सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ कुलूप… ☆ सौ.प्रभा हर्षे

आज नाना अगदी खुशीत होते. सकाळच्या प्रसन्न हवेत मित्रांसोबत छान चालणं झालं,  अण्णाकडे इडली चटणीच्या नाष्ट्याबरोबर चहा  झाला, रोजच्या सारखा सुहास ही भेटला आणि आता नाना घरी यायला निघाले .. …. नाही, जरा चुकलंच ..  नाना मेधाच्या घराकडे निघाले.

आपल्या घराकडे बघत बघतच नाना पुढच्या बिल्डिंगमध्ये शिरले. खरं तर स्वतःचं घर सोडून मुलीच्या घरी रहायला येताना नानांना अगदी कसनुसं झालं होतं .. अपरध्यासारखं वाटत होतं.  पण केतनने आपल्या समंजस वागण्याने त्यांचा संकोच दूर केला. केतन म्हणजे नानांचा लाडका जावई. 

नाना फिरून परत आले तेव्हा केतन दारातच उभा होता

“ बरं  झालं नाना आलात ते, मी आता कुलूपच लावत होतो, तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. बरं .. विजूताई येऊन गेल्या आहेत. सगळा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही वेळेवर जेवून घ्या काय ! मला परत यायला नऊ  तरी नक्की वाजतील, तसं मेधाला सांगा प्लीज ..” ..  केतन भराभरा सर्व गोष्टी सांगत होता.

“ हो, नक्की सांगतो. आणि तू सावकाश जा, पळू नको ! “  नाना हसतच म्हणाले व जवळच्याच खुर्चीवर विसावले. आता तासभर पेपर वाचन, जमलं तर एक डुलकी ! आणि  मगच अंघोळ व देवपूजा  !

का कोण जाणे पण आज अचानक नानांना नानींची फार आठवण येत होती.. पुढच्या महिन्यात  नानींना जाऊन चार वर्षे होतील. सुहासचे, नानांच्या मुलाचे लग्न त्या असतांनाच झाले होते. एक गोड नातही झाली होती या आजी-आबांना. तिच्या लडिवाळ सहवासात दोघांचे निवृत्त आयुष्य छान रमले होते. पण …. पण तिच्या दुसऱ्या  वाढदिवसाच्यानंतर नानी अचानक हार्ट फेलने गेल्या.  नाना फार फार एकटे पडले. 

मुलगा सुहास आणि सून प्रिया .. दोघांचेही रुटीन लवकरच पूर्ववत झाले… पण नाना ? …. नानी गेल्या होत्या त्यांना एकटं सोडून. बाकी सगळं तसंच होतं, पण प्रेमाचा ओलावा मात्र बघता बघता सुकून गेला होता. त्यांची सून -प्रिया फार तापट होती. तिला राग अजिबात आवरत नसे.. आणि रागाच्या भरात  एकदा बोलायला लागली की समोरच्याचा मुळी विचारच करत नसे. नानी होत्या तेव्हा न बोलता सगळं सावरून घेत होत्या .. आणि आता त्या नव्हत्या.  बारीक सारीक गोष्टीवरून घरात कूरकूर सुरु झाली . 

एक दिवस अशीच तिची विनाकारण चाललेली चिडचिड मेधाच्या कानावर पडली.                 

“का आणि कुणावर इतकी रागवली आहेस प्रिया ?”  नानांना भेटायला आलेल्या मेधाने प्रेमाने विचारले.

“काय सांगू आता ? माझं नशीबच असं. सगळा त्रास फक्त मला एकटीला होतो, चिडू नको तर काय करु ?? “ एवढंच बोलून तणतणत प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली.  

प्रियाचं ते तिरकस बोलणं ऐकून नाना बेचैन झालेले मेधाच्या लक्षात आले . काहीतरी निश्चित विचार करून समजुतीच्या स्वरात ती नानांना म्हणाली, “ नाना, लहानपणी तुम्ही नेहेमी अगदी अभिमानाने म्हणायचात ना की माझ्यासाठी माझा मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही म्हणून… मग आता ते आचरणात आणून दाखवा बघू .. “ — काही न कळून नाना तिच्याकडे बघायला लागले.

