे होते. मग ही सावली आपल्या मागे कशी येईल याचा विचार केला पाहिजे. आपण सूर्याकडे पाठ करुन चाललो तर सावली आपल्या पुढे असते.पण सूर्याकडे तोंड करुन चाललो म्हणजे सूर्याला सामोरे गेलो तर सावली मागे येईल. मग हा सूर्य कोण? तर आपण स्वतः …..
स्वतः कोण आहोत? स्वतः मधील क्षमता ओळखल्या तर या सगळ्या सावल्या,भौतिक सुखे,लोकप्रियता आपल्या मागे येते. म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्देश आपल्याला माहिती असणे महत्वाचे असते. जगात इतकी माणसे असताना माझा जन्म झाला आहे म्हणजे निसर्गाला माझ्या कडून काही काम करुन घ्यायचे आहे.हे लक्षात घ्यावे.
▪️ आपल्या सभोवती जी वैश्विक शक्ती आहे त्याचे आपण शक्तिशाली मानवी रूप आहोत. आणि या वैश्विक शक्तीला आपल्या कडून काही करून घ्यायचे आहे हे कायम लक्षात ठेवावे.
▪️ स्वतः मध्ये कोणते टॅलेंट म्हणजे दैवी शक्ती आहे याचा शोध घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्ती युनिक असते. प्रत्येकाची हुशारी,कौशल्ये वेगळी असतात.
▪️ या वेगळे पणाचा व आपल्यात असलेल्या वैश्विक शक्तीचा उपयोग करुन आपल्या संपर्कात येणाऱ्यांना आपण कशी मदत करु शकतो याचा विचार करायचा आहे.
How can I help? हा विचार प्राधान्याने करायचा आहे.
आपण जे लोकांना देतो ते आपल्याकडे कित्येक पटीने परत येते. म्हणून मला काय मिळणार या पेक्षा माझ्या कडून कोणाला काय मिळणार? माझ्यामुळे किती जण आनंदी होणार? याचा विचार करुन त्या प्रमाणे आचरण केले तर तोच आनंद कित्येक पटीने आपल्या कडे येणार आहे.
या साठी पुढील गोष्टी आचरणात आणाव्यात.
▪️ माझ्यात वैश्विक दैवी शक्ती आहे.माझा जन्म काही कारणा साठी झाला आहे. हे मान्य करावे.
▪️ स्वतः मधील युनिक टॅलेंट म्हणजे वेगळ्या दैवी शक्तीची यादी करावी.
ही यादी करताना काही गोष्टींचे स्मरण केले तर यादी करणे सोपे होईल.
उदा. आई वडील काय केल्यावर शाबासकी देत होते?
माझ्याकडे माणसे कोणत्या गोष्टी मुळे येतात?
माझ्या कोणत्या कृतीने माणसे आनंदी होतात?
माझ्या मधील कोणत्या गोष्टी मुळे मी लोकांना प्रिय आहे?
याचा विचार केला तर आपल्यात कोणते विशेष व इतरांच्या पेक्षा वेगळे गुण म्हणजेच वेगळी दैवी शक्ती आहे ते लक्षात येईल.
▪️ माझ्याकडे अमर्याद पैसा व वेळ असेल तर मी इतरांच्या साठी काय काय करु शकेन याची यादी करणे. जे करावेसे वाटेल ते म्हणजे विशेष गुण आहेत.ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची एक यादी करणे.
▪️ माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी कशी व कोणती मदत करु शकेन? ज्या मुळे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल.
हे जर आपण अंमलात आणले तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे.
हे सगळे करण्याचा उद्देश एकच आहे. तो उद्देश म्हणजे स्वतःला ओळखणे.
स्वतः मधील क्षमता,सकारात्मकता व स्वतः मधील वेगळे पण ओळखणे. एकदा आपण स्वतःला ओळखले की बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येणार आहेत.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