“मी काय म्हणते नाना, तुम्ही आमच्याकडे रहायला चला. खरं सांगू का .. तुमचा नातू होस्टेलवर गेल्यापासून आमचं घर अगदी रिकामं रिकामं वाटायला लागलंय.. कंटाळवाणं वाटायला लागलं आहे. केतन तर गप्प गप्पच असतो बऱ्याचदा. तुम्ही आमच्याकडे राहायला आलात ना तर घरात जरा जान येईल. आमच्या. आणि हो, मलाही तुमचा सहवास लाभेल .. जरा सोबत होईल. चला ना नाना ! इतका विचार करण्यासारखं काय आहे यात ? “  

नानांनाही थोडा बदल हवा होता. सुनेची सततची चिडचिड नकोशी वाटत होती. पण म्हणून असं मुलीकडे रहायला जायचं ? नानांचा पाय घरातून निघत नव्हता.. काही झालं तरी नानीच्या असंख्य आठवणी होत्या त्या घरात .. काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. पण मेधाचा तो अगदी मनापासूनचा आग्रहही त्यांना मोडावासा वाटत नव्हता. मनाला नकळत दिलासा वाटायला लागला होता. 

पण मेधा तिच्या प्रस्तावावर ठाम होती. तिने त्यासाठी प्रियाची मूक संमती मिळवली व लगेच नानांची बॅग भरली.  केतन .. तिचा नवरा .. तो तर आधीपासूनच नानांचा लाडका विद्यार्थी होता ! अत्यंत हुषार, नम्र, आणि महत्वाचं म्हणजे माणसं जपणारा ! नाना आपल्या घरी रहायला येणार या विचारानेच  त्यालाही फार आनंद झाला.

मेधा आणि सुहास दोघांचेही फ्लॅट्स शेजारशेजारच्या बिल्डिंगमध्ये होते. त्यामुळे नानांच्या रोजच्या सकाळ संध्याकाळ मित्रांच्या कट्ट्यावर जाऊन गप्पा मारणे या कार्यक्रमातही  काही बदल झाला नाही. सकाळी फिरायला व संध्याकाळी बागेत नानांचा वेळ छान जात असे.

आता त्यांचे आयुष्य बरेच स्थिरावले होते. दिवस आनंदात .. निवांतपणे जात होते.  पण एक दिवस अचानक संध्याकाळी घाबऱ्या घाबऱ्या सुहास मेधाकडे आला आणि घाईघाईने त्यांना म्हणायला लागला ..

“ नाना, आत्ताच्या आत्ता घरी चला ! “

“ अरे हो , पण झाले काय ? आधी इथे बस बघू जरा.. आणि प्रिया ..  छकुली .. त्या दोघी कुठे आहेत ? “

सुहासचा आवाज ऐकून मेधाही लगेच बाहेर आली.

“ ताई, अगं बघ ना हे काय झालंय ! “

सुहास अगदी रडवेला झाला होता. तितक्यात प्रिया व छकुलीही तिथे आल्या. मेधाच्या गळ्यात पडून प्रिया एकदम रडायलाच लागली. नानांना पाहून छकुलीने धावत जाऊन त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.

नाना दिग्मूढ होऊन पहात राहिले होते. सुहास खाली मान घालून  गप्प बसला होता. नेमकं काय झालं होतं  हे कळतच नव्हतं त्यांना. काही क्षण असेच असह्य शांततेत गेले.

मग आधी हळूहळू प्रिया शांत झाली.  नानांच्या जवळ जाऊन बसली .. रडवेल्या आवाजात त्यांना म्हणाली .. “ नाना, मला माफ करा. मी चुकले. त्यादिवशी मी खूप रागावले. फक्त त्यादिवशीच नाही – बरेचदा अशीच वागते मी. पण काय करू? राग आला की माझ्या मेंदूचे आणि जिभेचे कनेक्शन सुटूनच जाते, मी तोंडाला येईल ते वाट्टेल तसे बोलते. त्या दिवशी मी तुम्हाला उद्देशूनच म्हणाले होते की ‘ जिवंत कुलूप आहेत नुसते, फक्त दाराला लटकत राहायचं , बाकी काही काम करायचं नाही.’ .पण नाना माझं फार फार चुकत होतं. मी हे विसरले होते की बाकी काही नाही तरी आहे ते राखण्याचे काम हे जिवंत कुलूप उत्तम तऱ्हेने करत असते.. म्हणजे …. म्हणजे  इतके दिवस छकुलीला तुमच्यावर सोडून मी निर्धास्त फिरत होते.  मला असंच वाटायचं की मलाच एकटीला सगळं काम पडतं. कुणीच मला जरासाही हातभार लावत नाही. पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की तुम्ही घरातले काम केले नाहीत तरी छकुलीला संभाळण्याचे मोठे काम करत होतात ! आणि तेही अत्यंत मनापासून आणि प्रेमाने ! हे मी कधी लक्षातच घेतले नाही. तुमच्या या मोलाच्या मदतीचे महत्व कधीच माझ्या लक्षात आले नाही नाना. पण त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागते. तुम्ही परत आपल्या घरी चला. पुन्हा मी कधीच अशी चिडचिड करणार नाही . मी माझा स्वभाव बदलायचा प्रयत्न करीन .. अगदी नक्की आणि मनापासून. परत मी अशी इतकी चिडले तर तुम्ही माझा कान धरा, पण असं घर सोडून जाऊ नका ना नाना “ ..  प्रिया खरंच अगदी काकुळतीला येऊन बोलत होती.

“अग ,पण झालंय काय , ते तर सांगशील ? “

“तसं झालं नाही काही, पण होऊ शकलं असतं.. अगदी होता होता बचावली छकुली आणि आम्हीही . “   

“अगं आधी शांत हो आणि नीट सांग बघू .. काय झालंय ते “

“काय झालं, मी नेहेमीसारखी खाली भाजी आणायला गेले होते. छकुली घराच्या दारापाशी बसून खेळत होती. दार उघडंच होतं…  मी लगेचच परत येणार होते ना. पण दार उघडं आणि घरात छकुली एकटी .. हे बघून शेजाऱ्यांचा पेपरचे बिल मागायला आलेला मुलगा आपल्या घरात शिरला व त्याने दार लावून घेतले.
छकुलीला उचलून पलंगावर ठेवतच होता तो.. पण तितक्यात मी दार उघडून आत गेले. नशिबाने मी ल्याचची किल्ली घेऊन गेले होते..  दार उघडून मी आत शिरले..  पाहिले तर हा प्रकार ! मी छकुलीकडे धाव घेतली, पण तेवढ्यात तो पळून गेला. मी त्याला ओळखते. पण नाना, छकुली खूप घाबरली आहे ! ‘ आई, त्या काकाने असं का केलं मला ‘  असं सारखे विचारते आहे ! आता मी तिला काय सांगू ? “

प्रिया परत रडायला लागली . मेधाने तिला जरा शांत केले आणि म्हणाली .. “ अगं प्रिया, नानांना घरातल्या कामाची सवय नाहीये. शाळेची नोकरी, ट्युशनस् आणि त्यांचे सोशल वर्क यामुळे ते सतत बाहेर असत. घरातले सगळे काम आईच करायची, आम्ही पण मदत करायचो. पण आता आई नाहीये.  तू जर नानांना सांगितलस ना की ‘ नाना जरा हे काम करता का ? ‘  तर ते नाही म्हणणार नाहीत. त्यांना आपणहून काही सुचत नाही गं. हे लक्षात घे, त्यांना  थोडे संभाळून घे, बघ मग .. सगळं व्यवस्थित होईल. नको रडूस. “

नानांनी काहीच न बोलता आपली बॅग भरली व छकुलीचा हात धरून नाना त्यांच्या घरी परत निघाले…   पण नानांच्या मनातून या चार महिन्यांमधल्या आठवणी काही जात नव्हत्या. राहून राहून ते विचार करत होते  ‘ तेव्हा आपलं काय चुकलं होतं — आणि आज आपण परत त्या घरी चाललो आहोत हे तरी नक्की बरोबर आहे का ? त्या घरात आता आपलं नक्की स्थान काय असणार आहे ?  खरोखरच आपण फक्त एक कुलूप असणार आहोत का ? लोखंडासारखं निपचित लटकत रहाणारं एक जिवंत कुलुप?‘ 

सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments